Astra news network podcast

ए एन एन न्यूज नेटवर्क: गुन्हेविषयक बातमीपत्र दिनांक: १५ जून २०२५


Listen Later

नमस्कार,  

आपण ऐकत आहात, आजच्या गुन्हेविषयक ठळक बातम्या.

दिनांक: १४ जून २०२५

देहूरोडमध्ये लोखंडी कोयता-रॉडने हल्ला

देहूरोड येथील गांधीनगर परिसरात शिवीगाळ करू नका असे सांगितल्याच्या रागातून चार आरोपींनी एका ५० वर्षीय व्यक्तीवर लोखंडी कोयता आणि रॉडने जीवघेणा हल्ला केला. अनिल चंद्रकांत काळखैर यांच्या घरात घुसून केलेल्या या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. चंदू गोरख सकट, करण अरुण सकट आणि दोन अन्य आरोपी अद्याप फरार आहेत.

दिघीत सिंगापूर टूरच्या नावाखाली १३.५ लाखांची फसवणूक

दिघी येथील एका व्यापाऱ्याची आणि साक्षीदाराची सिंगापूर टूर देण्याच्नावाखाली एकूण तेरा लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. अतुल सुभाष रुणवाल यांनी आठ लाख आणि साक्षीदार रविंद्र वाळके यांनी साडेपाच लाख रुपये दिले होते. आरोपी महिलेने टूर न देता हे पैसे हडपले आहेत.

कात्रजमध्ये २० वर्षीय तरुणीचा मृत्यू

कात्रज येथील यशश्री सोसायटीजवळ श्रेया येवले या २० वर्षीय तरुणीचा भरधाव कारच्या धडकेने मृत्यू झाला आहे. परवाना नसतानाही सतिष होनमाने याला गाडी चालवण्यास दिल्याने चालक आणि गाडीचा मालक दत्तात्रय गाडेकर या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

रविवार पेठेत साडेचौदा लाखांची घरफोडी

रविवार पेठेतील रामलिला ज्वेलर्स दुकानात मध्यरात्री चोरट्यांनी शटरचे कडी-कोयंडे तोडून चौदा लाख पंच्याण्णव हजार रुपयांचे सोने-चांदी-हिऱ्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केली आहे. अज्ञात चोरटे अद्याप फरार आहेत.

पर्वतीत शेअर ट्रेडिंगच्या नावाने सहा लाख दहा हजाराची ऑनलाइन फसवणूक

पर्वती येथील दत्तवाडी परिसरातील एका ६६ वर्षीय व्यक्तीची शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. सहा लाख दहा हजार एकशे अठ्ठावीस रुपयांची या फसवणुकीत हानी झाली आहे.

बावधनमध्ये कंटेनर अपघातात चालकाचा मृत्यू

बावधन येथील बेंगळूरू हायवेवर टाटा कंटेनरच्या चालकाने बेदरकारपणे ब्रेक मारल्याने कंटेनरमधील लोखंडी पाईप घसरून चालकाच्या केबिनला धडकले. रामचरण बागरीया या २५ वर्षीय चालकाचा यात जागीच मृत्यू झाला.

चंदननगरमध्ये अकरा लाख अठ्ठावन्न हजाराची घरफोडी

चंदननगर येथील तत्व सोसायटीतील एका कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्याने अकरा लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे.

घरकामगाराने चोरले साडेतीन लाखांचे दागिने

मार्केटयार्ड येथील लक्ष्मीनारायण रेसिडेंसीत घरकाम करणाऱ्या महिलेने मालकिणीची नजर चुकवून तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी केले आहेत.

दापोडीत जुन्या भांडणाच्या रागातून दगडाने हल्ला

दापोडी येथे शादाब आणि अरबाज शेख या दोन भावांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून एका २७ वर्षीय तरुणाला दगडाने डोक्यात, तोंडावर आणि कपाळावर मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.

महाळुंगेत अज्ञात रिक्षाच्या धडकेने पादचारी जखमी

महाळुंगे येथे नाशिक-पुणे रोडवर अज्ञात रिक्षाचालकाने संतोष भोर या ३५ वर्षीय व्यक्तीला धडक देऊन गंभीर जखमी केले. रिक्षाचालक घटनास्थळावरून पळून गेला आहे.

आळंदीत टाटा पंचच्या धडकेने मोटारसायकलस्वार जखमी

आळंदी ते चऱ्होली रोडवर टाटा पंच गाडीने मोटारसायकलला धडक दिल्याने विजय कंद्रप यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. अंकुश खाडे हा चालक अपघात घडवून फरार झाला आहे.

या होत्या आजच्या गुन्हेविषयक बातम्या. अधिक बातम्यांसाठी पहात रहा ए एन एन न्यूज नेटवर्क. नमस्कार.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Astra news network podcastBy ann