Solid Joys

Solid Joys

By Alethia4India
Download on the App Store

Solid Joys episodes

  • 18 July : आध्यात्मिक कृपादानांत असलेली देवाची कृपा

    प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभार्‍यांप्रमाणें ते एकमेकांच्या कारणी लावा. (1 पेत्र 4:10)

    जेव्हा आपण आपल्या आध्यात्मिक कृपादानांचा उपयोग करतो तेव्हा आपण कृपेचे कारभारी म्हणून भूमिका पार पाडत असतो – कालच्या कृपेचे कारभारी नव्हे, तर आजच्या कृपेचे, जी आमच्या गरजेच्या प्रत्येक क्षणी आम्हांला दिली जात असते. आणि ही भविष्यातील कृपा म्हणजें “नानाविध कृपा” आहे. ही कृपा नानाविध रंग आणि नानाविध आकार आणि नानाविध स्वरूपांत येत असते. याच एका कारणामुळें मंडळीत असलेली अध्यात्मिक कृपादाने इतकीं नानाविध आहेत. तुम्हांला देवानें जे कृपादान दिलें आहे त्याचे कार्यकारी गुणधर्म देवाच्या गौरवाच्या अशा छटा नानाविध दाखवेल ज्यां छटा देवानें मला दिलेंल्यां कृपादानांतून कधीही दिसून येणार नाहींत. 

    ख्रिस्ताच्या मंडळीत जितक्या नानाविध गरजा आहेत तितक्या नानाविध भावी कृपा आहेत - आणि बरेच काहीं. अध्यात्मिक कृपादानांचा उद्देश त्या गरजा पूर्ण करण्यासाठीं देवाची कृपा प्राप्त करणें आणि ती एकमेकांच्या कारणी लावणें हा आहे.

    आता एखाद्याला प्रश्न पडेल, “तुम्हीं भावी कृपेचा संदर्भ देण्यासाठीं पेत्राचेच वचन का घेतले? पुरुष एक कारभारी म्हणून आधीच हाताशी असलेला आपला घरगुती प्रपंच सांभाळत नसतो का?"

    भावी कृपेचा संदर्भ देण्यासाठीं मी पेत्राचा उल्लेख केला याचे मुख्य कारण हे कीं हा कारभार कसा साध्य होतो यावर पुढील वचन प्रकाश टाकते, आणि त्या वचनाचा संदर्भ त्या भावी कृपेकडें संकेत देतो जी खंड न पडता पुरविली जाते. ते वचन असे म्हणते, “सेवा करणार्‍याने, ती आपण देवानें दिलेंल्या शक्तीने करत आहोत, अशी करावी; ह्यासाठीं कीं, सर्व गोष्टींत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा; गौरव व पराक्रम हे युगानुयुग त्याचे आहेत. आमेन.” (1 पेत्र 4:11). मूळ भाषेंत हा शब्दांश “देव पुरवत असलेल्या” आहे, “देवानें पुरवलेल्या” नाहीं. तुम्हीं सेवा करत असताना, तुम्हांला जे करणें अगत्याचे असते ते साध्य करण्यासाठीं देवाच्या सतत पुरवल्या जाणाऱ्या कृपेच्या सामर्थ्याने सेवा करा.

    उद्या जेव्हा तुम्हीं ख्रिस्तात असलेल्या एखाद्या बंधूची सेवा करण्यासाठीं तुमचे आध्यात्मिक कृपादान कारणी लावाल तेव्हा तुम्हीं ती सेवा “देव पुरवत असलेल्या सामर्थ्याने” कराल — आणि तो पुरवठा आज नाहीं, तर उद्या होईल. "जसे तुमचे दिवस असतील, तसे तुमचे सामर्थ्य असेल" (अनुवाद 33:25 : संपादकाचे भाषांतर).

    आपण ज्या सामर्थ्याने सेवा करतो ते “सामर्थ्य” देव आपल्याला दिवसेंदिवस, क्षणाक्षणाला पुरवत असतो. तो असे करतो कारण जो त्या सामर्थ्याचा खंड न पडता पुरवठा करतो त्या अविनाशी देवाचाच त्यामुळें सर्व गौरव होतो. “सेवा करणार्‍याने, ती आपण देवानें दिलेंल्या शक्तीने करत आहोत, अशी करावी; ह्यासाठीं कीं, सर्व गोष्टींत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा.”

    4 min
  • 17 July : ख्रिस्तावर विश्वास जाहीर करण्यासाठीं लागणारे सामर्थ्य

    प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते; आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती.. (प्रेषितांची कृत्ये 4:33)

    जर उद्या आपल्यावर अशी वेळ आली कीं ज्यामध्यें आपल्याला ख्रिस्ताची साक्ष काहीं बिकट परिस्थितीत द्यावी लागेल, तर अशा स्थितींस हाताळण्यासाठीं आवश्यक गुरुकिल्ली आमची बुद्धिमत्ता नाहीं; गुरुकिल्ली असेल ती आम्हांवर केलीं जाणारी भावी विपुल कृपा.

    इतर सर्व सुवार्तीकांच्या तुलनेंत, प्रेषितांना मरणांतून उठलेल्या ख्रिस्ताविषयीं ठोस आणि विश्वासाकडें घेऊन जाणारी साक्ष देण्यासाठीं कोणाच्या मदतीची गरज वाटली नाहीं असे दिसते. ते तीन वर्षे त्याच्यासोबत होते. त्यांनी त्याला मरतांना पाहिले होते. त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळल्यानंतर पुनरुत्थानाद्वारे जिवंत झालेंलें पाहिले होते. त्यांच्याकडें असलेल्या साक्षीच्या शस्त्र-सामग्रीत त्यांच्याकडें “पुष्कळ अचूक पुरावे” होते (प्रेषितांची कृत्ये 1:3). तुम्हांला असे वाटेल कीं, इतर सर्व सुवार्तीकांच्या तुलनेंत, मंडळी स्थापनेच्या त्या सुरुवातीच्या दिवसांत साक्षी देण्याचे त्यांचे कार्य त्यांनी भूतकाळात जे गौरव पहिले होते, ज्याची आठवण अद्यापही ताजीतवानी होती,  त्या बळावर टिकून राहिलेले असावे.

    पण प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक आपल्याला तसे सांगत नाहीं. विश्वासूपणाने आणि परिणामकारकपणें साक्ष देण्याचे जे सामर्थ्य त्यांना मिळाले ते मुख्यत्वे ह्यामुळें नाहीं कीं त्यांना त्यांच्यावर भूतकाळात झालेंल्या कृपेची आठवण होती; तर ते सामर्थ्य त्यांना त्यांच्यावर असलेल्या “मोठ्या कृपेच्या” नवीन आगमनातून मिळाले होते. "त्या सर्वांवर मोठी कृपा होती." यामुळेंच प्रेषितांनी जें केलें तें ते करू शकलें, आणि आमच्या साक्षी देण्याच्या कार्यात देखील असेच होत असते.

    आम्हीं ख्रिस्ताविषयीची साक्ष देत असतांना तिचे सामर्थ्य वाढवण्यासाठीं देवानें कितीही चिन्हे आणि चमत्कार दाखवले तरी ते जसें स्तेफनाच्या साक्षींच्या वेळी घडून आलें तसेच आमच्याही वेळी येतील. “स्तेफन कृपा1 व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन लोकांत मोठी अद्भुते व चिन्हे करत असे” (प्रेषितांची कृत्ये 6:8). स्तेफनाला सर्व गोष्टींसाठीं आवश्यक असलेली कृपा ही देवाकडून येत होती – अगदी तो मरत असतांना त्याला जे सहन करावे लागणार होते त्यासाठीं देखील.

    भावी काळांत आम्हांवर केलीं जाणारी अद्भुत कृपा आणि सामर्थ्य हेच आहे जे आपल्याला एखाद्या विशेष सेवेच्या वेळी ओढवलेल्या संकटात मदत करू शकेल. हे एक नव्याने प्राप्त झालेंल्या सामर्थ्याचे कार्य असते ज्याद्वारे देव "आपल्या कृपेच्या वचनाविषयी साक्ष" देतो (प्रेषित 14:3; इब्री 2:4 देखील पहा). सामर्थ्य देणारी ही अखंड कृपा सत्याच्या अखंड कृपेची साक्ष देते.

    4 min
  • 16 July : आजच्या कृतींसाठीं लागणारे सामर्थ्य

    भीत व कापत आपलें तारण साधून घ्या; कारण इच्छा करणें व कृती करणें हे तुमच्या ठायीं आपल्या सत्संकल्पासाठीं साधून देणारा तो देव आहे (फिलिप्पैकरांस 2:12-13)

    येथे इच्छा करणें व कृती करणें साधून देण्यांत निर्णायक भूमिका करणारा कर्ता स्वतः देव आहे. आपलें तारण साधून घ्या. . . कारण इच्छा करणें व कृती करणें हे तुमच्या ठायीं देव स्वतः साधून देतो. आपल्या सत्संकल्पासाठीं देव इच्छा करतो आणि तोच आहे जी ती इच्छेनुकूल कृतीहि साध्य करतो. पण यावर विश्वास करणें म्हणजें ख्रिस्ती विश्वासणारे निष्क्रीय होतांत असा त्याचा अर्थ नाहीं. तर उलट, हे सत्य त्यांना आशावादी आणि सक्रिय कष्टाळू आणि धैर्यवान बनवते.

    आम्हीं आपापल्या पाचारणानुसार जी विशिष्ट सेवा करतो त्यांत दररोज आम्हांला कृती करावयाची असते. पौल आपल्याला तीच  कृती साधून घेण्यासाठीं काम करायची आज्ञा देतो. परंतु देवानें पुरवलेल्या सामर्थ्याने ती कशी करावी हे तो आपल्याला सांगतो: त्याच्यावर विश्वास ठेवा! आज इच्छा करणें व कृती करणें हे तुमच्याठायीं आपल्या सत्संकल्पासाठीं देवच साधून देईल या अभिवचनावर विश्वास ठेवा.

    देव, जो क्षणोक्षणी आपल्या कृपेने काम करत असतो, भविष्यात आम्हांवर जी कृपा केलीं जाईल त्याविषयीच्या अभिवचनाचा अनुभव आपल्याला वर्तमान समयी चाखावयांस देतो. आपण आपलें तारण कसे साधून घ्यावे हे जेव्हा पौल आपल्याला स्पष्ट करून सांगतो तेव्हां पौलाचा जोर आम्हांवर भूतकाळात झालेंल्या कृपेविषयी आपण कृतज्ञ असावे यावर नाहीं. मी असे म्हणत आहे याचे शुद्ध कारण म्हणजें हे कीं अनेक ख्रिस्ती लोकांना जेव्हा विचारले जाते कीं आज्ञाधारकपणामागे हेतू काय असावा, तेव्हां आपण असे कृतज्ञतेमुळें करतो असे ते म्हणतील. परंतु पौल जेव्हा आमच्या कृती मागील हेतू आणि सामर्थ्य याबद्दल बोलतो तेव्हा तो यावर जोर देत नाहींये. देवानें जे अद्याप केलेंलें नाहीं ते तो साध्य करून देईल त्यावर विश्वास ठेवण्यावर तो जोर देत आहे, केवळ त्यानें जे केलें आहे त्यावर नाहीं. आपलें तारण साधून घ्या! का? आणि ते कसे? कारण देव प्रत्येक क्षणासाठीं नवी झालेंली कृपा पुरवितो. जेव्हां जेव्हां तुम्हीं इच्छा व कृती करता, तेव्हां तेव्हां ती इच्छा करणें व ती कृती करणें तुम्हांमध्यें तोच साध्य करून देत असतो. येणाऱ्या घटकेसाठीं आणि भावी काळांत येणाऱ्या हजारो वर्षांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठीं ह्या सत्यावर विश्वास ठेवा.

    भविष्यात जी कृपा केलीं जाईल तिचे सामर्थ्य जिवंत ख्रिस्ताचे सामर्थ्य आहे –आपल्या प्रत्येक भावी क्षणी आपल्याठायीं ती कृती साधून द्यावयांस तो सदासर्वदा आम्हांबरोबर असतो. म्हणून जेव्हा पौल त्याच्यावर झालेंल्या देवाच्या कृपेच्या परिणामाचे वर्णन करतो तेव्हा तो म्हणतो, “ख्रिस्तानें माझ्या हातून न घडवलेले काहीं सांगण्याचे धाडस मी करणार नाहीं; तर परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे म्हणून त्यानें माझ्या शब्दांनी व कृतींनी, .... जे जे घडवले तेच मी सांगतो” (रोमकरांस 15:18).

    यास्तव, ज्याअर्थी ख्रिस्तानें त्याच्या सेवाकार्याद्वारे जे काहीं साध्य केलें ते सोडून इतर काहींही बोलण्याचे त्यानें धाडस केलें नाहीं, आणि तरीही खरेतर ती कर्मे त्यानें केलीं, त्याअर्थी कृपने त्याच्या सेवेद्वारे जे जे साध्य केलें तो केवळ त्याबद्दल सांगतो (1 करिंथकरांस 15:10), म्हणजें याचा अर्थ असा कीं, कृपा जे सामर्थ्य साध्य करते ते ख्रिस्ताचे सामर्थ्य आहे.

    याचा अर्थ असा कीं पुढील पाच मिनिटांसाठीं आणि पुढील पाच दशकांच्या सेवेसाठीं आपल्याला ज्या सामर्थ्याची गरज आहे ते सामर्थ्य सर्वशक्तिमान ख्रिस्ताची भावी कृपा होय, जो युगानुयुग आम्हांबरोबर आहे - आपल्या सत्संकल्पासाठीं इच्छा करणें व कृती करणें हे साधून देण्यासाठीं सदैव तत्पर.

    5 min
  • 12 July : विश्वास आमचे दोष, लोभ, आणि भिती दूर घालवितो

    ताकींद देण्याचा हेतू हा आहे कीं, शुद्ध अंतःकरणात, चांगल्या विवेकभावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीति व्यक्त व्हावी. (1 तीमथ्य 1:5)

    येथें पौलाचा मुख्य हेतू प्रीतिवर जोर देणें आहे. आणि या थोर गाभाऱ्यातून स्वाभाविकपणें उद्भवणाऱ्या गोष्टींपैकीं एक आहे निष्कपट विश्वास. नक्कीच प्रीति ही विश्वासातून उद्भवते याचे कारण हे आहे कीं देवाच्या कृपेवरील विश्वास प्रीतिस अडखळण आणणाऱ्या पापी शक्तींस आमच्या अंतःकरणातून दूर करतो.

    जर आम्हांला दोषी असल्यासारखे वाटत असेल, तर आमचा कल आत्मकेंद्रित नैराश्य आणि स्वतःवर कींव वाटणाऱ्या भावनेंत लोळत पडून राहण्याकडें असतो, इतरांच्या गरजांकडें पाहणें किंवा त्यांची काळजी करणें तर दूर राहिले. किंवा आपण आपला दोष लपविण्यासाठीं ढोंग करीत बसतो, आणि म्हणून नात्यांमधील सर्व खरेपणा नष्ट करून बसतो, ज्यामुळें खरे प्रेम अशक्य होते. किंवा आपण आपला स्वतःचा दोष कमी दाखविण्यासाठीं इतर लोकांच्या चुकांबद्दल बोलतो, म्हणजें असे काहीं जी प्रीति कधी करीत नाहीं. म्हणून, जर आम्हीं प्रीति करणार असू, तर आम्हांला दोषाच्या विनाशकारक प्रभावांवर मात करावी लागेल.

    भितीचेही असेच आहे. जर आम्हांला भिती वाटत असेल, तर मंडळीत आलेंल्या अनोळखी व्यक्तीजवळ आम्हीं जाणार नाहीं ज्याला कदाचित स्वागत आणि प्रोत्साहनाच्या शब्दाची गरज असू शकते. किंवा पाचारण म्हणून आम्हीं सरहद्दीवरील मिशनचा नाकार करू शकतो, ते फार जोखिमेचे काम वाटते. किंवा आपण अतिरिक्त विम्यासाठीं पैसे वाया घालवत असू, आणि सर्व प्रकारच्या लहान-सहान भयगंडाने घाबरत असू, इतके कीं आम्हीं स्वतःमध्यें गुरफटलेले राहतो आणि इतरांच्या गरजा आम्हांला दिसू शकत नाहींत. या सर्व गोष्टी प्रीतिच्या विपरीत आहेत.

    लोभाच्या बाबतीतही हेच खरे आहे. जर आम्हीं लोभी असू, तर आम्हीं चैनविलासावर पैसे खर्च करीत राहणार - तो पैसा जो सुवार्ता प्रसारासाठीं गेला पाहिजे. आम्हीं कुठलाही धोका पत्करत नाहीं, आमची मूल्यवान संपत्ति आणि आर्थिक भविष्य धोक्यात येईल अशी भिती आम्हांला वाटते. आम्हीं लोकांऐवजी ऐहिक वस्तूंवर लक्ष केंद्रिंत करतो, आणि लोकांकडें आमच्या भौतिक लाभासाठीं संसाधने म्हणून पाहतो. यामुळें प्रीतिचा नाश होतो.

    पण भविष्यातील कृपेवरील विश्वास दोष आणि भिती आणि लोभ यांस अंतःकरणातून दूर सारून प्रीति उत्पन्न करतो.

    विश्वास दोष दूर करतो कारण तो त्या आशेस दृढ धरून ठेवतो कीं ख्रिस्ताचा मृत्यू आता आणि सर्वकाळासाठीं निर्दोषमुक्तता आणि नीतिमत्व प्राप्त करण्यासाठीं पुरेसा आहे (इब्री 10:14).

    विश्वास भय घालवून टाकतो कारण तो या अभिवचनावर अवलंबून राहतो, “तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे,...........मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करतो, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो” (यशया 41:10).

    आणि विश्वास लोभ दूर घालवून टाकतो कारण त्याला ही खात्री असते कीं ख्रिस्त हा त्या सर्व संपत्तीपेक्षा जी हे संपूर्ण जग देऊ करते, मोठा आहे (मत्तय 13:44).

    म्हणून जेव्हा पौल म्हणतो, “ताकींद देण्याचा हेतू हा आहे कीं... निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीति व्यक्त व्हावी”, तेव्हा तो प्रीतिस अडखळण आणणाऱ्या सर्व अडखळणांवर मात करणाऱ्या विश्वासाच्या प्रचंड सामर्थ्याविषयी बोलत आहे. जेव्हा आम्हीं विश्वासाचे युद्ध करतो - दोष आणि भिती आणि लोभास मारणाऱ्या देवाच्या अभिवचनांवर विश्वास करण्यासाठींचा लढा - तेव्हा आपण प्रीतिसाठीं लढा देत असतो.

    4 min
  • 11July : आपण विश्वासाने आत्म्याचा अनुभव घेतो

    जो तुम्हांला आत्मा पुरवतो व तुमच्यामध्यें अद्भुते करतो, तो नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो कीं विश्वासपूर्वक ऐकण्याकडून? (गलती 3:5)

    प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीमध्यें पवित्र आत्मा वस्ती करून राहतो. प्रेषित पौल म्हणतो, “जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेंला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाहीं” (रोम 8:9). आत्मा तुमच्याकडें पहिल्यांदा तेव्हा आला जेव्हा तुम्हीं रक्ताने विकत घेतलेल्या परमेश्वराच्या अभिवचनांवर विश्वास ठेवला. आणि आत्मा याच माध्यमाद्वारे येत राहतो आणि कार्य करत राहतो.

    म्हणून पौल गलती 3:5 मध्यें अलंकारिक शब्दांत असे विचारतो, “जो तुम्हांला आत्मा पुरवतो व तुमच्यामध्यें अद्भुते करतो, तो नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो कीं विश्वासपूर्वक ऐकण्याकडून?“ उत्तर आहे: “विश्वासपूर्वक ऐकण्याकडून.”

    तर अशाप्रकारे, आत्मा पहिल्यांदा आला, आणि विश्वासपूर्वक ऐकण्याकडून आत्म्याचा पुरवठा होत राहतो. जे काहीं तो आमच्यामध्यें आणि आमच्याद्वारे साध्य करतो ते सर्व तो विश्वासाद्वारे करतो.

    जर तुम्हीं माझ्यासारखे असाल, तर तुमच्या जीवनात पवित्र आत्म्याने सामर्थ्याने कार्य करावें अशी प्रबळ उत्कंठा  तुम्हांला वेळोवेळी होत असेलच. कदाचित तुम्हीं तुमच्या जीवनात अथवा तुमच्या कुटुंबात किंवा मंडळीत किंवा शहरात देवाच्या आत्म्याच्या वर्षावासाठीं त्याचा धावा करत असाल. अशाप्रकारचा धावा अथवा आक्रोश योग्य आणि चांगला आहे. येशूनें म्हटले, “तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतांत त्यांना तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?” (लूक 11:13).

    पण देवाच्या विशिष्ट अभिवचनांवर विश्वास करण्याद्वारे विपुलतेने आत्म्याच्या कार्यासाठीं स्वतःस तयार करण्यात मी विफल आहे हे मला माझ्या स्वतःच्या जीवनात बरेचदा आढळून आलें आहे. माझ्या बोलण्याचा अर्थ केवळ हे अभिवचन नाहीं कीं आम्हीं मागितल्यावर आत्मा येईल. माझ्या बोलण्याचा अर्थ त्यां सर्व इतर मौल्यवान अभिवचनांकडें संकेत करणें आहे जी प्रत्यक्ष आत्म्याबद्दल नाहींत, पण कदाचित माझ्या भविष्यासाठीं देवाच्या तरतूदीविषयी आहेत - उदाहरणार्थ, “माझा देव तुमची सर्व गरज पुरवील” (फिलिप्पै 4:19). विशिष्ट परिस्थितींसाठीं विशिष्ट अभिवचनांवरील विश्वासाच्या विशिष्ट कृतींद्वारे देवाचा आत्मा सतत आणि सामर्थ्यवान मार्गाने पुरविला जातो. त्यानें जे करण्याचे अभिवचन दिलें आहे ते करण्यासाठीं मी आत्ताच ह्या क्षणी त्याच्यावर विश्वास ठेवतो का?

    कित्येक ख्रिस्ती लोकांच्या जीवनात आत्म्याच्या सामर्थ्याचा शोध घेत असतांना त्यांच्या अनुभवांत उणीव याच गोष्टीची असते. “विश्वासपूर्वक ऐकण्याकडून” (गलती 3:5) आत्मा आम्हांला पुरवला जातो - स्वतः आत्माविषयीच्या फक्त एक दोन अभिवचनांवरील विश्वासाद्वारे नाहीं, तर आम्हास ज्या गोष्टीची गरज आहे ती करण्यासाठीं, आणि ती आमच्यासाठीं घडून यावी म्हणून आमच्या भविष्यातील देवाच्या आत्म्याचे समाधान देणारे देवाचे सान्निध्य या सर्व अभिवचनांवरील विश्वासाद्वारे.

    4 min
  • 10 July : अभिमानास्पद कर्म विरुद्ध विनम्र विश्वास

    त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, ‘प्रभो, प्रभो, आम्हीं तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केलीं नाहींत काय?’ (मत्तय 7:22)

    “विश्वासा” मागची मानसिकता आणि “कर्माच्या” मागची मानसिकता यातील फरक विचारात घ्या.

    स्वतःच्या बळावर एखादी गोष्ट साध्य केलीं या गर्वाच्या भावनेने कर्माच्या मानसिकतेंचे समाधान प्राप्त होते. तो उभ्या खडकावर चढण्याचा प्रयत्न करेल, किंवा कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदाऱ्या हाती घेईल, किंवा युद्ध क्षेत्रात जीव धोक्यात घालेल, किंवा मॅरेथॉनमध्यें वेदना सहन करील, किंवा कित्येक आठवडे धार्मिक प्रवृत्तीने उपवास करेल - सर्व काहीं स्वतःच्या इच्छेच्या बळाने आणि स्वतःच्या शरीराच्या जोमाने समोर असलेले आव्हान जिंकण्याच्या समाधानासाठीं.

    कर्म-केंद्रित मानसिकता विकोपाला जाऊ शकते आणि दुसऱ्याला श्रेय देणें, आत्म्याचा दीनपणा व नैतिकता याविरुद्ध बंड करून स्वतःच्या स्वातंत्र्याविषयीची आणि ‘मीच माझा मार्गदर्शक’ याविषयी आणि स्वतःच्या कामगिरीविषयी आपली प्रीति व्यक्त करू शकते (गलती 5:19-21). पण ही तीच स्व-निर्धारित, आत्मगौरवी कर्म-केंद्रित मानसिकता आहे - मग ते अनैतिक होणें असो किंवा अनैतिक वागणुकींविरुद्ध धर्मयुद्ध करणें असो. यांत सर्वसामान्य कारक म्हणजें स्वदिशानिर्देशन, आत्मनिर्भरता आणि आत्म-गौरव. या सर्वांमध्यें, कर्म-केंद्रित मानसिकतेचे मूलभूत समाधान म्हणजें एक खंबीर, स्वायत्त आणि शक्य असल्यास, विजयी आत्मनिर्भरतेचा आस्वाद.

    विश्वासाची मानसिकता पूर्णपणें वेगळीच असते. जेव्हा तो भविष्याकडें पाहतो त्यावेळी त्याची इच्छा बळकट असते. परंतु ज्या गोष्टीची तो इच्छा करतो ती म्हणजें येशूमध्यें परमेश्वर आपल्यासाठीं जे काहीं आहे त्या सर्व गोष्टींना अनुभवाने जाणून घेण्यांत पूर्ण समाधान प्राप्त करण्याची.

    जर “कर्म” स्वतःला अडखळणावर विजय मिळविल्याचे समाधान प्राप्त करू पाहते, तर “विश्वास” देवानें अडखळणावर विजय मिळविला या समाधानाचा आस्वाद घेतो. कर्म सक्षम, बलवान आणि चतूर म्हणून गौरवान्वित झाल्याच्या आनंदाची इच्छा धरतो. विश्वास देवाला त्याचे कर्तुत्व आणि बळ आणि बुद्धी आणि कृपेसाठीं गौरवान्वित होतांना पाहण्याची उत्कंठा करतो.

    आपल्या धार्मिक स्वरूपात, कर्मे नैतिकतेचे आव्हान स्वीकारतांत, त्याच्या अडखळणांवर मोठ्या कष्टाने विजय मिळवतांत आणि त्याची मान्यता व प्रतिफळ म्हणून देवाकडें आपण विजयी झाल्याचा प्रस्ताव सादर करतांत. विश्वास देखील, नैतिकतेचे आव्हान स्वीकारतो, परंतु केवळ देवाच्या सामर्थ्याचे साधन बनण्याचा एक प्रसंग म्हणून. आणि जेव्हा विजय मिळविला जातो तेव्हा विश्वास आनंद करतो कीं सर्व गौरव आणि उपकारस्तवन देवाचे आहेत.

    4 min
  • 9 July : येशूनें ज्यां सहा प्रकारे खिन्नतेस लढा दिला

    मग त्यानें पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले आणि तो खिन्न व अति कष्टी होऊ लागला. (मत्तय 26:37)

    ज्या दिवशी येशूला वधस्तंभावर खिळण्यात आलें त्याच्या आदल्या रात्री येशूचा अंतरात्मा ज्यां अति कष्टांत होता त्याचे पवित्र शास्त्र आम्हांला एक अद्भुत ओझरते दर्शन देते. येशूनें ज्या प्रकारे औदासिन्य अथवा खिन्नतेविरुद्ध आपला गंभीर लढा दिला तो पहा आणि त्याद्वारे शिका.

    1. त्यानें त्याच्यासोबत राहण्यासाठीं काहीं जवळच्या मित्रांची निवड केलीं. “त्यानें पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले” (मत्तय 26:37).

    2. त्यानें आपलें अंतःकरण त्यांच्यापुढे मोकळे केलें. त्यानें त्यांना म्हटले, “‘माझा जीव’ मरणप्राय, ‘अति खिन्न झाला आहे,’ तुम्हीं येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा” (मत्तय 26:38).

    3. त्यानें या लढ्यात त्यांस मध्यस्थीची आणि सहभागी होण्याची विनंती केलीं. “त्यानें पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले” (मत्तय 26:38).

    4. त्यानें प्रार्थनेत पित्यासमोर आपलें अंतःकरण ओतले. “हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो” (मत्तय 26:39).

    5. त्यानें देवाच्या सार्वभौम बुद्धीत आपल्या अंतःकरणास विसावा दिला. “तथापि माझ्या इच्छेप्रमाणें नको तर तुझ्या इच्छेप्रमाणें होवो” (मत्तय 26:39).

    6. वधस्तंभाच्या दुसऱ्या बाजूला त्याची वाट पाहत असलेल्या गौरवी भविष्यातील कृपेवर त्यानें आपलें डोळे लावले. “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्यानें लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडें बसला आहे” (इब्री 12:2).

    जेव्हा तुमच्या भविष्यास भेडसावणारी अशी काहीं गोष्ट तुमच्या जीवनात घडते, तेव्हा हे लक्षात ठेवा: तुमच्या अंतःकरणातील स्फोटकाचे पहिले आघात-तंरग, जसे येशूनें गेथशेमाने येथे अनुभवले, पाप नाहीं. खरा धोका त्याच्या अधीन होणें आहे. त्यास बळी पडणें पाप आहे. कुठलाही आत्मिक लढा न देणें. आणि त्या पापमय शरणागतीचे मूळ आहे अविश्वास - भविष्यातील कृपेत विश्वासासाठीं लढा देण्यात अपयश. येशूमध्यें देव आपल्यासाठीं जे अभिवचन देतो त्यास जोपासण्यात अपयश.

    गेथशेमानेमध्यें येशू आपल्याला दुसरा मार्ग दाखवतो. तो वेदनारहित नाहीं, आणि उदासीन नाहीं. त्याचे अनुसरण करा. तुमचे विश्वासू आत्मिक मित्र शोधून काढा. आपलें अंतःकरण त्यांच्यापुढे मोकळे करा. त्यांना विनंती करा कीं त्यांनी तुमच्यासोबत जागे राहावे आणि प्रार्थना करावी. तुमचे अंतःकरण पित्यापुढे ओता. देवाच्या सार्वभौम बुद्धीत विसावा घ्या. आणि देवाच्या मौल्यवान आणि आलिशान अभिवचनांत तुमच्यापुढे जो आनंद ठेवण्यात आला आहे त्यावर तुमचे डोळे लावा.

    4 min
  • 8 July : तारणदायी विश्वास एकमेकांना क्षमा करण्यांत आनंदी होतो

    आणि तुम्हीं एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवानें ख्रिस्ताच्या ठायीं तुम्हांला क्षमा केलीं आहे तशी तुम्हींहि एकमेकांना क्षमा करा. (इफिस 4:32)

    तारणदायी विश्वास केवळ हा विश्वास धरणें नाहीं कीं तुम्हांला क्षमा करण्यात आली आहे. तारणदायी विश्वास पापाच्या भयावहतेकडें पाहतो, आणि मग देवाच्या पवित्रतेकडें पाहतो, आणि आत्मिकरित्या हे समजतो कीं देवाची क्षमा अवर्णनीयरित्या किती गौरवी, किती रमणीय आहे. आपण केवळ ती ग्रहण करीत नाहीं; तर आपण तिची वाखाणणी देखील करतो. अशा थोर, क्षमा करणाऱ्या देवासोबत आमच्या नवीन मैत्रीने आम्हीं संतुष्ट आहोत.

    देवाच्या क्षमेत विश्वासाचा अर्थ केवळ हा समज नाहीं कीं आम्हीं त्या परिस्थितीतून बचावलो आहोत. त्याचा अर्थ ह्या सत्याचा आस्वाद घेणें म्हणजें क्षमा करणारा देव हा विश्वातील सर्वात मूल्यवान सत्य आहे. तारणदायी विश्वास देवानें क्षमा केलीं आहे याची कदर करतो, आणि तेथून क्षमा करणाऱ्या देवाची कदर करतो - आणि येशूमध्यें आमच्यासाठीं तो जे काहीं आहे. ह्या अनुभवाचा आम्हीं क्षमा करणारे लोक बनावे यावर एक मोठा प्रभाव पडतो.

    आमची क्षमा विकत घेण्याचे मोठे कार्य भूतकाळात घडून आलें आहे - ख्रिस्ताचा वधस्तंभ. मागे वळून पाहण्याद्वारे, आपण त्या कृपेविषयी शिकतो ज्यात आम्हीं सदैव स्थिर राहणार आहोत (रोम 5:2). आम्हास हे कळते कीं, आमच्यावर आता प्रीति करण्यात आली आहे आणि आमचा स्वीकार करण्यात आला आहे, आणि हे सदैव तसेच असेल. आम्हास हे कळते कीं जिवंत देव क्षमा करणारा देव आहे.

    परंतु आमच्या क्षमेचा अनुभव करण्याचे मोठे कार्य भविष्यात सदाकाळ सुरू राहते. क्षमा करणाऱ्या थोर परमेश्वरासोबत आमचे आनंदमय सहभागित्व सदाकाळ टिकते. म्हणून, क्षमेसाठीं स्वातंत्र्य, जे क्षमा करणाऱ्या देवासोबतच्या या सर्व समाधानी सहभागित्वातून प्रवाहित होते, जोपर्यंत आम्हीं आहोत तोपर्यंत ते टिकून राहते.

    मला हे कळून आलें आहे कीं जर तुमच्या विश्वासाचा अर्थ फक्त हा आहे कीं तुम्हीं वधस्तंभाकडें मागे फिरून पाहिले आहे आणि असा निष्कर्ष काढला आहे कीं तुम्हीं परिस्थितीतून बाहेर पडला आहात, तर कटुत्व बाळगत राहणें शक्य आहे. म्हणूनच खरा विश्वास काय आहे या विषयी सखोल शोध घेणें मला भाग पडले आहे - फक्त हा दिलासा नाहीं कीं मी बचावलो आहे, पण येशूमध्यें देव माझ्यासाठीं जो काहीं आहे त्या सर्वासोबत हे गंभीर समाधान देखील. हा विश्वास फक्त हे पाहण्यासाठीं मागे पाहत नाहीं कीं आम्हीं तारले गेले आहोत, पण अशा परमेश्वराकडें पाहण्यासाठीं व त्याचा आस्वाद घेण्यासाठीं मागे पाहतो जो आम्हांला त्याच्या सोबतच्या सहभागित्वात अंतहीन समेटाचे उद्याचे भविष्य प्रदान करतो. अशा क्षमा करणाऱ्या देवासोबत समाधानकारक सहभागित्व आम्हीं क्षमा करणारे लोक व्हावे या दृष्टीनें महत्वाचे आहे.

    4 min
  • 7 July : जेव्हा कोणी ख्रिस्ती बांधवतुम्हांला दुखावतो

    त्यानें स्वत: तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली’, ह्यासाठीं कीं, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठीं जगावे. त्याला बसलेल्या ‘माराने तुम्हीं निरोगी झाला आहात.’ (1 पेत्र 2:24)

    पश्चाताप करणाऱ्या ख्रिस्ती बंधुभगिनींविरुद्ध आपल्या मनांत कटुत्व न बाळगण्याचे मूलतत्त्व काय आहे?

    आमच्याविरुद्ध घडलेल्या भयंकर अपराधामुळें आमचा नैतिक संताप फक्त या कारणास्तव नाहींसा होत नाहीं कीं अपराध करणारा किंवा दुखविणारा ख्रिस्ती आहे. वस्तुत:, आम्हांला आणखीच विश्वासघात झाल्यासारखे वाटू लागते. आणि त्या अपराधामुळें झालेंलें दु:ख आणि वाईट वर्तणूक यांच्या तुलनेत एक साधारण, “मला खेद आहे” किंवा “I’m sorry” असे वाक्य बहुधा अतिशय अयोग्य किंवा अपुरेच वाटते.

    पण या बाबतीत आपण सोबतच्या ख्रिस्ती व्यक्तींशी व्यवहार करीत आहोत आणि आमचा अपराध करणाऱ्याविरुद्ध देवाच्या क्रोधाचे अभिवचन लागू होत नाहीं, याचे कारण “ख्रिस्त येशूमध्यें असलेल्यांना दंडाज्ञा नाहींच” (रोम 8:1). “कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपलें तारण व्हावे म्हणून देवानें आपल्याला नेमले आहे” (1 थेस्सल 5:9). असे वाटते कीं त्यांचा त्यातून बचाव होणार आहे!

    आम्हांला न्याय मिळेल ही स्वत:ला खात्री करून देण्यासाठीं आम्हीं कोठे वळणार आहोत? कीं ख्रिस्ती विश्वास म्हणजें गंभीर पापांकडें वाकोल्या दाखविणें नाहीं?

    उत्तर हे आहे कीं आम्हीं ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडें पाहतो. खरे विश्वासणारे आमच्याविरुद्ध जे काहीं अपराध करतांत त्यांचा सूड येशूच्या मृत्यूमध्यें घेण्यात आला होता. हे सरळ परंतु ह्या आश्चर्यकारक तथ्यामध्यें सूचित करण्यात आलें होते कीं देवाच्या सर्व लोकांची सर्व पापे येशूवर लादण्यात आली. “आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले” (यशया 53:6; 1 पेत्र 2:24).

    ख्रिस्ताचे दु:खसहन ही खरी शिक्षा होती आणि तुम्हांला कधी तुमच्या सोबतच्या ख्रिस्ती व्यक्तीद्वारे मिळालेल्या प्रत्येक दुखण्यावर देवाची भरपार्इ आहे. म्हणून, ख्रिस्ती विश्वास पापाला कमी लेखत नाहीं. तो आमच्या दु:खात अपमान जोडत नाहीं.

    या उलट, हे सत्य आमच्या विरुद्ध केलेंल्या अपराधांना गांभिर्याने घेते, कीं त्यांचा उपाय करण्यासाठीं देवानें दु:ख सहन करण्यासाठीं आपला स्वत:चा पुत्र दिला, आमच्याविरुद्ध कोणी केलेंल्या अपराधासाठीं आम्हीं त्यांस जे दु:ख देऊ शकतो त्यापेक्षा त्याला अधिक दु:ख देण्यात आलें. जर आपण आपल्यासोबतच्या विश्वासणाऱ्याविरुद्ध मनांत कटुत्व धरून राहतो, तर खरे म्हणजें आपण असे म्हणत असतो कीं ख्रिस्ताचा वधस्तंभ देवाच्या लोकांच्या पापांची पुरेशी भरपार्इ नव्हती. हा ख्रिस्ताचा आणि त्याच्या वधस्तंभाचा अपमान आहे , आणि देवाचे मुल म्हणून तो अपमान तुम्हीं करावा अशी तुम्हीं कल्पनाहीं करू शकत नाहीं.

    4 min
  • 6 July : ख्रिस्तानें कटुत्वावर कसा विजय मिळविला

    त्याची निंदा होत असता त्यानें उलट निंदा केलीं नाहीं; दुःख भोगत असता त्यानें धमकावले नाहीं; तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडें स्वतःला सोपवून दिलें. (1 पेत्र 2:23)

    येशूच्या विरोधात जे पाप करण्यात आलें त्यापेक्षा अधिक गंभीरपणें कोणाविरुद्धही पाप करण्यात आलें नाहीं. त्याच्या विरुद्ध शत्रूत्वाचा जो प्रत्येक कण व्यक्त केला गेला त्यांस तो पूर्णपणें अपात्र होता.

    आज पर्यन्त या जगांत असा कोणीही होऊन गेला नाहीं ज्याने येशूपेक्षा जास्त आदरास पात्र असे जीवन जगले असेल; आणि त्याच्यापेक्षा जास्त अपमान आणखी कोणाचाही झाला नाहीं.

    जर कोणाला संतप्त आणि कटू होण्याचा आणि सूड घेण्याचा अधिकार असेल तर तो म्हणजें येशू होता. ज्यांचे अस्तित्व त्यानें राखून ठेवले होते त्या दुष्टांनी त्याच्या तोंडावर थुंकले तेव्हा त्यानें स्वतःवर कसा संयम ठेवला? पहिले पेत्र 2:23 याचे उत्तर देते: “त्याची निंदा होत असता त्यानें उलट निंदा केलीं नाहीं; दुःख भोगत असता त्यानें धमकावले नाहीं; तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडें स्वतःला सोपवून दिलें.”

    या वचनाचा अर्थ असा आहे कीं देवाच्या न्यायत्वपूर्ण न्यायाच्या भावी कृपेवर येशूचा विश्वास होता. त्यानें भोगलेल्या सर्व अपमानांचा सूड घेण्याची त्याला गरज नव्हती, कारण त्यानें तो विषय देवाकडें सोपविला होता. त्यानें आपला सूड देवाच्या हातांत सोडून दिला आणि उलट त्यानें आपल्या शत्रूंसाठीं प्रार्थना केलीं: “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतांत हे त्यांना समजत नाहीं” (लूक 23:34).

    पेत्र आपल्याला येशूच्या विश्वासाचे हे ओझरते दर्शन देतो यासाठीं कीं आपण स्वतः असे जीवन कसे जगावे हे आम्हांला शिकता यावें. तो म्हणाला, “कारण ह्याचकरता (धैर्याने कठोर वागणूक सहन करण्यासाठीं) तुम्हांला पाचारण करण्यात आलें आहे... कारण ख्रिस्तानेंही तुमच्यासाठीं दुःख भोगले आणि तेणेंकरून तुम्हीं त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्यानें तुमच्याकरता कित्ता घालून दिला आहे” (1 पेत्र 2:21).

    देव जो उत्तम न्यायाधीश, त्यानें जे करण्याचे अभिवचन दिलें होते त्यावरील विश्वासाने जर ख्रिस्तानें कटुत्वावर आणि सूडावर विजय मिळविला, तर वाईट वागणूक मिळाल्याबद्दल कुरकुर करण्याचा आपल्याला त्याच्यापेक्षा फारच कमी अधिकार आहे, त्यामुळें आपण हे किती जास्त सहन केलें पाहिजे?

    3 min