
Sign up to save your podcasts
Or


घटनेने दिलेल्या आरक्षणात वर्गवारी व्हायला हवी का, असा एक महत्त्वाचा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे चव्हाट्यावर आला आहे. घटनेने दिलेल्या आरक्षणात क्रिमिलेअरसारखे निकष लावून वंचितांतील वंचितांना पुढे यायची संधी मिळावी, असे अनेकांना वाटते, तर मूळात अशा प्रकारे भेद करता येणार नाही, असे दुसऱ्या बाजूचे म्हणणे आहे. या संवेदनशील विषयावर, ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक व जातीव्यवस्थेचे अभ्यासक संजय सोनवणी यांनी आरक्षणात वर्गवारी असायला हवी, अशी भूमिका घेतली आहे. संतोष देशपांडे यांसमवेतच्या संवादातून त्यांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली आहे. देशाच्या दृष्टीने आरक्षणातील वर्गवारी हा विषय किती महत्त्वाचा आहे, त्याचे काय दूरगामी परिणाम होऊ शकतात याची उलगड करणारा हा परखड पॉडकास्ट.
आगामी काळात जगभरात नोकऱ्यांवर गदा येणार असल्याचे भाकित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, नोकरी ही संकल्पना कशी बदलते आहे, का बदलते आहे तसेच वेगळ्या भाषा शिकल्याने करिअरचा आलेख उंचावता येणे कसे शक्य आहे, याविषय विश्लेषण केले आहे स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी संतोष देशपांडे यांसमवेतच्या या गप्पांमधून. जरुर ऐका आणि भविष्याचा कानोसा आताच घ्या.
उद्यमी तरुणाई हे भारताचे भूषण. ज्या तरुण उद्योजकांनी आपल्या पूर्वीच्या पिढीपासून आलेला उद्योगाचा वारसा पुढे नेताना आपला स्वतःचा ठसा उमटविला आणि आपल्या उद्योगाला नवी दिशा दिली, अशा नेक्स्टजेन उद्योजकांच्या यशाची गाथा म्हणजेच मूव्हिंग ॲस्पिरेशन्स. प्रेरक लेखक दत्ता जोशी यांच्या संकल्पनेतून आणि शब्दांतून आपल्यापुढे आलेली ही नवकर्तृत्वाची शोधयात्रा दोन भागांमधून मुद्रित तसेच पॉडकास्ट माध्यमातून श्राव्यरुपात वाचक-श्रोत्यांपुढे आली आहे. यानिमित्ताने, संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या गप्पांमधून या अभिनव प्रयोगाची सहज उलगड तर होतेच आणि त्यातून दत्ता जोशी यांना आपल्या उद्ममशील लेखनप्रवासातून गवसलेली उद्यमशीलतेची स्पंदनेही आपणास ऐकू येतात. प्रत्येकाने आवर्जून ऐकावा असा हा कट्टा स्पेशल पॉडकास्ट जरुर ऐका...
आगामी अ.भा. मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये आयोजित करण्याचे निश्चित झाले. मात्र, त्यावर महाराष्ट्रातील अनेकांनी, विशेषतः ग्रंथविक्रेत्यांनी नापसंती व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, दिल्लीमध्ये मराठी साहित्य आयोजित करणे का ऐतिहासिक आहे, त्यातून नेमके काय साध्य होणार आहे याविषयी परखड भाष्य केले आहे ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक संजय सोनवणी यांनी. संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या कट्ट्यावरील गप्पांमध्ये सोनवणी यांनी मराठी लोकांच्या दिल्लीकडे पाहण्याच्या मानसिकतेवरही भाष्य केले आहे.
किशोरकुमार असं नुसतं म्हटलं तरी त्याची असंख्य गाणी मनात गुंजू लागतात. मन प्रसन्न करुन जातात. कैक पिढ्यांचं भावजीवन त्यांच्या जादुई आवाजावर पोसलं गेलं आहे. अशा या किशोरदांना गुरुस्थानी मानून गेली २५ वर्षे अविरत गायन करणारे आणि `व्हाइस ऑफ किशोरकुमार` अशी कीर्ती लाभलेले प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक यांचे `किशोरमय` विश्व देखील अद्भूत आहे. हे विश्व जाणून घेण्यासाठी, त्यांच्या नजरेतील किशोरदा जाणून घेण्यासाठी संतोष देशपांडे यांनी त्यांना बोलतं केलं आणि स्टोरीटेल कट्ट्यावर रंगली किशोरदांवरची मैफल...या हुरहुन्नरी, अजरामर कलाकाराच्या जन्मदिनाच्या (४ ऑगस्ट) पूर्वसंध्येला, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी..तुमच्या-आमच्या मनातील किशोरदांच्या गाण्यांना पुन्हा ओठावर आणण्यासाठी! कट्ट्यावरची ही स्पेशल मैफल, किशोरदांना अर्पण!
सध्या जगभरात अनेक पातळ्यांवर उलाथापालथ सुरु आहे. क्रीडा क्षेत्रात टी२० वर्ल्डकप, विम्बल्डन, युरो, कोपा अमेरिका अशा स्पर्धांनी मागचा आठवडा गाजवला. तोवर मुद्दा पेटला तो अमेरिकेत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा. त्यानिमित्ताने, अमेरिकेत हे गन-कल्चर कसे आहे, त्याची मूळं कुठे आहेत याचा वेध घेतला स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश देशपांडे आणि संतोष देशपांडे यांनी या पॉडकास्टमधून. ग्लोबल विषयांचा हा धावता आढावा घेताना इथे योगेशने दिल्या आहेत स्टोरीटेलवरील काही इंटरेस्टिंग बुक टीप्स! जरुर ऐका..
पंढरपूरला विठुरायाच्या ओढीने अवघ्या महाराष्ट्रातून वारकरी धाव घेतात. या वारीमध्ये असं नेमकं काय असतं, जे त्यांना एका सूत्रात बांधतं? अलीकडच्या काळात वारीला इव्हेंट म्हणून पाहणारा वर्ग उदयास येताना दिसतो. त्याचवेळी राज्यातील सामाजिक वातावरणही जाती-जातींमधील अविश्वासातून बिघडू पाहते आहे. या पार्श्वभूमीवर, वारी म्हणजे नेमके काय, ती काय साध्य करते, काय संदेश देते यावर संत साहित्याचे अभ्यासक, पत्रकार डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी परखड भाष्य केले आहे. संतोष देशपांडे यांसमवेत त्यांनी साधलेल्या या संवादातून वारीचे नेमके आकलन तर होतेच शिवाय महाराष्ट्राच्या या समृद्ध परंपरेतून महाराष्ट्र धर्माचे दर्शन होते. प्रत्येकाने मन लावून ऐकावा आणि हृदयात साठवावा, असा हा संवाद `या हृदयीचा त्या हृदयी` पोहोचावा.
आर्थिक गुन्हेगारी उघडकीस आणणारे फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे नेमके काय, त्यात काय केले जाते, देशातील अनेक आर्थिक घोटाळे उघडकीस आणण्यात या तज्ज्ञांचे योगदान किती मोठे आहे या गोष्टी सर्वसामान्य लोकांसाठी नवीन आहेत. पुण्यातील फॉरेन्सिक ऑडिटर अपूर्वा जोशी यांनी याच विषयावर लिहिलेले आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले. ते सध्या अत्यंत गाजते आहे. या पार्श्वभूमीवर, खुद्द लेखिका अपूर्वा जोशी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला आणि त्यातून अनेक अज्ञात पैलू उलगडत गेले. जरुर ऐका आणि इतरांनाही आवर्जून ऐकवावा असा हा कट्टा स्पेशल पॉडकास्ट.
पर्यटन हे फक्त मनास विरंगुळा म्हणून असतं का? नाही!
पर्यटनातून त्याहून वेगळं काही साध्य होत असतं. त्यातून आपला दृष्टिकोन विकसित होतो.
युरोपमध्ये काही दिवसांपूर्वी भ्रमंती केल्यानंतर ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर आणि संतोष देशपांडे यांना काही वेगळं गवसलं... त्याची, त्यांच्याच गप्पांमधून उलगड करणारा हा अत्यंत वेगळा पॉडकास्ट. प्रत्येकानं जरुर ऐकावा अन् वेगळ्या दुनियेतील डोळस मुशाफिरी करावी.
आपल्या अजरामर कलाकृतींमधून कैक दशके कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडणाऱ्या चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणजेच `डायरेक्टर्स` आता नव्याने आपल्या भेटीस आले आहेत. होय, प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या `डायरेक्टर्स` या पुस्तकातून निवडक भारतीय दिग्दशर्कांच्या कलाप्रवासाचा ओघवता आस्वाद रसिकांपर्यंत पोहोचला आहे. या ग्रंथनिर्मितीमागची पटकथा काय होती, हे दीपा देशमुख यांसमवेतच्या या संवादातून संतोष देशपांडे यांनी या विशेष पॉडकास्टमधून आपणापुढे आणली आहे. कोणत्या दिग्दर्शकाची कोणती वैशिष्ट्ये आहेत, त्यांच्यातील वेगळेपण कशात आहे आणि हे सारं पुस्तकातून आस्वादित करताना काय अनुभव आले, याची सुरेल उलगड दीपा देशमुख यांनी केली आहे. आपल्या मनातील रसिकतेचा पत्ता शोधू पाहणारा हा पॉडकास्ट जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा.
From the publisher's feed