डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टीची शकले होऊन नेतृत्वाच्या वादामुळे ही शक्ती विभागली गेली. नेतृत्वाच्या मक्तेदारीच्या वादामुळे रिपब्लिकन ऐक्य हे नेहमीच मृगजळ होऊन राहिले. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे असलेली भीमशक्ती हा त्या रिपब्लिकन शक्तीच्या हिमनगाचा एक अंश आहे. या शक्तीचा विस्तार याहून कितीतरी मोठा असला तरी तो वेगवेगळ्या गटांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या दावणीस बांधला गेला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या ताब्यातील भीमशक्ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत गेल्यास ठाकरे यांच्या शिवसेनेस शक्ती मिळेल, महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला अप्रत्यक्ष बळ मिळेल, की ठाकरे गटाचा महाविकास आघाडीतील वाटा विभागला जाऊन आंबेडकर यांनाच बळ मिळेल, हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.