
Sign up to save your podcasts
Or


आम्हीं सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहो ; आमची सर्व धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी झाली आहेत. ( यशया 64:6 )
हे सत्य आहे कीं देवाचे नियमशास्त्र पाळण्यात झालेंली उणीव त्याच्या परिपूर्ण पावित्र्याला असंतुष्ट करते, व आपल्याला न्यायदंडास पात्र ठरवते कारण देव कोणत्याच पापाकडे कृपेने पाहू शकत नाहीं ( हबक्कुक 1:13, याकोब 2:10 -11).
परंतु जुन्या करारामध्यें (व आज देखील हे असेंच आहे) व्यक्तिचा नाश ह्यामुळें होत नसे कीं तो पापविरहित परिपूर्णता प्राप्त करू शकत नसे. त्यांचा नाश यामुळें होत असें कीं, ते देवाच्या दयेच्या अभिवचनावर विश्वास ठेवण्यात अपयशी ठरत असत, विशेषत: ही आशा धरून राहण्यात कीं एक दिवशी देव त्यांना एक तारणकर्ता देईन जो त्याच्या लोकांकरिता सिद्ध असें नितीमत्व होईल "परमेश्वर आमची नीतिमत्ता" ( यिर्मया 23:6, 33:16). जुन्या करारातील पवित्र जनांना ठाऊक होते कीं त्यांचे तारण अशा प्रकारेच होणार होते, आणि विश्वास हा आज्ञापालनाची गुरुकिल्ली होती, आणि आज्ञापालन हा त्यांच्याह्यांच विश्वासाचा पुरावा होता.
ही गोष्ट खूप गोंधळात टाकणारी आहे, जेव्हां लोक म्हणतात कीं केवळ ख्रिस्ताकडून प्राप्त होणार्या नीतीमत्त्वालाच मोल आहे. हे खरे आहे कीं. आपले नीतिमान ठरवले जाणे, आपल्या नीतीमत्वावर अवलंबून नसते - आत्म्याद्वारें देऊ केलेल्यां विश्वासाद्वारें नीतिमान बनणे देखील - नीतीमत्व केवळ ख्रिस्ताद्वारें आपल्याला प्राप्त होते. पण लोक काहीवेळा अविचाराने, मनुष्याच्या सर्व नीतीमत्वाला तुच्छता पूर्वक पाहतात, जसे कीं आपल्यामध्यें कोणत्याच नीतीमत्वाचे कार्य झालें नाहीं ज्याच्यामुळें देवाला संतोष प्राप्त झाला नाहीं, परंतु असें म्हणने उपयोगाचे नाहीं.
ते नेहमी यशया 64:6 चा संदर्भ देतात ज्या मध्यें आपली धर्मकृत्ये "घाणेरड्या वस्त्रासारखी" आहेत असें संगितले आहे.
पण, यशया 64:6 चा संदर्भ पाहता, देवाच्या लोकांची सर्वच धर्मकृत्ये देव स्वीकारत नाहीं असें नाहीं. यशया अश्या लोकांबद्दल बोलत आहे ज्यांचे नीतीमत्व ढोंगीपणाचे आहे. ते खरे नीतीमत्व नाहीं. ह्या वचनाच्या आधीच्या वचनामध्यें यशया म्हणतो, “जे आवडीने धर्माचरण करतात त्यांना तू भेट देतोस " (यशया 64:5).
हे निर्विवादपणे सत्य आहे कीं - येशूच्या क्रूसापूर्वी आणि नंतर, देवाच्या कोणत्याच लोकांचा स्वीकार पवित्र देवाच्या पुढे झाला नसता जर त्यांच्याकडे ख्रिस्ताचे नीतीमत्व नसते ( रोम 5:19; 1 करिंथ. 1:30; 2 करिंथ 5:21). हे खरे आहे ! पण याचा अर्थ असा होत नाहीं कीं, देव त्या नीतिमान" ठरलेल्यां लोकांमध्यें नीतीमत्वाचे कार्य करत नाहीं, जे परिपूर्ण नसले तरी "घाणेरड्या वस्त्रासारखी" नाहीं. खरें पाहता, तो त्यांच्या मध्यें नीतीमत्व निर्माण करतो, आणि हे नीतीमत्व देवासाठीं मौल्यवान आहे, आपल्याला नीतिमान ठरवण्याकरिता नाहीं (कारण आपण केवळ ख्रिस्ता द्वारेंच नीतिमान ठरतो ), तर आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेली देवाची लेकरे आहे याचा पुरावा म्हणून. आणि याच करिता पौल प्रार्थना करतो, आणि आपण देखील हीच प्रार्थना केलीं पाहिजे, जी त्यानें फिलिपै 1:10-11 मध्यें केलीं "असें कीं, जे श्रेष्ठ ते तुम्हीं पसंत करावे ; तुम्हीं ख्रिस्ताच्या दिवसासाठीं निर्मल व निर्दोष असावे ; आणि देवाचे गौरव व स्तुति व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारें जे नीतीमत्त्वाचे फळ त्यानें तुम्हीं भरून जावे."
“कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाहीं, असा आपला प्रमुख याजक नाहीं, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.” (इब्री 4:15).
मी कोणालाही कधीही असे म्हणतांना ऐकलेले नाहीं, ”माझ्या जीवनाचे खरोखर गंभीर धडे सुख आणि विश्रांतीच्या समयातून आले आहेत.“ तर मी सुदृढ पवित्र जणांस असे म्हणतांना ऐकले आहे, ”देवाच्या प्रीतिच्या खोलीचे आकलन करून घेण्यासाठीं आणि त्याजबरोबर खोलवर वाढत जाण्यासाठीं मी केलेंली प्रत्येक महत्त्वाची वाटचाल दुःखातून आली आहे.”
हे एक गंभीर बायबलसंबंधीत सत्य आहे. उदाहरणार्थ:”इतकेच नाहीं, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाहीं हानी असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठीं कीं, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा.” (फिलिप्पै 3:8). अर्थ: वेदना नाहीं, तर लाभ नाहीं.
किंवा: आता मला जर त्याद्वारे ख्रिस्ताचा अधिक लाभ होत असेल, तर मग सर्व गोष्टींचा त्याग केला पाहिजे.
येथे आणखी एक उदाहरण आहे: अर्थ: ”तो पुत्र असूनही त्यानें जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला;” (इब्री 5:8). याच पुस्तकात असे म्हटलेंले आहे कीं त्यानें कधी पाप केलें नाहीं (इब्री 4:15).
म्हणून आज्ञाधारकपणा शिकण्याचा अर्थ हा नाहीं कीं अवज्ञेकडून आज्ञाधारकपणाकडें येतो. याचा अर्थ आज्ञाधारकपणाच्या अनुभवात देवासोबत अधिक खोलवर वाढत जाणे. याचा अर्थ देवाप्रत समर्पणाचा अनुभव करणे जो अन्यथा प्राप्त झाला नसता. दुःखातून हेच प्राप्त होते. वेदना नाहीं, तर लाभ नाहीं.
सॅम्युएल रदरफोर्डने म्हटलें कीं जेव्हां त्यांना दुःखाच्या कालकोठीत टाकण्यात आले तेव्हां त्यांना आठवले कीं थोर राजा नेहमी तेथे त्याचा द्राक्षरस ठेवत असे. चार्ल्स स्पर्जन यांनी म्हटलें, “दुःखाच्या समुद्रात डुबकीं मारणारे दुर्लभ मोती आणतात.”
जेव्हां तुम्हांला काहीं अनोख्या वेदना होतात ज्यामुळे तुम्हांला असे वाटते कीं कर्करोग झाला आहे तेव्हां तुम्हीं तुमच्या प्रिय व्यक्तीवर अधिक प्रीति करीत नाहीं का? आम्हीं खरोखर विचित्र प्राणी आहोत. जर आपल्याजवळ आरोग्य आणि शांती आणि प्रेम करण्यास वेळ असेल तर ती एक पातळ आणि घाईघाईची गोष्ट ठरू शकते. परंतु जर आपण मरणाच्या लागास असू, तर प्रेम ही एक अव्यक्त आनंदाची खोल, संथ नदी बनते, आणि आपण क्वचितच तिचा त्याग करणे सहन करू शकतो.
म्हणून, माझ्या बंधूं आणि भगिनींनो, “नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हां तुम्हीं आनंदच माना.” (याकोब 1:2).
तुम्हीं पापाचे गुलाम होता तेव्हां नीतिमत्त्वासंबंधाने बंधमुक्त होता. तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त होत असे? त्यांचा शेवट तर मरण आहे. (रोम 6:20-21)
जेव्हां त्याच्या पूर्वीच्या देवाचा अनादर करणाऱ्या वर्तनाविषयी ख्रिस्ती व्यक्तीचे डोळे उघडतात, तेव्हां ख्रिस्ती व्यक्तीला लाज वाटणे योग्यच आहे. पौल रोमच्या मंडळीस म्हणतो, “तुम्हीं पापाचे गुलाम होता ...तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त होत असे?”
एके काळी आम्हीं अशाप्रकारे जगत होतो ज्याने देवाचा तिरस्कार होत होता याकडें मागे वळून पाहण्याची आणि वेदना अनुभव करण्याची एक योग्य जागा आहे. निश्चितच, यावर मनन करण्याद्वारे आम्हीं कमकुवत होता कामा नये. पण एक संवेदनशील हृदयाने तरूणपणाच्या मूर्खपणाचा परत विचार करून लाजेच्या प्रतिध्वनींचा अनुभव येवू नये असे होऊ शकत नाहीं, जरी प्रभूसोबत त्याचा सोक्षमोक्ष लावण्यात आलेला असला तरीही.
योग्यप्रकारे लाज वाटणे अत्यंत आरोग्यदायक आणि मुक्तीदायक आहे. पौलाने थेस्सलनीका येथील लोकांस लिहिले, ”ह्या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानत नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका“ (2 थेस्सल 3:14). याचा अर्थ जीवन-परिवर्तन होत असतांना पूर्वीच्या गोष्टींची लाज वाटणे हे योग्य आणि मुक्तीदायक पाऊल आहे, आणि आध्यात्मिक थंडपणा व पापाच्या ऋतूपासून विश्वासणाऱ्याच्या पश्चातापातही. कोणत्याही किंमतीत लाज टाळू शकत नाहीं. देवाच्या आपल्या लोकांसोबत त्याच्या व्यवहारात त्याचे एक महत्वाचे स्थान आहे.
आपण असा निष्कर्ष काढू शकतो कीं चुकींच्या लाजेसाठीं आणि योग्य अशा लाजेसाठीं पवित्र शास्त्राची कसोटी मूलतः परमेश्वर-केन्द्रित आहे.
चुकींच्या ठिकाणी असलेल्या लाजेसाठीं पवित्रशास्त्राची कसोटी म्हणते, ज्या गोष्टीमुळे देवाला मान मिळतो त्यासाठीं लाज वाटता कामा नये, मग इतर लोकांच्या नजरेत त्यामुळे तुम्हीं कितीही दुर्बळ किंवा मूर्ख अथवा चुकींचे का दिसेना. किंवा चुकींच्या लाजेची ही परमेश्वर केन्द्रित कसोटी लागू करण्याची एक दुसरी पद्धत : जोपर्यंत तुम्हीं एक प्रकारे वाईटात सहभागी होत नाहीं तोपर्यंत खरोखर लाजरवाण्या परिस्थितीमुळे लाज वाटून घेऊ नये.
योग्य लाजेची पवित्रशास्त्राची कसोटी म्हणते, देवाचा अनादर करणाऱ्या कोणत्याही गोष्टीत हात असल्याबद्दल लाज वाटू द्या, मग ते तुम्हांला इतरांच्या नजरेत कितीही बळकट किंवा शहाणे किंवा योग्य असल्यासारखे का दाखवत असेना.
आपल्याला लाज वाटली पाहिजे याचे कारण म्हणजें देवाचा अनादर करणाऱ्या वागणूकींसाठीं नापसंती होय. आपल्याला लाज वाटू नये याचे कारण म्हणजें देवाचा आदर करणारे वर्तन, जरी लोकांनी त्यासाठीं तुम्हांला लज्जित करण्याचा प्रयत्न का केला असेना.
मृत्युच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाहीं, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. (स्तोत्र 23:4)
23 व्या स्तोत्राचे स्वरूप उद्बोधक आहे.
स्तोत्र 23:1-3 मध्ये दावीद देवाचा उल्लेख “तो” म्हणून करतो :
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे;
तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो;
तो मला संथ पाण्यावर नेतो.
तो माझा जीव ताजातवाना करतो;
मग वचन 4 आणि 5 मध्ये दावीद देवाला “तू“ म्हणून संबोधतोः
मी...कसल्याही अरिष्टाला भिणार नाहीं, कारण तू माझ्याबरोबर आहेस;
तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात.
तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस;
तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस;
मग वचन 6 मध्ये तो परत बदल करतो :
परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.
या स्वरूपातून जो धडा आपण शिकू शकतो तो हा कीं देवाशी न बोलता देवाबद्दल फार वेळ न बोलणे चांगले आहे.
प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती कमीत कमी एक ईश्वरविज्ञानाचा हौशी पंडित आहे - म्हणजें, असा व्यक्ती जो देवाचे चारित्र्य आणि मार्ग समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर ते शब्दात मांडतो. जर आपण अल्प प्रमाणांत ईश्वरविज्ञानांत पारंगत नसलो तर आम्हीं देवाबद्दल एकमेकांना, किंवा देवाला काहींही बोलणार नाहीं आणि एकमेकांच्या विश्वासाला फारच कमी अशी खरी मदत होऊ.
पण स्तोत्र 23 आणि इतर स्तोत्रांमध्ये मी दाविदाकडून जे शिकलो ते हे आहे कीं मी माझ्या ईश्वरविज्ञानास प्रार्थनेची जोड द्यावी. देवाशी बोलण्याद्वारे मी वारंवार देवाबद्दलच्या माझ्या बोलण्यात व्यत्यय आणला पाहिजे.
“देव उदार आहे” या ईश्वरविज्ञानाच्या वाक्यामागे नाहीं, तर “देवा, तुझ्या औदार्याबद्दल धन्यवाद” हे प्रार्थनापूर्ण वाक्य यायला हवे.
“देव गौरवशाली आहे“ च्या टाचेवर, “मी तुझ्या गौरवाची उपासना करतो” हे आलें पाहिजे.
जर आपण आपल्या हृदयात देवाची वास्तविकता अनुभवत आहोत तसेच आपल्या डोक्यांत त्याचा विचार करत आहोत आणि आपल्या ओठांनी त्याचे वर्णन करत आहोत तर हे असेच असायला पाहिजे.
सैतानाला अडवा, म्हणजें तो तुमच्यापासून पळून जाईल. (याकोब 4:7)
आपल्या दिवसात सैतान जितका वास्तविक दिसतो - अधिक प्रकटरित्या सक्रिय - ख्रिस्ताचा विजय त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठीं अधिक मूल्यवान ठरेल.
नवा करार शिकवतो कीं जेव्हां ख्रिस्त मेला आणि पुन्हा जिवंत झाला तेव्हां सैतानाचा कायमचा निर्णायक पराभव करण्यात आला. त्याला मर्यादित स्वातंत्र्य देण्यात आले आहे, परंतु देवाच्या लोकांविरुद्ध त्याचे सामर्थ्य मोडकळीस आले आहे आणि त्याचा नाश निश्चित आहे.
दुसऱ्या शब्दांत, निर्णायक वार कल्वरी येथे करण्यात आला. आणि एक दिवस येईल, जेव्हां सैतानाचा मर्यादित स्वातंत्र्याचा काळ देखील समाप्त होईल, प्रकटीकरण 20:10 “त्यांना ठकवणाऱ्या सैतानाला ‘अग्नीच्या’ व ‘गंधकाच्या’ सरोवरात टाकण्यात आले; ...तेथे त्यांना रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल.”
आपल्यापैकीं जे येशू ख्रिस्ताचे अनुसरण करतात त्यांच्यासाठीं याचा काय अर्थ आहे?
म्हणून, “सैतानाचा प्रतिकार करा, आणि तो तुमच्यापासून पळून जाईल!“ त्याचा पराजय झाला आहे, आणि आम्हांला विजय देण्यात आला आहे. आता आमचे कार्य आहे त्या विजयात जगणे आणि सैतानाला त्याच्या पराभवाविषयी जाणीव करून देणें.
तुम्हीं आपल्या वैऱ्यांवर प्रीति करा, आणि जे तुमचा छळ करतात (व तुमच्या पाठीस लागतात) त्यांच्यासाठीं प्रार्थना करा. (मत्तय 5:44)
आपल्या वैऱ्यांसाठीं प्रार्थना करणें ही प्रीतिच्या सर्वात गंभीर स्वरूपांपैकीं एक आहे, कारण याचा अर्थ असा आहे कीं त्यांच्यासोबत काहींतरी चांगले घडावे अशी तुम्हीं खरोखर इच्छा बाळगता.
तुमच्या वैऱ्याचे कल्याण व्हावे अशी वास्तविक इच्छा न बाळगता तुम्हीं आपल्या वैऱ्यांसाठीं चांगल्या गोष्टी करू शकता. परंतु त्यांच्यासाठीं प्रार्थना ही देवाच्या उपस्थितीत केलीं जाते जो तुमचे अंतःकरण जाणतो आणि प्रार्थना त्यांच्यासाठीं देवाजवळ मध्यस्थी करणे होय.
ती त्यांच्या परिवर्तनासाठीं असू शकते. ती त्यांच्या पश्चात्तापासाठीं असू शकते. कदाचित् त्यांना त्यांच्या मनातील वैरभावाची जाणीव होईल. असे असू शकते कीं त्यांची पापाची खालची घसरण थांबेल, जरी त्यासाठीं त्यांच्यावर रोग किंवा संकटे आली तरीही. परंतु येथे येशूच्या मनात असलेली प्रार्थना ही नेहमी त्यांच्या कल्याणासाठीं असते.
वधस्तंभावर टांगलेला असतांना येशूनें हेच केलें :
“तेव्हां येशू म्हणाला, “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाहीं.” (लूक 23:34)
आणि स्तेफनसाला दगडमार होत असताना त्यानें हेच केलेः
मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडें मोजू नकोस.” (प्रेषितांची कृत्ये 7:60)
येशू आम्हास पाचारण करीत आहे कीं आम्हीं फक्त आपल्या शत्रूंसाठीं सत्कृत्ये करू नयेत, जसे त्यांस अभिवादन करणे आणि त्यांच्या गरजा पुरविण्यात त्यांची मदत करणे (मत्तय 5:47); तो आम्हास यासाठीं देखील पाचारण करीत आहे कीं आम्हीं त्यांचे सर्वोच्च कल्याण व्हावें अशी इच्छा धरावी, आणि त्या इच्छा प्रार्थनेमध्ये व्यक्त कराव्यात, तो वैरी कुठेही जवळपास नसतो तेव्हांहि.
आमच्यां अंतःकरणांची इच्छा त्यांचे तारण असले पाहिजे आणि ते स्वर्गात आमच्यांसोबत असतील अशी इच्छा धरली पाहिजे आणि त्यांना सार्वकालिक सुख मिळावें अशी इच्छा धरली पाहिजे. यहूदी लोकांसाठीं प्रेषित पौलाने केलेंल्या प्रार्थनेप्रमाणे प्रार्थना करण्याची देवानें आम्हास कृपा द्यावी, ज्यांपैकीं अनेकांनी पौलासाठीं जीवन जगणे अतिशय कठीण केलें होते :
त्यांच्याविषयी माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे कीं, त्यांचे तारण व्हावे. (रोम 10:1)
माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यांतून उठवलेला, दाविदाच्या संतानांतील येशू ख्रिस्त, ह्याची आठवण ठेव. (2 तीमथ्य 2:8)
पौल येशूची आठवण ठेवण्याच्या दोन विशिष्ट मार्गांचा उल्लेख करतो : मेलेल्यांतून जिवंत झालेंला म्हणून त्याची आठवण ठेवा. आणि दाविदाचे संतान म्हणून त्याची आठवण ठेवा. येशूविषयी या दोन गोष्टी का?
कारण तो मेलेल्यांतून उठला आहे म्हणून तो जिवंत आहे आणि मरणावर विजयी झाला आहे - यात आमच्यां मृत्यूचाही समावेश आहे! ”ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवले, त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वसती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठवले तो तुमच्यामध्ये वसती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील“ (रोम 8:11).
याचा अर्थ हा आहे कीं दुःखसहन कितीही गंभीर का होईना, तरीही या पृथ्वीवर सर्वात वाईट गोष्ट जी होऊ शकते ती म्हणजें तुम्हास मारले जाणें. आणि येशूनें त्या शत्रूची नांगी काढून टाकली आहे. तो जिवंत आहे. आणि तुम्हीं जिवंत राहाल. ”जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहींत त्यांना भिऊ नका“ (मत्तय 10:28).
पण त्याहीपेक्षा अधिक म्हणजें, येशूचे पुनरुत्थान आकस्मिक पुनरुत्थान नव्हते. ते दाविदाच्या पुत्राचे पुनरुत्थान होते. “मेलेल्यांतून उठवलेला, दाविदाच्या संतानांतील येशू ख्रिस्त, ह्याची आठवण ठेव.” पौल असे का म्हणतो?
कारण प्रत्येक यहूदी व्यक्तीला माहीत होते कीं त्याचा अर्थ काय आहे. त्याचा अर्थ हा आहे कीं येशू हा तो ख्रिस्त, म्हणजें मशीहा आहे (योहान 7:42). आणि याचा अर्थ हा होता कीं हे पुनरुत्थान एका सनातन राजाचे पुनरुत्थान होते. येशूची आई, मरीया हिला देवदूत काय बोलला तें ऐका :
”पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल; आणि तो याकोबाच्या घराण्यावर ‘युगानुयुग राज्य करील’, व त्याच्या राज्याचा अंत होणार नाहीं“ (लूक 1:31-33).
म्हणून, येशूची आठवण ठेवा, ज्याची तुम्हीं सेवा करता, आणि ज्याच्यासाठीं तुम्हीं दुःख सोसता. तो फक्त मेलेल्यांतून जिवंत झालेंला नाहीं, तर तो राजा म्हणून जिवंत आहे जो सर्वकाळ राज्य करील - त्याच्या राज्याचा अंत नाहीं. ते तुम्हांला काहींही करेनात, तुम्हांला भिण्याची गरज नाहीं. तुम्हीं पुन्हा जिवंत केलें जाल. आणि तुम्हीं त्याच्यासोबत राज्य कराल.
‘ज्या कोणाची’ नावे जगाच्या स्थापनेपासून ‘वधलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली’ नाहीं असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या श्वापदाला नमन करतील. (प्रकटीकरण 13:8)
तारण त्या सर्वांसाठीं प्राप्त करून तें सुरक्षित ठेवण्यात आले आहे ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत.
जीवनाच्या पुस्तकात नावे लिहिण्यात आल्यामुळे आमचे तारण सुरक्षित होते याचे कारण हे आहे कीं या पुस्तकास “वधलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाचे पुस्तक” असे म्हटलेंले आहे. या पुस्तकात ज्यांची नावे लिहिलेली आहेत ते त्यांच्या कृत्यांच्या आधारे तारण पावलेली नाहींत. ते तारण पावले ते ख्रिस्त वधिला गेला म्हणून.
पण प्रकटीकरण 20:12 या वचनात योहान म्हणतो, “मग मृत झालेंल्या लहानथोरांना मी (देवाच्या) राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्या वेळी ‘पुस्तके उघडली गेली;’ तेव्हां दुसरे एक ‘पुस्तक’ उघडले गेले ते ‘जीवनाचे’ होते; आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ‘ज्यांच्या-त्यांच्या कृत्यांप्रमाणे’ ठरवण्यात आला.” जर आमचे तारण ख्रिस्त वधिला गेल्यामुळे झालें आहे, तर मग, “पुस्तकात” समाविष्ट आमच्यां जीवनांचा लेख आमच्यां न्यायाचा भाग कसा आहे?
उत्तर हे आहे कीं, आमच्यां कृत्यांचा लेख नोंदविणाऱ्या पुस्तकांत आम्हीं ख्रिस्ताचे असल्याचा पुरेसे पुरावा आहेत कीं ते आमच्यां विश्वासाची आणि ख्रिस्तासोबत आमच्यां ऐक्याची सार्वजनिक पुष्टी म्हणून कार्य करतात.
प्रकटीकरण 21:27 चा विचार करा, “तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्टी’ आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम ह्यांचा ‘प्रवेश होणारच नाहीं’ तर कोकऱ्याच्या ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा’ मात्र होईल.” येथे “जीवनाच्या पुस्तकात” लिहिले जाण्याचा परिणाम फक्त नाश न पावणे हा नाहीं, तर घृणास्पद, पापमय वर्तन न करणे हा देखील आहे.
उदाहरणार्थ, वधस्तंभावरील चोराचा विचार करा. येशूनें म्हटलें कीं तो सुखलोकात प्रवेश करील (लूक 23:43). पण जेव्हां पुस्तके उघडली जातील तेव्हां त्याचा न्याय कसा होईल? त्याच्या जीवनाच्या 99.9 टक्केपेक्षा जास्त भाग पाप असेल.
त्याचे तारण ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे सुरक्षित केलें जाईल. त्याचे नाव वध केलेंल्या कोंकराच्या पुस्तकात लिहिलेले असेल.
मग देव पुस्तके उघडील. सर्वात आधी, तो त्याच्या पुत्राच्या श्रेष्ठ बलिदानाचा गौरव करण्यासाठीं पापाच्या आजीवन अभिलेखाचा उपयोग करील. दुसरे म्हणजें, देव शेवटचे पुस्तक वाचेल, जेथे वधस्तंभावर चोराचे नाट्यपूर्ण परिवर्तन नमूद करण्यात आले आहे. त्याच्या जीवनातील देवाचे हे कार्य, जे पुस्तकांत नमूद करण्यात आले आहे, त्या चोराच्या विश्वासाची आणि ख्रिस्तामधील ऐक्याची त्या शेवटल्या दिवशी सार्वजनिक पुष्टी ठरेल. आणि त्याच्या तारणाचा आधार ख्रिस्त असेल, त्याची कार्ये नाहींत.
म्हणून, जेव्हां मी म्हणतो कीं पुस्तकांत जे लिहिलेले आहे ते आमच्यां विश्वासाची आणि ख्रिस्तामधील ऐक्याची सार्वजनिक पुष्टी आहे, तेव्हां माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे नाहीं कीं त्या अभिलेखात दुष्कृत्यांपेक्षा सत्कृत्यांचा अधिक समावेश असेल.
तर माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे कीं तेथे विश्वासाची वास्तविकता दाखविणारे ख्रिस्तामधील जीवन नमूद केलें असेल - नवीन जीवनाची वास्तविकता आणि ख्रिस्तासोबत ऐक्य. ख्रिस्ती म्हणून प्रत्येक दिवस अशाच प्रकारे जगतो : या विश्वासाने कीं आमची दंडाज्ञा नाहींसी झालीं आहे (रोम 8:1), आणि आमचे नाव जीवनाच्या पुस्तकात आहे, आणि ज्याने आमच्यांठायीं चांगले कार्य सुरू केलें ते तो ख्रिस्ताच्या दिवसापर्यन्त पूर्णत्वास नेईल.
“शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केलीं; परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठीं मी विनंती केलीं आहे; आणि तू वळलास म्हणजें तुझ्या भावांना स्थिर कर.” (लूक 22:31-32)
इतर दहा प्रेषितांविषयी काय (यात यहूदाचा समावेश नाहीं)?
सैतान त्यांनाहीं चाळणार होता. येशूनें त्यांच्यासाठीं प्रार्थना केलीं का?
होय, त्यानें प्रार्थना केलीं. परंतु जसे त्यानें पेत्राच्या विश्वासाचे रक्षण केलें तसे इतर शिष्यांच्या विश्वासाचे देखील रक्षण केलें जावें अशी विनंती त्यानें पित्याला केलीं नाहीं.
त्या रात्री सैतानाच्या चाळणीच्या वेदनेद्वारें देवानें पेत्राचा अहंकार आणि स्वतःवर भरवंसा करण्याचा स्वभाव हाणून पाडला. पण त्यानें त्याला असेच सोडले नाहीं. त्यानें त्याला मागे परत फिरवले आणि त्याला क्षमा केलीं आणि त्याला पुनर्स्थापित केलें आणि त्याचा विश्वास बळकट केला. आणि आता इतर दहा शिष्यांना बळकट करण्याचे कार्य पेत्राचे होते. “आणि तू वळलास म्हणजें तुझ्या भावांना स्थिर कर.”
येशूनें पेत्राची तरतूद करून दहा जणांची तरतूद केलीं. जो बळकट होतो तो बळकट करणारा बनतो.
आमच्यांसाठीं येथे एक मोठा धडा आहे. कधी कधी देव तुमच्याशी प्रत्यक्ष व्यवहार करेल, इतर सर्वजण गाढ निद्रेत असतांना पहाटेच्या पहिल्या प्रहरी तोच तुमचा विश्वास बळकट करेल. परंतु बहुतेकदा (आपण दहा-अकराव्या वेळेस म्हणू शकतो) देव दुसऱ्या व्यक्तीद्वारे आपला विश्वास बळकट करतो.
देव आपल्याजवळ काहीं शिमोन पेत्रांना पाठवतो जो आम्हांला विश्वासात टिकून राहण्यासाठीं आवश्यक असलेला कृपेचा शब्द घेऊन येतो : कसे याबद्दल काहीं साक्ष ”रात्री विलापाने बिर्हाड केलें, तरी प्रातःकाळी हर्षध्वनी होतो“ (स्तोत्र 30:5).
सार्वकालिक सुरक्षा हा एक समुदायिक प्रकल्प आहे. जेव्हां जेव्हां देव तुमच्या अंतःकरणाला या अभिवचनाने उत्तेजन देतो कीं सैतानाच्या चाळणीत तुमचा विश्वास अपयशी होणार नाहीं, तेव्हां तेव्हां ते उत्तेजन घ्या आणि ख्रीस्तातील तुमच्या बंधु-भगिनींना बळकट करण्यासाठीं त्याचा उपयोग करून तुमचा आनंद द्विगुणित करा - ज्या सामर्थ्याने तुम्हांला बळ प्राप्त झालें आहे त्याच सामर्थ्यानिशी.
कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करत नाहीं; तर करावेसे वाटत नाहीं असे जे वाईट ते मी करतो. (रोम 7:19)
ख्रिस्ती केवळ पराभवाचे जीवन जगत नाहींत. पण आपण फक्त पापावर पूर्ण विजय मिळवण्यासाठींहि जगत नाहीं. आणि अशा काळात जेव्हां आपण पापावर विजय मिळवण्यात अपयशी ठरतो, तेव्हां रोम 7:13-25 आम्हांला निरोगी खिस्ती व्यक्तीने कसा प्रतिसाद दिला पाहिजे याची सामान्य पद्धत दाखवते.
आपण असे म्हणावें :
1. मी देवाच्या नियमशास्त्रावर प्रीति करतो (वचन 22)
2. मी इतक्यात जे केलें त्याचा मला वीट आहे (वचन 15)
3. किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील? (वचन 24)
4. देवाचे आभार! आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे विजय येईल. (वचन 25)
दुसऱ्या शब्दांत, कोणताही ख्रिस्ती व्यक्ती पराभवाचं जीवन जगू इच्छित नाहीं. कोणताही ख्रिस्ती व्यक्ती पराभवाचं जीवन जगण्यात समाधान पावत नाहीं. परंतु जर आपण काहीं काळासाठीं पराभूत झालो, तर आपण त्याबाबत खोटे बोलता कामा नये.
ढोंग नाहीं. दिखावा नाहीं. अहंकारपूर्ण परिपूर्णतावाद नाहीं. कोणतीही धार्मिकतेचा बडेजाव करणारे, वरकरणी स्मितहास्य किंवा स्वस्त तकलादूपणा नको.
आणि त्याहीपेक्षा अधिक म्हणजें, देव आम्हांला आमच्यां स्वतःच्या अपयशाकडें कानाडोळा करण्यापासून आणि परिणामी इतरांवर त्वरित दोष लावण्यापासून वाचवतो.
हे परमेश्वरा, आम्हांला इतरांच्या अपयशापेक्षा आमच्यां स्वतःच्या उणीवांवर शोक करण्यासाठीं मदत कर. हे परमेश्वरा, आम्हांला या वचनातील प्रेषित पौलाची प्रामाणिकता आणि प्रांजळपणा आणि विनयशीलता दे!”किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील? आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो. तर मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.“ (रोम 7:24-25).