
Sign up to save your podcasts
Or


राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो; लोकांचे संकल्प निष्फळ करतो. परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते; त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. (स्तोत्र 33:10-11)
“आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो” (स्तोत्र 115:3). या शास्त्रलेखाचा अर्थबोध हा आहे कीं देवाला ज्या गोष्टींमध्यें आनंद मिळतो त्यां सर्व करण्याचा त्याला अधिकार आणि सामर्थ्य आहे. देव सार्वभौम आहे या कथनाचा अर्थ हाच आहे.
काहीं क्षण यावर विचार करा : जर देव सार्वभौम आहे आणि त्याच्या इच्छेस येईल ते सर्व करण्यांस तो समर्थ आहे, तर त्याचा कोणताही संकल्प निष्फळ होऊ शकत नाहीं. “राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो; लोकांचे संकल्प निष्फळ करतो. परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते; त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात” (स्तोत्र 33:10-11).
आणि जर त्याचा कोणताही संकल्प निष्फळ होऊ शकत नाहीं, तर तो सर्व जीवितांमध्यें सर्वात अधिक आनंदी असला पाहिजे.
हाच असीम, ऊर्ध्वलोकीं आनंद तो झरा आहे ज्यातून ख्रिस्ती हेडोनिस्ट म्हणजें सुख हेच अंतिम उद्दिष्ट हा सिद्धांत मानणारा मनुष्य सातत्यानें पितो आणि जो अधिक खोलवर जाऊन प्यावयांस तळमळतो.
जगावर राज्य करणारा देव आनंदी नसता तर काय झालें असते याची तुम्हीं कल्पना करू शकता का? देव जर आकाशातल्या एखाद्या दैत्याप्रमाणें कुरकुर करणारा, चिडचिडपणानें वेडापिसा होणारा आणि दु:खाने खिन्न होऊन बसणारा असता तर? जर देव निराश, वैफल्यग्रस्त, खिन्न आणि हताश आणि असमाधानी आणि विषादपूर्ण वृत्तीचा असतां तर?
आपण दाविदाबरोबर असे म्हणू शकलो असतो का, “हे देवा, तू माझा देव आहेस; मी आस्थेने तुझा शोध करीन; शुष्क, रुक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठीं तान्हेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे” (स्तोत्र 63:1)? मला असे वाटत नाहीं.
आपण लेकरें म्हणून परमेश्वराला असे गणूं जसे एक निराश झालेला, खिन्न आणि हताश, व असंतुष्ट असा बाप असलेलीं बालकें त्याला गणतील. ते त्याच्यामध्यें आनंद करूं शकत नाहींत. ते फक्त त्याला त्रास न देण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा कदाचित थोड्याफार स्वार्थासाठीं त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करतील.
पण आमचा परमेश्वर तसा नाहीं. तो कधीही नैराश्याने किंवा असमाधानामुळें लहरी माणसासारखा चिडत नाहीं. आणि, स्तोत्र 147:11 मध्यें सांगितल्याप्रमाणें, “जे परमेश्वराचा आदर करतात,जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो.” म्हणून या देवाला टाळणें, वा त्याच्यापासून पळ काढणें किंवा त्याचा खिन्नपणा क्रोधाद्वारे प्रकट होऊ नये म्हणून दिवाणखान्यात डोकावून सुद्धा न पाहणें हा ख्रिस्ती हेडोनिस्टचा उद्दिष्ट नाहीं. नाहीं, उलट त्याच्या स्थिर प्रीतिची आशा धरणें हे आपले उद्दिष्ट असते. त्याच्याकडे धाव घेणें हे आपले उद्दिष्ट असते. देवामध्यें आनंद करणें, देवामध्यें हर्ष करणें, त्याचा सहवास आणि त्याची कृपा यांना आपल्या हृदयांत जपणें व त्यांत आनंद करणें हे आपले उद्दिष्ट आहे.
परमेश्वरामध्यें आनंद कर, म्हणजें तो तुझे मनोरथ पूर्ण करील. (स्तोत्र 37:4)
आनंदाचा शोध “आम्हांला वाटेल तर आम्हीं घेऊं” असा वैकल्पिक विषय नाहीं, तर ही आज्ञा आहे (स्तोत्रांमध्यें दिलेलीं): "परमेश्वरामध्यें आनंद कर, म्हणजें तो तुझे मनोरथ पूर्ण करील" (स्तोत्र 37:4).
स्तोत्रकर्त्यांनी असेच करण्याचा प्रयत्न केला : “जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठीं धापा टाकते, तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठीं धापा टाकतो. माझा जीव देवासाठीं, जिवंत देवासाठीं तहानेला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन हजर होईन” (स्तोत्र 42:1-2). “हे देवा, तू माझा देव आहेस; मी कळकळीने तुझा शोध घेईन; शुष्क आणि रूक्ष आणि निर्जल ठिकाणी माझा जीव तुझ्यासाठीं तान्हेला झाला आहे” (स्तोत्र 63:1).
या तहानेच्या उद्देश्यामागे तृप्त करणारा असा समतुल्य झरा आहे जेव्हां स्तोत्रकर्ता म्हणतो कीं लोक “तुझ्या घरातल्या समृद्धीमुळें तृप्त होतील. तू आपल्या बहुमोल नदीतून त्यांना मनसोक्त पिण्यास देशील” (स्तोत्र 36:8).
मला असा शोध लागला कीं देवाचा चांगुलपणा, जो आमच्या उपासनेचा मुख्य पाया आहे, अशी गोष्ट नाहीं कीं तुम्हीं कुठल्यातरी निरुत्साही भक्तीने त्याच्या आदर करता. नाहीं, हे असे कांहींतरी आहे ज्यामध्यें आम्हांला आनंद घ्यावयाचा असतो: "परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा!" (स्तोत्र 34:8). अनुभव. अनुभव! अनुभव घेऊन पाहा.
"तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात! माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात!" (स्तोत्र 119:103).
सी.एस. लुईस यांनी म्हटल्याप्रमाणें, स्तोत्रांत वर्णिलेला परमेश्वर हा "सर्व-समाधानी विषय" आहे. त्याच्या लोकांना त्याच्यामध्यें जो "काठोकाठ वाहणारा आनंद" मिळतो त्या आनंदासाठीं ते हर्ष-वर्धनाणें त्याची उपासना करतात (स्तोत्र 43:4). तो तृप्तीदायक आणि सर्वकाळ वाहणाऱ्या आनंदाचा झरा आहे: “तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे; तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत” (स्तोत्र 16:11).
परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो! परमेश्वराला आपल्या कृतींपासून आनंद होवो! तो पृथ्वीकडें पाहतो तेव्हा ती कापते; तो पर्वतांना स्पर्श करतो तेव्हा ते धुमसतांत. माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत मी परमेश्वराचे गुणगान गाईन; मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. मी केलेंले त्याचे मनन त्याला गोड वाटो; परमेश्वराच्या ठायीं मला हर्ष होईल.. (स्तोत्र 104:31-34)
परमेश्वराला आपल्या कृतींपासून आनंद होतो कारण त्यां कृती आपल्याला त्यांच्या पलीकडें म्हणजें प्रत्यक्ष देवाकडें पाहण्याचा संकेत देतांत.
देवाची इच्छा ही आहे कीं आपण या सृष्टीत दिसून येणारी त्याची हस्तकृती पाहून थक्क व भयभीत व्हावें. पण आपण त्यां कृतींचे कौतुक करावें म्हणून नाहीं. त्याची इच्छा अशी आहे कीं आपण त्याच्या सृष्टीकडें पाहून असे म्हणावें : जर त्याचे फक्त अंगुलीकार्य (स्तोत्र 8:3) इतके शहाणपण आणि सामर्थ्य आणि भव्यता आणि वैभव आणि सौंदर्य यांनी परिपूर्ण आहे, तर हा परमेश्वर स्वतः कसा असावा!
ही अंगुलीकार्ये फक्त त्याच्या वैभवाची केवळ मागची बाजू आहेत, कीं जणू आपण ती काचातून खोल अंधकारांत पाहत आहों. मग या सर्वांचा जो निर्माणकर्ता, प्रत्यक्षात त्याचा महिमा पाहणें म्हणजें काय असेल! फक्त त्याच्या हस्तकृतीच नाहीं! अब्ज आकाशगंगा देखील मनुष्याच्या जिवाला संतुष्ट करू शकणार नाहींत. परमेश्वर आणि केवळ परमेश्वर हाच आमच्या आत्म्याची तहान तृप्त करू शकतो.
जोनाथन एडवर्ड्स यांनी ही गोष्ट पुढीलप्रमाणें अभिव्यक्त केलीं :
परमेश्वरापासून आनंद हे ते एकमेव सुख आहे जे आपल्या आत्म्यांची तहान तृप्त करू शकते. स्वर्गात जावून देवाचा पूर्ण आनंद घेणें हे येथें असलेल्यां सर्व-सुखांच्या निवासस्थानांपेक्षा अमर्यादपणें श्रेष्ठ आहे. . . . [ह्यां] फक्त छाया मात्र आहेत. पण देव हा वास्तविक रूप आहे. ह्यां गोष्टी केवळ विखुरलेला प्रकाश आहे; पण देव हा सूर्य आहे. हे फक्त झरे आहेत; पण देव हा महासागर आहे.
म्हणूनच स्तोत्र 104 ची शेवटची 31-34 ही वचनें प्रत्यक्षांत देवावर लक्ष केंद्रित करून या स्तोत्राचा समारोप करतांत. “माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत मी परमेश्वराचे गुणगान गाईन. . . परमेश्वराच्या ठायीं मला हर्ष होईल.” शेवटी ज्यां गोष्टीं आपली अंतःकरणें आश्चर्याने भरून टाकतील आणि आपल्या मुखांत सार्वकालिक स्तुती भरतील त्यां गोष्टीं हा समुद्र किंवा हे पर्वत किंवा दऱ्याखोरी किंवा पाण्याचे झरे किंवा ढग किंवा मोठमोठ्या आकाशगंगा नसतील, तर तो स्वतः देव असेल जो सर्वांमध्यें सर्वकाहीं पूर्ण करतो.
तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळें आपण विशेषेकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने आपण विशेषेकरून तारले जाणार आहोत; इतकेच केवळ नाहीं, तर ज्याच्या द्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठायीं अभिमान बाळगतो. (रोमकरांस 5:9-11)
आपल्याला कशापासून तारले जाण्याची गरज आहे? वचन 9 ह्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देते : देवाच्या क्रोधापासून. “तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळें आपण विशेषेकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत.” पण शुभवर्तमानाचा सर्वोच्च, सर्वोत्कृष्ट, पूर्ण, व सर्वात समाधानकारक पुरस्कार केवळ हाच आहे का?
नाहीं, कारण पुढे वचन 10 असें म्हणते, “तर आता....त्याच्या जीवनाने आपण विशेषेकरून तारले जाणार आहोत.” मग पुढे वचन 11 निष्कर्षावर येऊन सुवार्तेचा परम शेवट आणि उद्देश काय ते सांगते : “इतकेच केवळ नाहीं... तर... आपण देवाच्या ठायीं अभिमान बाळगतो.”
शुभवर्तमानाचा अंतिम आणि सर्वोच्च चांगुलपणा हांच आहे. "इतकेच केवळ नाहीं" ह्यानंतर काहींही शिल्लक किंवा अपूर्ण असे काहींही नाहीं. आपलें हे तारण कसे घडून येते हे सांगणें येथें पौलाचा मुख्य हेतू आहे, "ज्याच्या द्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे."
सुवार्तेचा शेवट हा कीं “आपण देवाच्या ठायीं अभिमान बाळगतो.” शुभवर्तमानांत जाहिर केलेंलीं सर्वोच्च, पूर्ण, सखोल, गोड अशी जी गोष्ट आहे ती म्हणजें देव स्वतः, ज्याच्या ठायीं तारलेले सर्व लोग अभिमान बाळगतांत.
परमेश्वर ख्रिस्तामध्यें खंडणी झाला (रोमकरांस 5:6-8), आणि परमेश्वर ख्रिस्तामध्यें पुरस्कारहि बनला (रोमकरांस 5:11).
सुवार्ता ही आनंदाची बातमी आहे कीं देवानें आपल्यासाठीं देवाचा सार्वकालिक आनंद खंडणी देऊन विकत घेतला आहे.
प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे कीं, “सूड घेणें माझ्याकडें आहे, मी फेड करीन,” असे प्रभू म्हणतो. (रोम 12:19)
कटुत्व आणि सूड या बाबतीत आमच्या प्रवृत्तीवर विजय मिळविण्याविषयी इतके महत्वपूर्ण अभिवचन का दिलें गेले आहे? त्याचे कारण हे कीं हे अभिवचन आमच्यात संताप उत्पन्न करणाऱ्या सर्वात प्रबळ आवेगापैकीं एकाचे समाधान देते - असा आवेग जो पूर्णपणें चुकींचा नाहीं.
अनेक बाबतीत, आमच्यावर खरोखर अन्याय झालेंला असतो. म्हणून, न्याय मिळाला पाहिजे ही भावना काहीं पूर्णपणें चुकींची नाहीं. पण असे वाटणें कीं आपण स्वतः सूड घेतला पाहिजे आणि जोवर तसे होत नाहीं तोवर आमच्या मनात कटुत्व पाळून ठेवणें हे चुकींचे आहे. ही एक घातक चूक ठरेल.
माझ्या सेमिनरीच्या दिवसांत, नोएल आणि मी जोडप्यांसाठीं असलेल्या एका लहान गटात होतो, आणि तो गट अतिशय सखोल वैयक्तिक पातळीवर चर्चा करू लागला. एके सायंकाळी आम्हीं क्षमा आणि राग यावर चर्चा करीत असतांना तिथें असलेल्यां तरूण पत्नींपैकीं एकींने म्हटले कीं ती लहान मुलगी असतांना तिच्या आईने तिच्याशी जे काहीं केलें होते त्याविषयी ती तिला क्षमा करू शकणार नाहीं आणि करणारहि नाहीं.
आम्हीं क्षमा न करणाऱ्या स्वभावाशी संबंधित बायबलमधील काहीं आज्ञांविषयी आणि ताकिदींविषयी चर्चा केलीं.
पण ती मान्य करण्यांस तयार नव्हती. म्हणून मी तिला ताकींद दिली कीं जर तिने अक्षम्य कटुतेची भावना राखून ठेवली तर तिचा प्राण धोक्यात आहे. पण आपण आईला क्षमा करणार नाहीं असा तिचा अट्टाहास होता.
सूड आणि कटुत्वाच्या अशा घातक भावनेवर मात करण्यास सहाय्य पुरविण्यासाठीं आम्हांला देवाच्या न्यायदंडाच्या कृपेचे रोम 12 मध्यें येथे अभिवचन देण्यात आलेंलें आहे.
येथें पौलाने असा युक्तिवाद मांडला कीं आपण खात्री धरू शकतो कीं सर्वप्रकारच्या अन्यायाची परतफेड देवच करील आणि आपण ती बाब त्याच्या हातांत सोडू शकतो कारण सूड घेणें हे देवाचे काम आहे. आमच्यांत असलेली सूड घेण्याची इच्छा सोडून द्यावी म्हणून आम्हांला प्रेरणा देण्याकरिता तो आपल्याला एक अभिवचन देतो: “मी फेड करीन, असे प्रभू म्हणतो.”
जे अभिवचन आम्हांला क्षमा न करणाऱ्या, कटु, सूड घेणाऱ्या स्वभावापासून मुक्त करते ते अभिवचन म्हणजें हे कीं देव आमचा हिशोब पूर्ण करील. तो आमच्यापेक्षा अधिक न्यायपूर्ण पद्धतीने आणि दयेने आणि संपूर्णपणें तो हिशोब करील. तो सर्व पापास शिक्षा देतो. कोणीही कुठल्याही अपराधातून वाचू शकत नाहीं. तो एक तर पश्चाताप करणाऱ्या व त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठीं वधस्तंभावर ख्रिस्तामध्यें त्यास शिक्षा देतो, किंवा जे लोक तसे करीत नाहींत त्यांस नरकामध्यें शिक्षा देतो. म्हणून आपण मागे फिरून देवानें त्याचे परिपूर्ण कार्य करावे म्हणून त्याला जागा देऊ शकतो.
“मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवीन; ह्यासाठीं कीं, जी प्रीति तू माझ्यावर केलींस ती त्यांच्यामध्यें असावी आणि मी त्यांच्यामध्यें असावे.” (योहान 17:26)
कल्पना करा कीं जे अत्यंत आनंददायक आहे त्याचा आनंद घ्यावयांस तुम्हीं समर्थ आहा, आणि तो ही असा आनंद जो अमर्याद आहे, आणि ज्याचे बळ व भावनावेग वाढत जातो.
हा आमचा वर्तमान अनुभव नाहीं. या जगात तीन गोष्टी अशा आहेंत ज्यां आमच्या संपूर्ण समाधानाच्या मार्गात अडखळण आणतांत.
1. आपल्या अंतःकरणाच्या सखोल अभिलाषा पूर्ण करण्यासाठीं या जगातील कुठल्याही गोष्टीचे वैयक्तिक मोल पुरेसे नाहीं.
2. सर्वात्तम खजिन्याचा जास्तीत जास्त आस्वाद घेण्याचे बळ आमच्यात नाहीं.
3. येथील गोष्टींचा आमचा आनंद येथेच समाप्त होतो. काहींही टिकून राहत नाहीं.
जर योहान योहान 17:26 मध्यें येशूचे ध्येय खरे ठरले, तर हे सर्व बदलून जाईल. तो आमच्यासाठीं पित्याजवळ प्रार्थना करतो, “मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवीन; ह्यासाठीं कीं, जी प्रीति तू माझ्यावर केलींस ती त्यांच्यामध्यें असावी आणि मी त्यांच्यामध्यें असावे.” देव पुत्रावर तशा पद्धतीने प्रीति करीत नाहीं जशी तो पाप्यांवर प्रीति करतो. तो पुत्रावर प्रीति करतो कारण पुत्र प्रीतिस अतिशय पात्र आहे. अर्थात, तो पुत्रावर प्रीति करतो कारण पुत्र अमर्यादितरित्या सुंदर आहे. म्हणजें याचा अर्थ हा कीं ही प्रीति पूर्णपणें प्रसन्नतादायक आहे. येशू प्रार्थना करतो कीं देवाला पुत्रामध्यें ही जी प्रसन्नता वाटते तीच प्रसन्नता आम्हांला पुत्रामध्यें वाटावी.
जर पुत्रामध्यें पित्याची प्रसन्नता आमची प्रसन्नता ठरते, तर आमच्या प्रसन्नतेचा विषय, जो येशू आहे, त्याचे वैयक्तिक मूल्य अपार ठरेल. तो कधीही कंटाळवाणा किंवा निराशाजनक अथवा हताशाजनक होणार नाहीं. परमेश्वराच्या पुत्राशिवाय दुसऱ्या कुठल्याही मोठ्या संपत्तीची कल्पना करता येणें शक्य नाहीं.
पण येशू ज्या गोष्टीसाठीं प्रार्थना करतो त्यामध्यें हे जोडा; अर्थात, या अक्षय संपत्तीचा आस्वाद घेण्याची आमची क्षमता - आमचे बळ, आमचा आवेश - मानवी दुर्बळतेमुळें मर्यादित ठरणार नाहीं. आपण देवाच्या पुत्राचा त्याच्या सर्वसमर्थ पित्याच्या आनंदासह उपभोग घेऊ.
त्याच्या पुत्रामध्यें पित्याचा आनंद आमच्याठायीं असेल आणि तो आमचा आनंद ठरेल. आणि याचा अंत कधीही होणार नाहीं, कारण पित्याचा कधीही अंत होत नाहीं, पुत्राचाही नाहीं. एकमेकांसाठीं त्यांची प्रीति त्यांच्या प्रीत्यर्थ आमची प्रीति ठरेल, आणि म्हणून त्यांच्यावर असलेल्या आमच्या प्रीतिचा कधीही अंत होणार नाहीं.
धन्यवादित देवाच्या गौरवाची जी सुवार्ता... (1 तीमथ्य 1:11)
1 तीमथ्यमधील हा एक सुंदर वाक्प्रचार आहे, जो पवित्र शास्त्राच्या काहीं शब्दांच्या अतिशय परिचित पृष्ठभागाखाली लपलेला आहे. पण तो शोधून काढल्यानंतर, तो असा वाटतो: “आनंदी देवाच्या गौरवाची सुवार्ता.” मूळांत, “धन्यवादित” या शब्दाचा अर्थ “प्रशंसा प्राप्त” असा नाहीं, तर “आनंदी” असा आहे.
देवाच्या गौरवाचा एक मोठा भाग त्याचा आनंद आहे.
देवाला असीम आनंद होऊं शकत नाहीं आणि तरीही तो पूर्णतः गौरवी असू शकतो ही गोष्ट प्रेषित पौलाला अकल्पनीय होती. अमर्यादपणें गौरवशाली असणें म्हणजें अमर्यादपणें आनंदी असणें. त्यानें “धन्यवादित देवाचा गौरव” या वाक्प्रचाराचा उपयोग केला कारण तो ज्यां प्रकारे आनंदी आहे तसा आनंदी असणें ही देवासाठीं गौरवशाली गोष्ट आहे.
देवाचे गौरव बहुतांशी या तथ्यात समाविष्ट आहे कीं तो आमच्या कल्पनेपलीकडें आनंदी आहे. जसे अठराव्या शतकातील महान सुवार्तिक, जोनाथन एडवर्ड्स यांनी म्हटले, “देवाच्या परिपूर्णतेचा भाग जो तो कळवितो तो आहे त्याचा आनंद. या आनंदात स्वतःमध्यें आनंद अनुभव करणें आणि आनंद साजरा करणें समाविष्ट आहे; जीवितांचा आनंद सुद्धा असाच असतो.”
आणि हा सुवार्तेचा मुख्य भाग आहे, पौल म्हणतो: “धन्यवादित देवाच्या गौरवाची जी सुवार्ता.” ही सुवार्ता किंवा आनंदाची बातमी आहे कीं देव गौरवीरित्या आनंदी आहे. कोणीही उदासवाण्या, दुःखी देवासोबत अनंतकाळ घालवू इच्छिणार नाहीं.
जर देव दुःखी असेल, तर सुवार्तेचे हे ध्येय - देवासोबत सदाकाळ राहणें - आनंदी ध्येय नाहीं, आणि याचा अर्थ असा आहे कीं ती सुवार्ता मुळीच असणार नाहीं. पण, वस्तुतः, येशू आम्हांला आनंदी देवासोबत अनंतकाळ घालवण्यास पाचारण करतो जेव्हा तो म्हणतो, “तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो” (मत्तय 25:23).
येशूनें योहान 15:11 मध्यें म्हटले, “माझा आनंद तुमच्यामध्यें असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.” येशू बोलला, आणि जगला, आणि मरण पावला यासाठीं कीं त्याचा आनंद - देवाचा आनंद - आमच्याठायीं असावा आणि आमचा आनंद परिपूर्ण व्हावा. म्हणून, सुवार्ता ही “धन्यवादित (आनंदी) देवाच्या गौरवाची सुवार्ता” आहे.
“पाहा, देव थोर आहे, तो आम्हांला अगम्य आहे; त्याच्या वर्षांची संख्या अगण्य आहे.” (ईयोब 36:26)
देवाला अतिशय चांगल्याप्रकारे जाणणें किंवा ओळखणें अशक्य आहे.
तो अस्तित्वात असलेला सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती आहे. आणि याचे कारण हे कीं त्यानें इतर सर्वांना घडविले, आणि त्यांना जर कुठले महत्व असेल तर ते त्याच्यामुळें आहे.
इतर जिवांस जे बळ अथवा बुद्धी अथवा कौशल्य अथवा सौंदर्य मिळाले आहे ते सर्व त्याच्याकडून येते. उत्तमतेच्या प्रत्येक पातळीवर, तो तुम्हीं ओळखत असलेल्या किंवा ज्याच्याविषयी तुम्हीं ऐकलें आहे अशा सर्वोत्तम व्यक्तीपेक्षा अमर्यादपणें श्रेष्ठ आहे.
अनंत, अपरंपार असल्याने, त्याच्यांत असलेली चित्तवेधकता अमर्याद आहे. म्हणून देव कंटाळवाणा असणें अशक्य आहे. अत्यंत बुद्धिमत्तापूर्ण आणि चित्तवेधक कृत्यांचे त्याचे सतत प्रदर्शन स्फोटक आहे.
प्रत्येक उत्तम आनंदाचा उगम म्हणून, तो स्वतःमध्यें पूर्णपणें आणि कायमचा प्रसन्न राहतो. जर आपण त्याला तशाप्रकारे ओळखत नाहीं, तर आपण एकतर मृत आहोत, अथवा आंधळे आहोत किंवा निद्रेत चालत आहोत.
म्हणून या जगात परमेश्वरास जाणून घेण्यासाठीं किती कमी कष्ट केलें जातांत ही बाब म्हणजें धक्कादायकच.
हे जणू काहीं असे आहे कीं देशाचे राष्ट्रपती तुमच्यासोबत महिनाभर राहाण्यासाठीं आलें आणि तुम्हीं दररोज येता जाता त्यांना फक्त सलाम म्हणतां. किंवा जणूकाहीं तुम्हीं प्रकाशाच्या गतीने काहीं तास सूर्य आणि सौरमंडलाभोवती उडत होता, आणि खिडकींतून बाहेर पाहण्याऐवजी तुम्हीं कंप्यूटर गेम खेळत बसला. किंवा जणूकाहीं तुम्हांला सर्वोत्कृष्ट अभिनेते, गायक, क्रीडापटू, संशोधक आणि विद्वान लोकांचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन पाहण्यासाठीं आमंत्रित करण्यात आलें होते, परंतु तुम्हीं जाण्यास नकार दिला, यासाठीं कीं तुम्हांला टीव्ही वरील तुमच्या आवडत्या मालिकेचा शेवटचा भाग पाहता यावा.
आपण एकत्र मिळून प्रार्थना करू या कीं आपला अमर्यादितरित्या थोर परमेश्वर त्याला आम्हास शक्य तितके पूर्णपणें पाहता यावें आणि त्याला आणखी जाणून घेण्यासाठीं त्याचा शोध घ्यावा म्हणून त्यानेंच आमचे अंतःकरण वळवावे, आणि आमचे डोळे उघडावे.
हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. (लूक 12:32)
येशू बाजूला बसून लढा न देता आम्हांला अविश्वासांत सोडून देणार नाहीं. तो वचनरुपी शस्त्र हाती घेतो आणि जे विश्वास ठेवण्यास संघर्ष करतांत त्या सर्वांसाठीं ते तो आपल्या सामर्थ्याने बोलतो.
देव तशाप्रकारचा देव नाहीं जो खरोखर आमच्यासाठीं चांगला बनू इच्छितो ही भिती घालवून देणें हा त्याचा उद्देश्य आहे – म्हणजें ही भीती कीं तो खरोखर उदार आणि सहाय्यक आणि दयाळू आणि कोमल नाहीं, तर मुळांत आमच्यावर चिडलेला आहे - त्याची मनःस्थिती चांगली नाहीं आणि तो क्रोधाविष्ठ आहे.
कधी कधी, जरी आम्हीं आपल्या मनात हा विश्वास ठेवतो कीं देव आमच्यासाठीं चांगला आहे, तरीही आम्हांला आमच्या अंतःकरणात असे वाटू शकते कीं त्याचा चांगलुपणा बळजबरीने आहे किंवा चांगुलपणा दाखविण्यासाठीं त्याला भाग पाडण्यात आलें आहे, कदाचित एखाद्या न्यायाधिशाप्रमाणें ज्याला न्यायालयाच्या कार्यवाहीच्या कुठल्या तरी तांत्रिकतेविषयी सांगून एखादा चतुर वकींल युक्तीने कोपऱ्यांत नेतो, जेणेंकरून त्याला एखाद्या कैदाविरुद्ध असलेले आरोप खारीज करावे लागतांत ज्याला खरे पाहता त्यानें तुरुंगवास द्यावयास हवा होता.
पण परमेश्वराविषयी आम्हांला असे वाटता कामा नये म्हणून येशूला कळकळीने आमचे सहाय्य करायची आहे. तो लूक 12:32 मध्यें आपल्याला राज्य देण्यात त्याला जो पराकोटीचा आनंद होतो तो दाखविण्याद्वारे आपल्यासाठीं देवाच्या आत्म्याचे अवर्णनीय मूल्य आणि उत्कृष्टतेचे वर्णन करण्याचा तो प्रयत्न करत आहे.
“हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” ह्या अद्भुत वाक्यातील प्रत्येक लहान शब्दाचा हेतू ती भिती काढून घेण्यास आपली मदत करणें आहे ज्याविषयी येशूला माहीत आहे कीं आपण त्याविषयी संघर्ष करित आहोंत, म्हणजें ही भीती कीं देव त्याचे लाभ आपल्याला देण्याच्या बाबतींत जळफळो; कीं त्याला भाग पडते म्हणून तो चांगल्या गोष्टी करतो आणि हे त्याच्या स्वभावानुसार नाहीं; कीं आतल्या आत तो रागावलेला आहे आणि आपल्या रागाला वाट करून देणें त्याला आवडते.
लूक 12:32 हे वाक्य देवाच्या स्वभावाविषयी आहे. ते अशाप्रकारच्या अंतःकरणाचे वर्णन आहे जे देवाजवळ आहे. देवाला कोणती गोष्ट आनंदित करते, त्याला काय करणें आवडते आणि त्याला काय करण्यात आनंद वाटतो याविषयी हे वाक्य आहे. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. “हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” (लूक 12:32)
परंतु देव आपल्यावरच्या स्वत:च्या प्रीतिचे प्रमाण हे देतो कीं, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठीं मरण पावला. ( रोम 5:8 )
ह्या वचनाकडे लक्ष्य द्या, ह्या मध्यें "प्रमाण देतो" हे वर्तमान काळात आहे आणि ख्रिस्त मरण पावला हे भूतकाळात आहे. “देव आपल्यावरच्या स्वत:च्या प्रीतिचे प्रमाण हे देतो कीं, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठीं मरण पावला.” ( रोम 5:8 )
वर्तमान काळ असें सुचवते कीं प्रमाण देणे हे एक सुरू असलेले कार्य आहे, जे आज देखील चालू आहे. आणि ते उद्या देखील सुरू राहणार.
भूतकाळ "मरण पावला" असें दर्शवते कीं ख्रिस्ताचे मरण एकदाच झालें, आणि पुन्हा ते घडणार नाहीं. "कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठीं ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजें नीतिमान पुरुषाने अनीतीमान लोकांकरीता, एकदाच मरण सोसले. " (1 पेत्र 3:18)
मग पौलाने वर्तमान काळ (प्रमाण देतो) याचा वापर का केला ? मी अशी अपेक्षा केलीं असती कीं पौल असें म्हणेल कीं , "देवानें आपल्यावरच्या स्वत:च्या प्रीतिचे प्रमाण हे दिलें (भूतकाळ), कीं आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठीं मरण पावला.” ख्रिस्ताचे मरण जेव्हां झालें, त्यावेळी ते देवाच्या प्रीतिचे दर्शक नव्हते का ? आणि त्याचे प्रमाण भूतकाळात दिलें गेले ना?
मला वाटते त्याचे उत्तर आधीच्या काही वचनात दिलें आहे. पौलाने नुकताच असें म्हंटले आहे कीं, "संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते ; आणि आशा लाजवत नाहीं." ( रोम 5:3-5)
दुसर्या शब्दात सांगायचे झाल्यास, देवाचा आपल्याला सर्व गोष्टींतून घेऊन जाण्याचा उद्देश आशा देणे हा आहे. सर्व क्लेशामधून जात असताना देखील आपण आशावादी रहावे अशी त्याची उत्कंठा आहे.
पण आपण आशावादी कसे राहू शकतो ?
याचे उत्तर पौल पुढच्या वाक्यांत देतो, "कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारें आपल्या अंत:करणात देवाच्या प्रीतिचा वर्षाव झाला आहे" (रोम 5:5). आपल्या अंत:करणात देवाच्या प्रीतिचा वर्षाव झाला आहे. याचा अर्थ, (आपल्या तारणाच्यावेळी) आपल्या अंत:करणात देवाच्या प्रीतिचा वर्षाव भूतकाळातच झाला आहे, आणि तो आज देखील होत आहे.
देवानें आपल्यावरील त्याच्या प्रीतिचे प्रमाण देण्याकरिता त्याचा पुत्र देऊ केला, जो आपल्या पापां करिता एकदाच मरण पावला (रोम 5:8). पण त्याला हे देखील ठाऊक आहे कीं, ह्या भूतकाळातील प्रीतिचा अनुभव आपल्याला वर्तमान वस्तुस्थिती (आज आणि उद्या) मध्यें देखील यायला हवा, जर आपल्यामध्यें धीर, शील आणि आशा हवी असेल तर. यासाठींच, त्यानें याचे प्रमाण केवळ क्रुसावरच दिलें नाहीं तर, तर तो आज देखीत त्याचा आत्म्या द्वारें आपल्या अंतकरणात याचे प्रमाण देत आहे. तो हे आपल्या अंतकरणाचे नेत्र उघडून करत आहे, ज्याच्या द्वारें आपण त्याच्या कृसाचा गौरव आणि तो देत असलेली खात्री कीं ख्रिस्त येशू मध्यें आपल्याला देवाच्या प्रीति पासून काहीच विभक्त करू शकत नाहीं याचा आस्वाद घेऊ शकू आणि ते पाहू शकू.