Guru Shishya Sukhsamwad

Episode 489 as on 13th March 2026


Listen Later

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 13th March 2026


देवहृदयीचे प्रेम मी जाणिले। त्या प्रेमासी माझ्या हृदयी आणिले ॥ प्रभूंनी आपल्या घरी यावे असे सर्वच भक्तमंडळींना वाटते.  असेच एक भक्त सूर्यकांत कारेकर. प्रभूंवर आत्यंतिक श्रध्दा व निष्ठा पण वास्तव्य दूर कोकणात . त्यामुळे प्रभूंची वारंवार भेट घेता येणे शक्य नसायचे. प्रभूंनी एकदा तरी आपल्या घरी यावे असे त्यांना मनोमन वाटत असे. तसे त्यांनी एकदा प्रभूंना बोलून दाखवले , नव्हे तसा आग्रहच धरला. भक्ताचा भाव जाणून त्याची इच्छा पूर्ण करणे हा तर प्रभूंच्या कार्याचाच एक भाग होता. कोकणात जायचे ठरले. भक्त मंडळी तर बरोबर हवीतच . पण घेणार कोणाला आणि वगळणार कोणाला ? शेवटी ज्यांची ज्यांची इच्छा होती त्या सर्वांनाच प्रभूंनी सामील करून घेतले व समस्त परमानंद परिवार आडवलीला निघाला. मांडवी एक्सप्रेस आडवली स्थानकात शिरली. सूर्यकांतने आप्तमित्रपरिवारासह प्रभूंचे चरणांवर मस्तक ठेवत लोटांगण घालून स्थानकावरच प्रेमपूर्वक स्वागत केले व प्रभूंसह सर्व प्रेमीजनांनी घराकडे प्रस्थान केले. चहापान व विश्रांतीनंतर मुख्य कार्यक्रम चालू झाला. आळवणी,  स्तोत्रगायन, पदगायन व कारेकरमंडळींचे मनोगत  यथानुक्रमे पार पडले व प्रभूंची अमृतवचने प्रकट व्हायला लागली. " प्रेमीजनांच्या भावाची आमच्या ठिकाणी नोंद असते व अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने आधी त्याच्या जीवनात व यथावकाश त्याच्या मनात प्रवेश करण्याची संधी आम्हाला मिळते. आम्ही त्याला जवळ करतो पण ही जवळीकता त्याने टिकवून ठेवायची आहे . जेवढा तो आमच्या जवळ येईल व आमच्याकडे मन मोकळे करेल तेवढे आमचे प्रेम त्याला मनात भरून घेता येईल आणि मग संसारभावाने तो बाधित होणार नाही. त्यासाठी बाह्यांगाने दूर असूनही आमच्याशी संपर्कात रहाणे व संपर्कात सातत्य टिकवणे आवश्यक आहे. फोनवरून संपर्क हीसुद्धा एक प्रकारची सत्संगतीच आहे. अर्थात प्रत्यक्ष सत्संगती अमूल्य आहे हे तर खरचं. दूरवर असलेल्या जीवाचेही कल्याण व्हावे अशीच आमची तळमळ असते आणि म्हणून दूरस्थ व्यक्तिलाही ध्यास लागण्यासाठी काही सुविधा निर्माण करता येतील का याचाच विचार आम्ही करत असतो." असंख्य दाखले व दृष्टांत देत प्रभू त्यादिवशी कितीतरी बोलत होते. वेळेचे भान कुणालाच नव्हते. गाडी पकडून घरी जायची नेहमीची घाई नव्हती. प्रभू रंगले होते खर तर ते स्वतःतच रमले होते. सर्व मंडळींवर प्रभाव पडला होता .  सूर्यकांत तर देहभान हरपून नाचायलाच लागला होता. जमलेली सर्व मंडळी त्याला उत्स्फूर्तपणे साद देत होती. भारलेल्या वातावरणात एक अतिशय रमणीय व भावपूर्ण सोहळा साकार होत होता. प्रभूंनी प्रकट केलेली वचने मनात व त्यांचे ते त्यादिवशीचे अतिअद्भूत आगळे वेगळे रूप नेत्रात मी साठवून ठेवत होतो. या कार्यक्रमाचा, विशेषत्वाने ' संपर्कात सातत्य' या संदेशाचा , माझ्या मनावर फार मोठा परिणाम झाला होता. रात्री कधितरी उशीरा प्रभूंनी कार्यक्रम आवरता घेतला. महाप्रसादाची वेळ झाली होती . आणि इथेही प्रभूंची एक अनोखी परी मनाला स्पर्श करून गेली. त्यांच्यासाठी भोजनाची विशेष व्यवस्था केली असतानासुद्धा त्यांनी भक्तमंडळींसमवेत भोजन करणे पसंत केले . असे हे आमचे परमानंदप्रभू . देवहृदयीचे प्रेम मी ... श्रीपरमानंदार्पणमस्तु.

 

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Guru Shishya SukhsamwadBy Saurabh Kapoor