Punavechya Gappa | पुनवेच्या गप्पा | Marathi Podcast

कज्जा कचेरी


Listen Later

कज्जा कचेरी

एक वाचलेली गोष्ट आठवली. गोष्ट काका व पुतण्याची आहे. दोन भाऊ खेड्यातले. मोठा हुषार. शिक्षणाची आवड. शिकून मोठा अधिकारी होतो. शहरात नोकरी करतो. स्वतःचे घर बांधतो. लग्न करतो. योग्यवेळी सेवानिवृत्त होतो. त्याला एक मुलगा असतो. तो आता तरूण झालेला असतो. लहानपणापासून अधेमधे आईवडिलांबरोबर खेड्यात जात असतो. त्याचा काका त्याच्या वडिलांपेक्षा बराच लहान असतो. काकाचे शिक्षणात लक्ष नसते. वडील मात्र काकाने शिकावे म्हणून फार प्रयत्न करतात. पण काका शिक्षणापेक्षा शेतीत रमतो. वडिल शेतीसाठी होणारा खर्च त्याला पुरवीत असतात. म्हातारपणामुळे आईवडिलांचे निधन होते. मग मोठा भाऊच लहान भावाला पैसा पुरवीत असतो. त्याचे लग्नही करून देतो. लग्नानंतरही मोठा भाऊ लहान भावास पैसा पुरवीत असतो. हे सर्व मोठ्या भावाचा मुलगा पाहत असतो. ऐके दिवशी तो वडिलांना म्हणतो की, आता काकाला पैसे पाठविणे बंद करा. त्याचे वडिल कांही त्याचे ऐकत नाही. मग त्या दोघांमध्ये वादविवादाला सुरूवात होते. शेवटी कंटाळून वडिल त्याला वडिलोपार्जीत मिळकतीचे वाटण्यासंदर्भातील मुखत्यार पत्र देतात व मुलाला पाहिजे ते करण्याची मोकळीक देतात. मग हा मुलगा, काकांना वडिलोपार्जीत मिळकतीची वाटणी मागतो. पण काका त्याला स्पष्टपणे नकार देतो. मग मात्र पुतण्या काकांविरूद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याची तयारी करतो. पुतण्याला शेतीची, घराची वाटणी करण्यासाठी मोजमाप घेणे, वेगवेगळे कागदपत्र जमा करण्यासाठी खेड्यात वारंवार जावे लागायचे. पहिल्यांदा तो जेंव्हा  खेड्यात जातो, त्यावेळी गावात कुठे राहायचे हा प्रश्न त्याच्यासमोर येतो. पण तो गावात आल्याचे कळताच त्याचा काका स्वतः त्याला घरी घेऊन जातो. तो काकाच्या घरी पोहचल्याबरोबर त्याच्या लहानग्या चुलत भावंडानी त्याला आनंदाने मिठ्या मारल्या. मोठ्या भावाच्या आगमनाचा त्यांना खूप आनंद झाला होता. ते त्याला सोडायला तयार नव्हते. शेवटी काकूने जेवायला बोलावल्यावर त्याची सुटका झाली. मोजमापाच्या कामात त्याला काकाने सर्व मदत केली. तलाठी कार्यालय, नायब तहसीलदार कार्यालय, भूलेख कार्यालय, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व जेथे जेथे त्याला जावे लागे किंवा काम असे तेथे तेथे काका त्याला सोबत करी व मदतही करी. एखाद्या वेळी एकाच कार्यालयात कामासाठी त्याला तीनतीन - चारचार वेळा जावे लागे. या कामासाठी खूप वेळ जायचा. कचेरीच्या कामापायी तो वैतागून गेला. त्याच्या लक्षात आले की, खेड्यात राहून कचेरीतील कामे करवून घेणे केवढे अवघड असते. ऐके वेळी त्याने या कामाचा नाद सोडायचा विचारही केला. पण काका त्याला म्हणाला " तु कोणती कागदपत्रे पाहिजेत ते सांग. मी घेऊन येत जाईन. पण हाती घेतलेले काम कांही सोडू नकोस." आता कार्यालय हा शब्द चांगलाच रूळलेला आहे. मात्र पूर्वीच्या पिढ्यात त्याऐवजी कचेरी हा शब्द चांगलाच रूढ होता. तो आता लुप्त होत आहे. कचेरी म्हणजे सरकारी कामाचे ठिकाण. हा शब्द मुळचा फारसी आहे. संस्कृतमध्ये त्याला कृत्यगृही, पालीमध्ये किच्चम, प्राकृतात कच्च, बंगालीत काचारी, गुजराथीत कचरी वा कचेरी म्हणतात. गुजराथीत कचेरी या शब्दाचा अर्थ व्यापाऱ्यांची पेढी असेही होतो. तेलगुमध्ये कचेरीला कचेली असे संबोधतात. सर्वसामान्यांना मात्र कचेरीत जाणे म्हणजे तेथील वातावरण व कर्मचाऱ्यांची वागणूक यामुळे अंगावर काटा येणारी गोष्ट असते. कार्यालय या शब्दापूर्वीचा शब्द म्हणजे कचेरी, या शब्दाची व्युत्पत्ति तर आपण समजावून घेतली आहे. आता वळू या पुढील गोष्टीकडे... 
बराच आटापिटा करुन पुतण्याने खटल्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे काकांच्या मदतीने जमविली. पण काकांचा, काकूंचा स्वभाव व त्यांच्या मुलांचा लागलेला लळा, यामुळे त्याला त्यांच्यावर खटला दाखल करण्याची इच्छा होईना. त्याने याबाबत वडिलांना विचारले. वडिल म्हणाले "जे तुझ्या मनात येईल तसे कर." त्याने काकाला विचारले, तो म्हणाला, "अरे, एवढे श्रम केले आहेस, आता मागे हटायला नको." शेवटी पुतण्याने काकावर खटला दाखल केला. न्यायालय खेड्यापासून दहा बारा किलोमीटरवर होते. येथे जाण्यासाठी रस्त्यात येणारी नदी नावेत बसून ओलांडावी लागे. पुतण्या खटल्याच्या तारखेआधी एक दिवस अगोदर काकाच्या घरी हजर होई. सकाळी काकू, काका व पुतण्याला जेवण वाढे. त्यानंतर दुपारचे जेवण दोघांसाठी वेगवेगळे देई. काका पुतण्या नावेपर्यंत एकत्र असत. नावेत मात्र काका एका टोकाला तर पुतण्या दुसर्‍या टोकाला असे. खटल्यात काका पुतण्यावर ना ना त-हेचे कठोर आरोप करी. काकाने खटल्यात पुतण्याला सळो की पळो करून सोडले. दुपारी ते दोघे आपले जेवण वेगवेगळे बसून खात. काकाचा न्यायालयात पुतण्याशी व्यवहार वै-यासारखा असे. खटल्यावरून येतांनाही ते वेगवेगळे येत. नावेतही विरूध्द टोकाला बसत. मात्र एकदा नावेतून उतरल्यावर ते घरी एकत्रच जात. त्यानंतर खटल्याच्या पुढल्या तारखेपर्यंत काका पुतण्या अगदी मित्राप्रमाणे वागत. ब-याच तारखा पडल्यावर शेवटी एकदाचा निकालाचा दिवस आला. निकाल पुतण्याच्या बाजूने लागला. घरी आल्यानंतर काका त्याच्या मुलांना म्हणाला, " चला, घर रिकामे करा. कज्जा तुमच्या भावाच्या बाजूने लागला आहे. आता ते तुमच्या भावाचे घर आहे." काका, काकू व मुले घरातून सामान बाहेर काढू लागले. हे बघून पुतण्याचे मन हेलावून गेले. तो रडायला लागला. सर्व सामान बाहेर आल्यावर काका व काकू समानाशेजारी बसले. काही वेळ गेल्यानंतर काकाने मुलांना मोठ्याने सांगितले, "चला, मुलांनो आता आपण तुमच्या भावाच्या घरात राहायला जावू. चला सामान घरात न्या." हे ऐकून पुतण्या गदगदला. काकाच्या मिठीत जाऊन रडू लागला. त्याला आता काकांकडून पिढीजात मिळकतीचा वाटा नको होता. त्याने खेड्यातले कष्टदायक जीवन या खटल्याच्या निमित्ताने पाहिले होते. काका व त्याच्या कुटुंबाचा नात्यातील ओलावा अनुभवला होता. गोष्टीच्या या भागात आपण खटला शब्द वारंवार वापरलेला आहे व एका ठिकाणी कज्जा शब्द वापरलेला आहे. पुर्वी खटला या शब्दाऐवजी कज्जा शब्दच वापरला जायचा. आता हा शब्द लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. कज्जा म्हणजे खटला, भांडण, लढाई. अरबी शब्द कझिया याचा अर्थ गोष्ट किंवा प्रतिज्ञा तर फारसी मध्ये कझिया म्हणजे भांडण. म्हणजे हा शब्द फारसी शब्दाच्या जवळचा जरी असला तरी त्याचे एक मुळ अरबी शब्दाकडे जाते. कारण हा एकच शब्द दोन्ही भाषेत वेगवेगळ्या अर्थानी येतो. या शब्दाच्या छटा म्हणजे कज्जाग, कज्जेदलाल, कज्जेखोर, आणि प्राकृतात कज्जासण. अशी या शब्दाची व्युत्पत्ति आहे. कचेरीतील कामे असो कि, कज्जा चालवणे असो दोन्ही कामे बहुदा वेळखाऊ व त्रासदायक असतात हे मात्र खरे आहे. म्हणून सहसा त्याच्या वाटेला न जाणेच इष्ट ठरते.

किरण देशपांडे
नेरूळ नवी मुंबर्ई.
९९६९८७१५८३
०२/०५/२०२२

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Punavechya Gappa | पुनवेच्या गप्पा | Marathi PodcastBy मी podcaster