शाळेत विज्ञानाच्या तासाला तुम्ही कदाचित हा प्रयोग केला असेल – धातूच्या दोन पट्ट्या पाण्यात बुडवून बॅटरीला जोडायच्या.
विजेचा प्रवाह सुरू झाला, की त्या धातूच्या पट्ट्यांवर मग बुडबुडे जमा होतात. पाण्याच्या रेणूंचं विघटन होऊन त्यातून वेगळा झालेल्या ऑक्सिजन आणि हायड्रोजन वायूमुळे हे बुडबुडे तयार होतात, हेही तुम्हाला ठावूक असेल.
तर हायड्रोजनचा वापर इंधन म्हणूनही केला जाऊ शकतो. म्हणजे या वायूवर आग पेटवून स्वयंपाक करता येऊ शकतो. गाड्याच नाही तर विमानांमध्येही ही ऊर्जा वापरता येऊ शकते.
एरवी पेट्रोल किंवा कोळशासारखी जीवाष्म इंधनं आपण वापरतो, पण त्यातून कार्बन उत्सर्जन होतं आणि पर्यावरणाचं नुकसानही होतं. पण हायड्रोजनच्या बाबतीत सर्वात जमेची गोष्ट म्हणजे हायड्रोजनच्या ज्वलनानंतर त्याचा ऑक्सिजनशी संयोग होऊन पुन्हा पाणीच तयार होतं.
त्यामुळे हायड्रोजन हा रिन्यूएबल ऊर्जेचा स्रोत आणि पर्यायानं हवामान बदलाच्या समस्येवरचं एक उत्तर ठरू शकतो. आजची गोष्ट दुनियेची याच विषयावर आहे, की हायड्रोजन आपली ऊर्जेची गरज भागवू शकेल का?
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
एडिटिंग - तिलक राज भाटिया