
Sign up to save your podcasts
Or


मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जातात, असे राजकवी भा.रा. तांबे यांच्या कवितांचे गारुड तब्बल शंभर वर्षांहून अधिक काळ रसिकांवर टिकून आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय, कळा ज्या लागल्या जीवा, नववधु प्रिया मी बावरते, मधु मागसि माझ्या सख्या परि, कशी काळनागिनी, घन तमी शुक्र बघ राज्य करी, तिन्ही सांजा सखे मिळाल्या अशा त्यांच्या कित्येक रचना आपल्या अंतरीचा तळ ढवळतात. अशा या राजकवींचे नातू शिरीष तांबे यांनी संतोष देशपांडे यांसमवेतच्या संवादातून आपल्या आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या संवादातून त्यांनी तो काळ आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो आणि ऐकता ऐकता आपणही `भारा`वून जातो...स्टोरीटेल कट्ट्यावरील हा खास पॉडकास्ट जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा.
देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे हुतात्मे म्हणजे भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव. 93 वर्षांपूर्वी या तिघांना फाशीवर चढविण्यात आले. मात्र, आपल्या बलिदानातून त्यांनी तरुणाईला देशासाठी निधड्या छातीने जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या बलिदानाचे स्मरण चिरंतन राखण्यासाठी आजही २३ मार्च शहिद दिन म्हणून पाळला जातो. या शहिदांचा एकमेकांमधील पत्रव्यवहार जेव्हा पुढे आला, तेव्हा त्यांच्या मनातील अंतरंगाची, त्यात दडल्या भावनांची हळवी आणि तितकीच ठाम अशी उलगड होते. ती समाजापुढे आणण्यासाठी हरहुन्नरी असे ज्येष्ठ कलाकार सुधीर मोघे यांनी मोठ्या प्रयत्नांतून `शहिदांची पत्रे` नावाने अत्यंत हृद्य असे सादरीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचीच उलगड करण्याचा प्रयत्न केला आहे संतोष देशपांडे यांनी. देशप्रेमाचा ओलावा मनात जपतानाच, ध्येयाचा अंगारही फुलविणारी ही शहिदांची पत्रे सर्वांपुढे आलीच पाहिजेत, अशा हेतूने हा संवादही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू या.
कुटुंबातील महिला ही खरंतर त्या घराला पुढे घेऊन जात असते. घरात कोणी आजारी पडले तरी त्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाण्याचे धैर्य तिच्यात पुरुषांच्या तुलनेत खचित अधिकच असते. अशी ही स्त्री आजारी पडली तर घरची अख्खी घडी विस्कळीत होऊन जाते. मग, हे असं का घडतं, याचा वैद्यकशास्त्राच्या दृष्टिकोनातून मागोवा घेतला आहे पुण्यातील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. नेहा कुलकर्णी यांनी, संतोष देशपांडे यांंसमवेत रंगलेल्या या विशेष पॉडकास्टमधून. आपल्या कुटुंबातील स्त्रीला आनंदी राखलं तर तिचं शारीरिक व मानसिक स्वास्थही आपोआप चांगलं राखलं जातं. त्यासाठी काय करायला हवं, याची छानशी उलगड डॉ. नेहा कुलकर्णी यांनी करुन दाखवली आहे, जी प्रत्येकाने ऐकायलाच हवी.
हा प्रवास आहे एका विलक्षणाचा शोध घेऊ पाहणाऱ्या तरुणीचा, जिनं अगदी वेगळ्या पद्धतीनं आपल्या आवडीचा मार्ग चोखाळला आणि खगोलविज्ञानाच्या प्रसारासाठी स्वतःला झोकून दिलं. या क्षेत्रातील तिनं एस्टोनएरा हे आपलं पहिलं स्टार्टअप् वयाच्या १८ व्या वर्षी सुरु केलं. तिच्या कामाची दखल घेत तिला रॉयल एस्ट्रानॉमिकल सोसायटी ऑफ लंडनने आपली फेलोशिप प्रदान केली. भेटूया श्वेता कुलकर्णीला. खगोलविज्ञानाच्या प्रसारासाठी अत्यंत उत्साहाने आणि कल्पकतेने जगभरात कार्य करणारी ही पुणेकर तरुणी आज कट्ट्याची मानकरी आहे. तिच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या संवादातून उलगड होते, ती एका स्वप्नाची आणि त्या स्वप्नातून आपलं असं जग निर्माण करणाऱ्या ऊर्जेची. खुद्द जयंत नारळीकर, रघुनंदन माशेलकर यांसारख्या महान शास्त्रज्ञांनी कौतुकाची थाप दिलेल्या श्वेताचा प्रवास ऐकणं हा सुद्धा एक समृद्ध करणारा अनुभव ठरावा.
आज आपण सर्वजण समाज म्हणून एक विलक्षण अस्वस्थता अनुभवत आहोत. एकमेकांविषयी अविश्वास, मनात काही ना काही निमित्ताने सतत निर्माण होत असणारे काहूर, सार्वजनिक व वैयक्तिक जीवनात बोलताना घसरलेली भाषा अशी अनेक लक्षणे या नव्या सामाजिक `केमिकल लोचा`ची आहेत. हे असे का होते आहे, त्यापासून दूर होऊन आपण स्थिर होत प्रगतीपथावर कसे राहू शकतो, याचा विचार होणं नितांत आवश्यक आहे. ज्येष्ठ संपादक व चिंतनशील विचारवंत श्री. यमाजी मालकर यांनी संतोष देशपांडे यांसमवेतच्या गप्पांमधून हा विषय अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवला आहे. आपल्याला आरसाही दाखवला आहे आणि यातून सुटकेचा मार्गही दाखवला आहे. प्रत्येकाने जरुर ऐकावा, विचार करावा, इतरांनाही ऐकवावा आणि आपल्या आयुष्यातील प्रगतीचा खरा मार्ग अनुसरावा, असा हा खास पॉडकास्ट.
नुकत्याच झालेल्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघातील सचिन धस याने आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सचिन ज्या बीड शहरातून येतो, तेथे प्रशिक्षणासाठी कोणतीही अनुकूल स्थिती नसतानाही, त्याचे वडील संजय धस यांनी त्याच्या वयाच्या चौथ्या वर्षापासून त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. अनेक आव्हानांवर आपल्या परीने मार्ग काढीत, शक्य त्यांचे सहकार्य घेत आपल्या सचिनला त्याचा खेळ उंचावण्यासाठी दिशा दिली, ऊर्जा दिली. आपल्या मुलाचा मित्र बनून त्याच्या आयुष्याला आकार दिला. केवळ उत्तम खेळाडूच नव्हे तर एक चांगला नागरिक म्हणूनही त्याची ओळख व्हावी, असा त्यांचा आग्रह असतो. संजय धस यांनी संतोष देशपांडे यांसमवेत साधलेल्या या संवादातून सचिनची जडणघडण तर उलगडतेच शिवाय मुलगा आणि वडील यांच्यातील नात्यांमधील आगळे पैलूही पुढे येतात...मुलांसाठी झटू पाहणाऱ्या पालकांना नवी दृष्टी देतात. स्टोरीटेल कट्ट्याचा हा खास पॉडकास्ट प्रत्येकाने ऐकावा आणि इतरांनाही ऐकवावा.
नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर सध्या `वर्ल्ड बुक फेअर` म्हणजेच जागतिक पुस्तक महोत्सव रंगतो आहे. देशातील एक अत्यंत भव्य आणि देखणा पुस्तक महोत्सव म्हणून जगभरात त्याचा लौकीक असतो. त्याची मुख्य धुरा सांभाळणारे नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मिलिंद मराठे यांच्याशी संतोष देशपांडे यांनी थेट महोत्सवात भेट घेऊन संवाद साधला, खास स्टोरीटेल कट्ट्यासाठी. जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा.
उद्योजकतेच्या वाटेवर पुस्तकं, माणसं, अनुभव जे जे काही लाभते, त्यातून आपल्यातील सकारात्मकता आणखी वाढवत नेली की नवी दिशा मिळू शकते. तुमचा सूर तुम्हाला गवसू शकतो. व्यवसायाचा कोणताही पूर्वानुभव नसताना, उद्योजकतेची कास धरत लाभलेल्या संधी, भेटलेली माणसं, सूचलेल्या कल्पना आणि आलेले अनुभव या शिदोरीवर उमेश पवार या तरुणाने रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला. मागे वळून पाहताना, आता त्याला काय वाटते, कोणते अनुभव आले, त्यातून काय शिकता आले याची विलक्षण उलगड होते, ती त्याच्या संतोष देशपांडे समवेत रंगलेल्या गप्पांमधून. उद्योगाची कास धरु पाहणाऱ्या, उद्योगात स्थिराऊ इच्छिणाऱ्या आणि आजवर उद्योगात राहूनही काहीच हाती लागले नाही असे वाटणाऱ्या सर्वांनी आवर्जून ऐकावा असा हा कट्ट्यावरील स्पेशल पॉडकास्ट. जरुर ऐका आणि सर्वांपर्यंत पोहोचवा.
चित्रपटसृष्टी, कलाकार यांविषयी आकर्षण सर्वांनाच असते. मात्र, या क्षेत्राला वाहिलेले मासिक, प्रकाशन सुरु करणे आणि ते अव्याहत चालवणे, हे कार्य प्रत्यक्षात किती आव्हानात्मक असते, याची सर्वांनाच कल्पना असते असे नाही. मनोरंजन क्षेत्रातील एक आघाडीचे मराठी मासिक म्हणून वाचकप्रिय असलेल्या `तारांगण`ने नुकतीच आपली १२ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने, `तारांगण`चे संपादक व ज्येष्ठ सिनेपत्रकार मंदार जोशी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या या संवादातून तारांगणची आजवरची वाटचाल, त्यातील महत्त्वाचे टप्पे, कलाकार आणि रसिकांना जोडणारे उपक्रम आदींविषयी वेगळी माहिती पुढे येते. स्टोरीटेल कट्ट्यावरील हा खास पॉडकास्ट श्रोत्यांना एका आगळ्या प्रवासाची ओळख करुन देईल, हे निश्चित.
अयोद्धानगरीत श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देश राममय झाला. याच काळात, स्टोरीटेलवर `रामराज्य कथा` ही येऊन दाखल झाली. रामराज्य म्हणजे नेमके काय, त्या काळात असे काय होते ज्यामुळे त्यास रामराज्य म्हटले जायचे, तेव्हाचे समाजजीवन कसे होते, समाजापुढचे आदर्श काय होते, परस्परांशी व्यवहार कसे होते या व अशा अनेक गोष्टींची विलक्षण उलगड रामराज्य कथा करतात. या `रामराज्य`ची संकल्पना ज्यांच्यामुळे साकारली ते योगेश दशरथ आणि लेखक संजय सोनवणी यांच्यासमवेत संतोष देशपांडे यांनी साधलेला संवाद, तुम्हाला `रामराज्या`च्या मार्गावर घेऊन जातो. जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा.
स्टोरीटेलवर रामराज्य कथा ऐकण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in/books/ramrajya-katha-2806579
स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in#pricePlans
From the publisher's feed