Punavechya Gappa | पुनवेच्या गप्पा | Marathi Podcast

शुभकार्याचा मुहूर्त


Listen Later

शुभकार्याचा मुहूर्त


गणपतराव देसमाने हे काळगे गावचे रहिवासी. व्यवसाय पुर्ण वेळ शेती. एक १८ एकरचे शेत गावाजवळ व दुसरे २२ एकरचे शेत गावापासून सुमारे ८-९  किलोमीटरवर. घरात बायको, एक मुलगी व एक मुलगा. मुलगी व मुलगा दोघेही गावच्या शाळेत शिकतात. शेतासाठी दोन खिल्लारी बैलजोड्या  शेतातल्या गोठ्यात बांधलेल्या. काही शेळ्या व एक कोंबड्यांचे खुराड घराच्या अंगणात. गणपतराव शेतात निरनिराळे प्रयोग करायचे. त्यांची शेतं नहराच्या सिंचनाखाली आली होती. पाण्याची विपुलता होती. त्यामुळे शेतीतील काही भाग त्यांनी बागायती म्हणून ठेवला होता. शेतात भरपूर चारा असल्याने त्यांनी दूधदुपत्यासाठी दोन गायी घेतल्या होत्या. त्याही त्यांनी शेतातील गोठ्यातच बांधल्या होत्या. त्यांच्या बायकोला गायी घरच्या गोठ्यात हव्या होत्या. पण हिवाळा असल्याने गणपतरावाचे मत असे होते की, चारापाणी शेतात बक्कळ असल्याने गायींसाठी गोठा अंगणात हिवाळा संपतेवेळी बांधू. हिवाळा संपायला आला. शेतातली पिके घरात आली. भुसकुतलेले धान्य जरी मशिनीवर साफ केले असले तरी धान्याबरोबर खडे, थोडाबहुत काडीकचरा, भुसा असतोच. कणगीत ते निवडून पाखडून व कडूलिंबाच्या पानाचे थर लावून भरावे लागते. अशाने धान्याची वज चांगली राहते. हिवाळा संपल्या संपल्या गावाची जत्रा भरते. औंदा गणपतरावांचा आतेभाऊ शहरातून यात्रेसाठी बायको, पोराबाळासहीत आला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. पण गणपतरावाच्या बायकोला शेतातून दूध येईपर्यंत ताटकळत बसावे लागे. चहा घेतल्याखेरीज पोटाचा झाडा होत नसल्याने पाहुणे बेचैन असत. शेवटी गणपतरावांची बायको वैतागली. पाहूण्यांच्या देखत तिने विषय काढला. " अवो, गाईचा गोठा तयार कराचा नव्हं. कवा कराचा म्हंतो मी." गणपतराव म्हणाले, " अवो, आता लई काम नाय वावरात. पाखाळणीला गायी बांधू घरच्या गोठ्यात." खेड्यातली भाषा पाहूण्यांच्या डोक्यावरून गेली. त्याने न राहवून गणपतरावाला विचारले " भाऊ, पाखाळणी म्हंजे काय रे" गणपतराव म्हणाले, " अरे, जत्रेत देवाची आंगोळ होते ते म्हंजे  पाखाळणी." विषय तरीही स्पष्ट होत नाही, होय ना? यापूर्वी या लेखात "पाखडणे" हा शब्द आलेला आहे. भुसं भरलेल्या धान्याला स्वच्छ करण्यासाठी ते पाखडावे लागते. स्वच्छ करण्याच्या कृतीचा पाखाळणी या शब्दाशी असा घनिष्ट संबंध आहे. संस्कृत शब्द प्रकर्षाने यावरून हा शब्द आला असण्याची शक्यता बरीच आहे. देवाची आंघोळ म्हणजे देवाला (पाण्याने) स्वच्छ करणे. पाखाळणी म्हणजे स्वच्छ करणे. देवाच्या पाखाळणीच्या मुहूर्तानंतर चांगल्या गोष्टींचा शुभारंभ केल्यास त्या बिनाविघ्न तडीला जातात हा जुना समज असावा. पाखाळणी  हा शब्द नेहमीच्या पाखडणे या शब्दाच्या जवळ असुनही त्याचा अर्थ पटकन उलघडत नाही हीच तर या शब्दाची खासियत आहे. तसा याचा दुसरा अर्थ शेतीच्या हंगामानंतर कास्तकारांची ( कृषी वल्लभांची) पार्टी अथवा जेवणावळ. हा शब्द नक्की वापरा व रूढ करण्यास मदत करा ही विनंती.


किरण देशपांडे

नेरूळ, दि.१०\०२\२०२२

9969871583

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Punavechya Gappa | पुनवेच्या गप्पा | Marathi PodcastBy मी podcaster