23 ऑगस्ट 2023. भारताच्या चंद्रयान-3 चं लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि चांद्रमोहिमांच्या अध्यायातलं एक नवं पर्व सुरू झालं. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा पहिलाच देश ठरला. भारताचं हे यश आणखी विशेष ठरलं, कारण त्याआधी तीनच दिवसांपूर्वी रशियाच्या लुना-25 या यानाला चंद्राच्या याच भागात सॉफ्ट लँडिंग करताना अपयश आलं होतं.
सध्या अमेरिका, चीन, जपान, इस्रायलही चांद्र मोहिमांवर काम करतायत. एक प्रकारे चंद्रावर जाण्यासाठी पुन्हा नव्यानं स्पेस-रेस सुरु झाल्याचं चित्र आहे.
भारतीय अंतराळ संस्था इस्रोनं त्याविषयी काही दिवसांपूर्वीच चिंता व्यक्त केली होती. 8 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर केलेल्या पत्रकात इस्रोनं म्हटलेलं की चंद्राच्या कक्षेत गर्दी होतेय. इथे सध्या नासाची चार, दक्षिण कोरियाचं एक आणि भारताचं एक अशी सहा यानं फिरतायत. पुढच्या दोन वर्षांत किमान नऊ यानं चंद्रावर येणार आहेत. त्यामुळे यानांची टक्कर होण्याचा धोका वाढेल अशी भीती इस्रोनं व्यक्त केली.
हीच गोष्ट पृथ्वीलाही लागू होते. पृथ्वीभोवती उपग्रहांचं जाळं आहे आणि एखादं यान भरकटलं तर टकरींची मालिका सुरू होऊ शकते. नोव्हेंबर 2021 मध्ये रशियानं कॉसमॉस-1408 नावाच्या आपल्याच एका निकामी उपग्रहाचे मिसाईलनं तुकडे केले होते. याआधी अमेरिकेने 2008मध्ये आणि चीनने 2007मध्ये असं केलं होतं. त्यानंतर केवळ चुकून होणाऱ्या टकरीच नाही, तर एखादा देश जाणूनबुजून असा हल्ला करू शकतो अशी भीती निर्माण झाली होती.
त्यामुळे या आठवड्यात गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत, की अंतराळात कुणी काय करावं, काय करू नये, याचे काही कायदे आहेत का? जगभरातल्या देशांमध्ये आता स्पेस वॉर होऊ शकतं का?