
Sign up to save your podcasts
Or


म्हणून आम्हीं धैर्य सोडत नाहीं; परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठीं अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते; आम्हीं दृश्य गोष्टींकडें नाहीं तर अदृश्य गोष्टींकडें लक्ष लावतो; कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. (2 करिंथ 4:16-18)
पौलाला जसा पूर्वी रस्ता दिसत होता तसा तो आता पाहू शकत नाहीं (कारण त्या काळी चष्मा नव्हता). जसे त्याला पूर्वी ऐकू येत असे तसे त्याला आता ऐकू येऊ शकत नाहीं (कारण त्या काळी श्रवणयंत्र नव्हते). मारहाणीपासून जसा तो पूर्वी बरा व्हायचा तसा तो आता लवकर बरा होऊ शकत नाहीं (कारण त्या काळी आजच्याप्रमाणें कोणतीही एंटीबायोटिक औषधे नव्हती). एका नगरातून दुसऱ्या नगरांकडें चालत जात असतांना त्याची शक्ती आता पूर्वीसारखी टिकत नाहीं. त्याच्या चेहऱ्यावर आणि मानेवर सुरकुत्या स्पष्ट दिसू लागल्या आहेत. त्याची स्मरणशक्ती आता पूर्वीसारखी तीक्ष्ण राहिलेली नाहीं. आणि तो कबूलहि करतो कीं ह्या सर्व दुर्बळपणामुळें त्याच्या विश्वासाला आणि आनंदाला आणि धैर्याला मोठा धोका होता.
तरी तो धैर्य सोडत नाहीं. का?
तो धैर्य सोडत नाहीं कारण कीं त्याचा अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. कसा?
त्याच्या अंतरात्म्याचे नवीनीकरण एका अशा गोष्टीमुळें होत असे जी पूर्णपणें अद्भुत अशी होती : अंतरात्म्याचे ते नवीनीकरण अशा गोष्टींकडें लक्ष लावल्यामुळें होत असे ज्यांना तो पाहू शकत नव्हता, म्हणजें ज्यां अदृश्य अशा होत्यां.
आम्हीं दृश्य गोष्टींकडें नाहीं तर अदृश्य गोष्टींकडें लक्ष लावतो; कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. (2 करिंथ 4:18)
ह्याच कारणामुळें पौल धैर्य सोडत नव्हता : म्हणजें जे तो पाहू शकत नव्हता त्यांकडें तो लक्ष लावत होता. तर मग, त्यानें ज्या अदृश्य गोष्टींकडें लक्ष लावलें, तेव्हां त्याला काय दिसलें?
2 करिंथकर 5:7 मध्यें काहीं वचनांनंतर, तो म्हणतो, "आम्हीं विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणें चालत नाहीं." याचा अर्थ असा नाहीं कीं तिथे काय आहे याचा काहीं पुरावा नसताना देखील तो जणू अंधारात झेप घेत होता. याचा अर्थ असा आहे कीं आपण वर्तमान समयी ह्या जगात राहत असतांना ज्यां गोष्टीं वास्तविकरीत्या अति मौल्यवान आणि महत्त्वपूर्ण आहेंत त्यांची समज आपल्या भौतिक इंद्रियांच्या पलीकडें आहे.
आपण या अदृश्य गोष्टींकडें सुवार्तेच्या भिंगातून “पाहतो.” आम्हीं आमच्या धैर्याचे नूतनीकरण करतो—म्हणजें ज्यांनी ख्रिस्ताला देहरूपी साक्षात पाहिले त्यांनी दिलेंल्यां साक्षीमध्यें आपण पाहत असलेल्या अदृश्य, वस्तुनिष्ठ सत्याकडें आपली दृष्टि लावून आम्हीं आपली अंतःकरणें बळकट करतो.
“अंधारातून उजेड प्रकाशित होईल” असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठीं आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे” (2 करिंथ 4:6). "येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश." ज्या क्षणी सुवार्तेद्वारे आमच्या अंतःकरणात हा प्रकाश पडतो त्या क्षणी ते आमच्या दृष्टींस पडते.
हा प्रसंग घडला त्या क्षणी आम्हीं ख्रिस्ती झालो – मग आम्हांला ते समजले असो वा नसो. आणि आपणही पौलाबरोबर आपल्या अंतःकरणाच्या डोळ्यांनी पाहणें गरजेचे आहे, जेणेंकरून आपणही धैर्य सोडून देऊं नये.
जिवात्म्याबरोबर लढणार्या दैहिक वासनांपासून दूर राहा. (1 पेत्र 2:11)
एकदा मी एका माणसाला त्याच्या व्यभिचाराच्या जीवनाविषयी हटकले; आधी मी त्याची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला; मी त्याला त्याच्या पत्नीकडें परत जाण्याची विनंती केलीं. मग मी म्हटलें, "कसं आहे, येशूनें म्हटलें कीं तुम्हीं या पापाशी जर इतक्या गंभीरपणें युद्ध करत नसाल कीं जणू ते जिंकण्यासाठीं तुम्हीं तुमचा स्वतःचा डोळाच उपटून टाकण्यास तयार आहांत, तर तुम्हीं नरकात जाल आणि तेथे सर्वकाळ यातना भोगाल."
विश्वासाचा दावा करणारा एक ख्रिस्ती म्हणून, तो माझ्याकडें केविलवाण्या शंकेने असा पाहू लागला जणू त्यानें त्याच्या आयुष्यात असे पूर्वी काहींही ऐकलें नव्हते; त्यानें विचारलें, "म्हणजें तुम्हांला असं वाटतं कीं एखादी व्यक्ती आपलें तारण गमावू शकते?"
अशाप्रकारे, मी प्रत्यक्ष अनुभवातून वारंवार हें शिकलो कीं असेहि अनेक ख्रिस्ती लोक आहेत जें तारणाविषयीचा असा दृष्टिकोन घेऊन जगतांत जो त्यांना खऱ्या जीवनापासून अलिप्त ठेवतो, जो बायबलमध्यें देण्यांत आलेंल्या धमकावण्यांपासून त्यांचे लक्ष दूर घालवितो, व जो आपण ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्या पापी व्यक्तीला बायबलमध्यें पापाविरुद्ध दिलेंल्यां इशाऱ्यांच्या आवाक्याबाहेर नेऊन ठेवतो. माझ्या मतें, ख्रिस्ती जीवनाविषयीचा असा दृष्टिकोन त्यां हजारो लोकांना खोटा दिलासा देत आहे जे खरे पाहता त्यां रुंद व पसरट मार्गावर आहेत ज्याचा शेवट नाश आहे (मत्तय 7:13).
येशूनें म्हटलें, जर तुम्हीं वासनांशी लढा देत नाहीं तर स्वर्गात तुमचा प्रवेश होणार नाहीं. “तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे” (मत्तय 5:29). मुद्दा हा नाहीं कीं खरे ख्रिस्ती लोक पापा विरुद्धच्या त्यांच्या युद्धांत प्रत्येक वेळी यशस्वी होतांतच. मुद्दा हा आहे कीं आपण लढण्याचा संकल्प करतो, आपण निष्कलंक असे यशस्वी होतो हा मुद्दा नाहीं. आम्हीं पापाबरोबर समेट करत नाहीं; आम्हीं त्याशी युद्ध पुकारतो.
या युद्धांत जे पणांस लागते ते या जागाला एक हजार क्षेपणास्त्रांनी जरी उडविले, किंवा दहशतवाद्यांनी तुमच्या शहरावर बॉम्ब जरी टाकला, किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळें बर्फाचे डोंगर जरी वितळले, किंवा एड्सने सर्व राष्ट्रांना ग्रासून टाकलें त्याहीपेक्षा कितीतरी जास्त आहे. ही सर्व संकटे केवळ शरीरालाच जिवें मारू शकतांत. पण जर आपण वासनेशी लढलो नाहीं तर आपण आपला जीव गमावतो तो कायमचा, सर्वकाळासाठीं.
पेत्र म्हणतो कीं दैहिक वासनां जिवात्म्याबरोबर लढतांत (1 पेत्र 2:11). महायुद्ध किंवा दहशतवाद यांत असलेल्या कोणत्याही धोक्यापेक्षा या युद्धात जे पणास लागते तें अमर्यादपणें खूप आहेत. प्रेषित पौलाने “जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ” यांची सूची दिल्यानंतर असे म्हटलें कीं “त्यामुळें देवाचा कोप होतो” (कलस्सै 3:5-6). आणि देवाचा कोप हा जगातील सर्व राष्ट्रांच्या कोपापेक्षा अति भयंकर आहे.
देव आम्हांला ती कृपा देवो कीं ज्याद्वारे आपण स्वतःच्या व प्रियजनांच्या जिवात्म्यांना गांभीर्याने घेऊं व त्यां विरुद्ध लढणाऱ्या वासनांशी आपलें युद्ध चालू ठेऊ.
कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे. (1 तीमथ्य 6:10)
पौलाने हे लिहिले तेव्हा त्याला काय म्हणायचे होते? तुम्हीं पाप करता तेव्हा पैसा तुमच्या मनात असतो असा त्याचा अर्थ असू शकत नाहीं. आपण अशावेळी देखील पुष्कळ पापें करीत असतो जेव्हा आपल्या डोक्यांत पैशांचा तिळमात्रहि विचार नसतो.
मी त्याचा असा अर्थ सुचवितो : त्याला असे म्हणायचे होते कीं जगात असलेल्यां सर्व वाईट गोष्टी एका विशिष्ट प्रकारच्या अंत:करणांतून येतांत, म्हणजें अशा अंत:करणांतून ज्याला द्रव्याचा लोभ असतो.
मग द्रव्याचा लोभ म्हणजें काय? हिरव्या कागदाची किंवा तांब्याची नाणी किंवा चांदीची नाणी यांची पूजा करणें असा त्याचा अर्थ होत नाहीं. द्रव्याचा लोभ म्हणजें काय हे जाणून घेण्यासाठीं तुम्हांला हा प्रश्न करावा लागेल, द्रव्य किंवा पैसा म्हणजें नेमके काय? मी या प्रश्नाचे उत्तर असे देईन : द्रव्य किंवा पैसा हे फक्त मानव तरतुदींचे एक साधन आहे. द्रव्य म्हणजें देवाकडून मिळविण्याऐवजी तुम्हीं माणसांकडून — इतर मानवांकडून — जे काहीं मिळवू शकता तें.
देव पैशाच्या नव्हे तर कृपेच्या चलनात व्यवहार करतो: “हो तान्हेल्यांनो, तुम्हीं सर्व जलाशयाकडें या, जवळ पैसा नसलेले तुम्हीं या; सौदा करा, खा!” (यशया 55:1). पैसा हे मानवी संसाधनांचे चलन आहे. म्हणून, जें अंत:करण पैशावर प्रीति करते ते असे अंत:करण आहे जे मानवी संसाधने आपल्याला काय देऊ शकतांत यांवर आपली सर्व आशा अडकवून ठेवते, आपल्या सर्व सुखांचा शोध त्यांत घेते व त्यावर भरवसा ठेवते.
अशाप्रकारे, द्रव्याचा लोभ हे अक्षरशः पैशावर असा विश्वास– भरवसा (विश्वास, खात्री) ठेवण्यासारखेच आहे कीं तुमच्या सर्व गरजा पैशानेच पूर्ण होतील आणि त्यातंच तुमचे सर्व सुख व समाधान आहे.
द्रव्याचा लोभ (किंवा पैशावर प्रीति करणें) हा देवाच्या भावी कृपेवरील विश्वासाची जागा घेतो. हे भविष्यासाठीं मानवी संसाधनांवर विश्वास ठेवणें आहे – म्हणजें अशी गोष्ट जी तुम्हीं पैशाने मिळवू शकता किंवा जी तुम्हीं राखून ठेऊ शकता. म्हणून पैशावर प्रेम करणें किंवा पैशावर विश्वास ठेवणें, हे देवाच्या वचनांवर अविश्वासाची खोली आहे. येशूनें मत्तय 6:24 मध्यें म्हटलें, “कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाहीं......तुम्हीं देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाहीं.”
तुम्हीं एकाच वेळी देवावर आणि पैशावर भरवसा ठेवू शकत नाहीं. एकावर विश्वास म्हणजें दुसऱ्यावर अविश्वास. जे अंत:करण पैशावर प्रीति करते - जे आनंदासाठीं पैशावर अवलंबून राहते – ते अंत:करण आपल्या आत्म्याची तृप्ती म्हणून येशूमध्यें देव आपल्यासाठीं जो कांही आहे त्यावर अवलंबून राहत नाहीं.
सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. त्याच्याविरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा. (1 पेत्र 5:8-9)
आपल्या जिवाचे दोन मोठे शत्रू पाप व सैतान हें आहेत. यांत सर्वात वाईट शत्रू पाप हा आहे, कारण सैतान ज्यां एकमेव रणनीतीने आपला नाश करू शकतो तो म्हणजें आपल्याला पाप करायला लावणें आणि आपल्याला पश्चात्ताप करण्यापासून रोखून ठेवणें. केवळ एकच गोष्ट जिचा परिणाम मरण आहे ती म्हणजें अक्षम्य पाप. सैतान नाहीं.
त्यानें आपल्याला पीडावे, कीं बहुंना आपल्याला जिवें देखील मारावें अशी देव स्वतः त्याला काहीं काळासाठीं परवानगी देऊं शकतो, जसे त्यानें इयोबाच्या बाबतींत केलें, किंवा जसें त्यानें स्मुर्णा येथील पवित्र जनांच्या बाबतींत केलें (प्रकटीकरण 2:10); पण सैतान आपला सार्वकालिक नाश करू शकणार नाहीं वा आपलें सार्वकालिक जीवन हिरावून घेऊ शकत नाहीं. त्याची एकमेव रणनीती ज्याद्वारे तो आपल्याला अंतिम हानी पोहोचवू शकतो ती म्हणजें आपल्याला पापांत पाडणें आणि मग पश्चात्ताप करण्यापासून दूर ठेवणें; तोच त्याचा मुख्य हेतू आहे.
तर मग, आपल्याला पापांत पाडणें, त्याचे समर्थन करणें, त्यासाठीं उत्तेजन देणें, त्यांत सहाय्य करणें, त्यांत असलेल्या आनंदाकडें आकर्षित करणें आणि आपला कल पापाकडेंच असावा याची खात्री करून घेणें, आणि एवढेच काय तर आम्हांला विश्वास आणि पश्चात्ताप यांपासून दूर ठेवणें, हाच सैतानाचा मुख्य नित्यक्रम आहे.
आपण हे इफिसकरांस पत्र 2:1-2 मध्यें पाहू शकतो: “तुम्हीं आपलें अपराध व आपली पातके ह्यांमुळें मृत झालेंले होता; त्या पातकांमध्यें तुम्हीं पूर्वी चालत होता. . . अंतरिक्षातील राज्याचा अधिपती... ह्याच्या धोरणाप्रमाणें चालत होता." ह्या जगात पाप करणें हे सैतानाच्या “धोरणाप्रमाणें” चालणें होय. जेव्हा तो नैतिकदृष्ट्या एखादी वाईट गोष्ठ घडवून आणत असतो, ती तो पापाद्वारे घडवून आणत असतो. आपण पाप करतो तेव्हा आपण त्याच्या क्षेत्रात वावरत असतो. आपण त्याच्या धोरणाशी सहमत होतो. आपण पाप करतो तेव्हा आपण सैतानाला वाव देतो (इफिस 4:27).
न्यायाच्या दिवशी आपल्याला दोषी ठरवणारी एकमेव गोष्ट म्हणजें क्षमा न झालेंलें पाप - आजारपण किंवा त्रास किंवा छळ किंवा भीती किंवा भयप्रद स्वप्ने ह्या गोष्टीं नव्हे. सैतानाला हे माहीत आहे. म्हणूनच, त्याचा प्राथमिक जोर ख्रिस्ती लोकांना विचित्र घटनांनी कसे घाबरवायचे यावर नसतो (जरी अशा घटना पुष्कळ होतांत ), तर ख्रिस्ती लोकांना व्यर्थ गोष्टींची मोहिनी घालून त्यांना वाईट विचारांनी कसे भ्रष्ट करावे यावर आहे.
सैतान अशा वेळी आपल्याला गिळून टाकण्याच्या शोधांत असतो ज्यावेळी आपला विश्वास दृढ नसतो, जेव्हा तो भेद्य असतो. ही गोष्ट समजण्यास सोपी आहे कीं सैतानाला ज्या गोष्टीचा नाश करायचा असतो नेमकीं तिच त्याच्या प्रयत्नांचा प्रतिकार करण्याचे शस्त्र आहे. म्हणूनच पेत्र म्हणतो, “त्याच्याविरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा” (1 पेत्र 5:9). म्हणूनच पौल सुद्धा म्हणतो कीं “विश्वासाची ढाल” “त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवते” (इफिस 6:16).
सैतानाचा जर पराभव करायचा असेल तर त्यासाठीं एकमेव रणनीती म्हणजें ही कीं तो ज्या गोष्टीचा नाश करण्याचा सर्वात जास्त प्रयत्न करीत असतो – तो म्हणजें तुमचा विश्वास- त्यांत दृढ असे उभे राहणें.
“शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केलीं; परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठीं मी विनंती केलीं आहे; आणि तू वळलास म्हणजें तुझ्या भावांना स्थिर कर.” (लूक 22:31-32)
वास्तविक पाहता, जरी पेत्र तीन वेळा येशूचा नकार केल्यामुळें वाईटरित्या अयशस्वी झाला, तरी येशूनें त्याच्यासाठीं विनंती करून त्याला पूर्णपणें नाश होण्यापासून वाचवले. तो मोठ्या दुःखाने रडला; त्यानंतर त्याला पुन:स्थापित करण्यांत आलें जे पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्रानें दिलेंल्या उपदेशांत त्याचा आनंद व धैर्य यांमध्यें स्पष्ट दिसून आलें. आपला विश्वास ढळू नये म्हणून येशू आज देखील आपल्यासाठीं मध्यस्थी करत आहे. पौल हे रोमकरांस 8:34 मध्यें सांगतो.
येशूनें अभिवचन दिलें कीं तो आपल्या मेंढरांचे संरक्षण करील; त्यांचा कधीही नाश होणार नाहीं. “माझी मेंढरे माझी वाणी ऐकतांत; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतांत; मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाहीं आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाहीं” (योहान 10:27-28).
याचे कारण हे कीं स्वतः देव आपल्या मेंढरांना विश्वासांत राखून ठेवतो. “ज्याने तुमच्या ठायीं चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे” (फिलिप्पै 1:6).
विश्वासाचे हे युद्ध लढत असतांना आपल्याला स्वबळावर सोडून दिलें जात नाहीं. "कारण इच्छा करणें व कृती करणें हे तुमच्या ठायीं आपल्या सत्संकल्पासाठीं साधून देणारा तो देव आहे" (फिलिप्पै 2:13).
आम्हांला देवाच्या वचनावर भरवसा आहे कीं, जर आपण त्याची संतती आहों, तर तो “देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणांमध्यें येशू ख्रिस्ताच्या द्वारे करील व तो आपल्या इच्छेप्रमाणें करण्यास आपल्याला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करील” (इब्री 13:21).
विश्वास आणि आनंद यांत आपलें टिकून राहणें हे अखेरीस आणि निर्णायकपणें देवाच्याच हातांत आहे. होय, आपण लढले पाहिजे, पण हा लढा आपल्याठायीं साध्य करून देणारा तो देव आहे. आणि तो नक्कीच ते करेल, कारण रोमकरांस 8:30 मध्यें सांगितल्याप्रमाणें, "ज्यांना त्यानें नीतिमान ठरवले त्यांचा त्यानें गौरवही केला." देवाच्या नीतिमान ठरविण्यांत आलेंल्यां लेकरांचे गौरव करणें तितकेच चांगले आहे.
ज्यांना त्यानें विश्वासात आणले आहे आणि नीतिमान ठरवले आहे त्यांपैकीं एकालाही तो गमावणार नाहीं.
मोशे प्रौढ झाल्यावर’ त्यानें आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणें ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणें हे त्यानें पसंत करून घेतले. ‘ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणें’ ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्यानें गणले; कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. (इब्री 11:24-26)
किंवा, सारांश रूपांत थोडक्यांत सांगायचे तर : “मोशे विश्वासाने. . . पापाचे क्षणिक सुख भोगणें ह्यापेक्षा. . . कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती” (इब्री 11:24-26).
विश्वास हा “क्षणिक सुख भोगण्यांत” समाधानी राहत नाहीं. तो आनंदासाठीं व्याकुळ (कासावीस) झालेंला असतो, म्हणजें अशा आनंदासाठीं जो टिकून राहील. कायमचा. आणि देवाचे वचन म्हणते, “जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील; तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे; तुझ्या उजव्या हातांत सौख्ये सदोदित आहेत.” (स्तोत्र 16:11). म्हणून, विश्वास पापाच्या फसव्या सुखांकडें पाहून आपल्या उद्दिष्टांपासून विचलित होत नाहीं. तो ज्या परम आनंदाच्या शोधात असतो तो मिळविण्यापासून तो इतक्या सहजासहजी हार मानणार नाहीं.
देवावरील विश्वासाची भूक भागवणें हीच देवाच्या वचनाची भूमिका आहे. आणि, असे करत असतांना, ते माझ्या मनाला वासनेच्या भ्रामक चवींपासून सोडवते.
सुरुवातीला, वासना मला फूस लावून अशी जाणीव करून देण्याचा प्रयत्न करते कीं जर मी शुद्धतेचा मार्ग स्वीकारला तर मी खरोखरच असे काहीं तरी गमावून बसीन जे मला मोठे सुख व समाधान देऊं शकते. पण मग मी आत्म्याची तलवार उचलतो आणि लढायला लागतो.
माझा विश्वास देवामध्यें असलेले जीवन व शांती यांत समाधानी असावा अशी प्रार्थना मी करत असताना, आत्म्याची तलवार वासनेच्या विषावर असलेले साखरेचे आवरण कोरून टाकते. मग मला दिसून येते कीं ते काय आहे. आणि मला फूस लावणारी त्याची मोहक शक्ती देवाच्या कृपेने धूळीस मिळते.
हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन. (स्तोत्र 42:11)
आपण निराशावादी दृष्टिकोण व उदासीनता -म्हणजें खिन्न झालेंला जीव- यांशी लढा द्यायला शिकण्याची गरज आहे. हा लढा भावी कृपेवरील विश्वासाचा लढा आहे. देव आणि त्यानें भविष्याविषयी जें अभिवचन दिलें आहे त्या सत्याचा आपण स्वतःला उपदेश देऊन हा लढा देत असतो.
स्तोत्रकर्ता स्तोत्र 42 मध्यें हेच करतो. स्तोत्रकर्ता त्याच्या खिन्न झालेंल्यां जीवाला उपदेश देतो. तो स्वतःला धमकावतो व स्वतःशीच वाद घालतो. आणि त्याचा मुख्य युक्तिवाद म्हणजें भविष्यातील कृपा: “देवाची आशा धर! देव भविष्यात तुझ्या निमित्त दर्शन देऊन ज्यां प्रकारे तुझा उद्धार करणार आहे त्यावर विश्वास ठेव. हर्ष-नादाचा दिवस येत आहे. परमेश्वर स्वतः दर्शन देऊन तुला आवश्यक असलेले सर्व सहाय्य पुरवेल. तो सर्वकाळ आम्हांबरोबर राहील असे अभिवचन त्यानें दिलें आहे.”
मार्टिन लॉयड-जोन्स यांना खात्री होती कीं देवाच्या भावी कृपेविषयी स्वतःला सत्याचा उपदेश देण्याविषयीचा हा मुद्दा आध्यात्मिक नैराश्यावर मात करण्यासाठीं अत्यंत निकडीचा आहे. त्यांनी Spiritual Depression नावाचे जे उपयुक्त पुस्तक लिहिलें त्यांत ते पुढीलप्रमाणें असे लिहितांत,
तुमच्या कधी हे लक्षात आलें आहे का कीं तुमच्या जीवनातील दुःख हे मुख्यतः ह्यामुळें आहे कारण तुम्हीं स्वतःशी बोलण्याऐवजी स्वतःचे ऐकत असतां? उदाहरणार्थ, तुम्हीं सकाळी उठल्या उठल्या तुमच्या मनात जें विचार येतांत त्यांवर विचार करा. त्यांचा उगम तुमच्यातून झाला नाहीं, तरी ते तुमच्याशी बोलू लागतांत, ते कालचे अनुत्तरीत प्रश्न परत लक्ष्यांत आणतांत. कुणीतरी तुमच्याशी संवाद साधतोय. . . . तुमचा स्व: तुमच्याशी संवाद साधत आहे. आता स्तोत्र 42 मधील या पुरुषाने जे समाधान काढले ते म्हणजें असे कीं तो त्याच्या स्व:ला त्याच्याशी संवाद साधू देण्याऐवजी तो त्या स्व:शी बोलू लागतो. तो विचारतो “हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास?” त्याचा जीव त्याला खिन्न करत होता, चिरडत होता. म्हणून तो उठतो, आणि म्हणतो, “ हे माझ्या स्व:, जरा ऐक. मी तुझ्याशी जें बोलतो, तें ऐक.” (20–21)
नैराश्याविरुद्ध असलेला आपला लढा देवाच्या वचनांवर विश्वास ठेवण्याविषयीचा लढा आहे. आणि देवाच्या भावी कृपेवरचा विश्वास त्याचे वचन ऐकण्याने येतो. आणि म्हणून स्वतःला देवाच्या वचनातून उपदेश देणें हे या आध्यात्मिक युद्धाचा जीव कीं प्राण आहे.
माझा देह व माझे हृदय ही खचली; तरी देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे. (स्तोत्र 73:26)
जसा कीं मराठीत हा शास्त्रपाठ आहे, या वचनातील क्रियापद शब्दशः केवळ “खचली” असें आहे, "खचू शकते" असे नाहीं. परमेश्वराने पिडलेला आसाफ नावाचा हा स्तोत्रकर्ता म्हणतो, “माझा देह व माझे हृदय ही खचली आहेंत!” मी खिन्न झालों आहे! मी निराश झालों आहे! पण मग लगेचच तो त्याच्या निराशेविरुद्ध एक व्यापक अशा दृष्टिक्षेपांतून अति जोमानें ऐलान करतो : "तरी देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे."
स्तोत्रकर्ता नैराश्याने वैतागून खचत नाहीं. तर तो पलटवार करून आपल्या अविश्वासाबरोबर लढा देतो.
थोडक्यात, तो असे म्हणत आहे, “मी स्वतःमध्यें खूप अशक्त आणि असहाय्य असा आहे आणि मी या गोष्टींशी स्पर्धा करू शकत नाहीं. माझा देह मरणासन्न झाला आहे आणि माझे हृदय जवळजवळ मृत झालें आहे. पण या औदासिनपणाचे कारण काहींही असो, मी नमणार नाहीं. मी स्वतःवर नव्हें, तर देवावर विश्वास ठेवीन. तोच माझें सामर्थ्य व माझा वाटा आहे.”
पवित्र शास्त्रांत औदासिनतेंत बुडलेल्या जीवांशी संघर्ष करणाऱ्या पवित्र जनांची बरीच उदाहरणें आहेत. स्तोत्र 19:7 म्हणते, "परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते." हे या गोष्टीची स्पष्ट कबुली देणें आहे कीं पवित्र जनांच्या जीवाला कधी-कधी पुनरुज्जीवनाची गरज असते. आणि जर असे पुनरुज्जीवन करणें आवश्यक असेल तर एका अर्थाने ते "मृत" असे होते. त्यांना असेच वाटायचे.
दाविद स्तोत्र 23:2-3 मध्यें तेच सांगतो, “तो मला संथ पाण्यावर नेतो. तो माझा जीव ताजातवाना करतो” “आपल्या [देवाच्या] मनासारखा मनुष्य” (1 शमुवेल 13:14) असलेला दाविद ह्याच्या जीवाला सुद्धा पुनरुज्जीवनाची गरज होती. त्याचा जीव तहानेने जणू मृतप्राय झाला होता आणि खचून गेला होता, तरी देव त्याचा जीव संथ पाण्याजवळ घेऊन गेला व त्याला पुन्हा जीवन दिलें.
देवानें या सर्व साक्षी बायबलमध्यें देऊन ठेवल्यात, जेणेंकरून आपण ज्यां ज्यां वेळी नैराश्याने खचतो, आपण त्यांचा उपयोग अविश्वासाशी लढा देण्यांस करावा. आणि आपण अविश्वासाला उद्ध्वस्त करणाऱ्या अशा देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेऊन लढतो: "देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे." आम्हीं त्या उपदेशाने स्वतःला उत्तेजन देतो. आणि आम्हीं तो सैतानाच्या तोंडावर मारतो, व त्या अभिवचनांवर विश्वास ठेवतो.
तू माझ्याकडें वळून माझ्यावर कृपा कर; आपल्या दासाला आपलें सामर्थ्य दे. (स्तोत्र 86:16)
आपल्यावर भविष्यात कृपा व्हावीं अशी सर्व प्रार्थनावीर स्तोत्रकर्ता खंड न पडू देता विनवणी करत असत. देवानें आपली प्रत्येक गरज पूर्ण करावीं अशी ते वारंवार प्रार्थना करतांत. आपण आपल्या प्रत्येक आणीबाणीच्या परिस्थितीसाठीं भविष्यातील कृपेवर दररोज कसे अवलंबून राहावें याचा ते सर्व मिळून आम्हाल्यासाठीं एक सुंदर कित्ता घालून देत आहेत .
खचितच, प्रार्थना हा विषय पवित्रजनांचा आत्मा आणि भविष्यातील कृपेचे अभिवचन यांच्यातील विश्वासाची मजबूत साखळी आहे, यांत शंका नाहीं. आपण सेवेला प्रार्थनेद्वारे टिकून ठेवावें असे जर देवानें प्रयोजन केलेंलें असेल, तर मग सेवा ही भविष्यातील कृपेवरील विश्वासाने टिकून राहावी असे प्रयोजन केलेंलें असणें स्वाभाविक आहे.
तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी साहाय्यासाठीं कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ (इब्री 4:16)
ह्या मूल्यवान वचनाचे मराठीत असलेले भाषांतर अचूक आणि योग्यच आहे, मुख्यत ‘ऐन वेळी’ हे शब्द. हे शब्द संकेत देतांत कीं जेव्हा आपल्याला ‘ऐन वेळी’ देवाची गरज लागते, तेव्हा लगेच तो आमच्या साहाय्यासाठीं धावून येतो. या वचनाचा शब्दशः मुद्दा आहे ‘ऐन वेळी.’
सर्व सेवा ही भावी सेवा असते - एक क्षण दूर, किंवा एक महिना दूर, किंवा एक वर्ष, किंवा एक दशक दूर. त्या दृष्टिने, आपल्या अपुरेपणावर चिंतन करण्यासाठीं आपल्याकडें पुरेसा वेळ आहे. आणि त्या विचाराने जेव्हा आपल्या मनाचा थरकाप उडतो, आपण प्रार्थनेकडें वळले पाहिजे.
प्रार्थना विश्वासाचेच एक स्वरूप आहे जी आपल्याला आजच उद्याच्या सेवेसाठीं समर्थ बनविणाऱ्या कृपेशी जोडते. वेळ खरोखर महत्वाची आहे.
जर ती कृपा वेळेपूर्वी आली किंवा वेळ निघून गेल्यावर आली तर काय होईल? या संदर्भात अत्यंत मौल्यवान असलेल्या वचनाचे इब्री लोकांस 4:16 चे इंग्रजीचे भाषांतर स्पष्ट नाहीं. ते समजण्यासाठीं आम्हांला अधिक शाब्दिक अभिव्यक्ती आवश्यक आहे. आणि ते अभिवचन म्हणजें केवळ "गरजेच्या वेळी साहाय्यासाठीं " कृपा मिळते असे नाहीं, तर असे कीं कृपा देवऐन वेळी देतो.
मुद्दा असा आहे कीं प्रार्थना योग्य वेळी सहाय्यासाठीं भावी कृपेचा शोध घेण्याचा मार्ग आहे. देवाची ही कृपा सदैव “कृपेच्या राजासनाजवळ” ऐन वेळी मिळते. "कृपेचे राजासना" या वाक्यांशाचा अर्थ असा आहे कीं भविष्यातील कृपा विश्वाच्या त्या राजाकडून मिळते जो स्वतःच्या अधिकारयुक्त निर्णयाने ती वेळ ठरवतो (प्रेषितांची कृत्ये 1:7).
त्याची वेळ अचूक आणि पूर्ण आहे, परंतु आपल्या सीमित दृष्टीने ती ऐन वेळी प्रकट होणारी अशी कृपा आहे: "[त्याच्या] दृष्टीने सहस्र वर्षें कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत" (स्तोत्र 90:4). जागतिक स्तरावर, तो राष्ट्रांचा उदय व त्यांच्या पतनाचे समय ठरवितो (प्रेषित 17:26). आणि वैयक्तिक दृष्टीने, “माझे दिवस [त्याच्या] हाती आहेत” (स्तोत्र 31:15).
आपण भविष्यातील कृपेच्या वेळेबद्दल काळजी करतो तेव्हा आपण "कृपेच्या राजासनावर" जाऊन चिंतन केलेंले बरे. आपल्यासाठीं ती वेळ जर योग्य असेल तर कोणतीही गोष्ट कृपा पाठवण्याच्या देवाच्या योजनेत अडथळा आणू शकत नाहीं. भविष्यातील कृपा नेहमीच ऐन वेळी मिळणारी कृपा आहे.