अवघा रंग एकची झाला-पांडुरंगाच्या परम भक्त संत सोयराबाईंचा हा अभंग माझ्यात कुठेतरी सातत्याने स्पार्क निर्माण करतो. मी उत्तेजित होतो अन मी मलाच अबाधितपणे अनुभवत असतो. एकत्व अभंगच असते. त्याचे विभाजन नाही होत. आपल्याला विविध रंग दिसतात , काही आवडीचे काही नावडीचे होत असतात . त्या बाह्य रंगाचा, त्या विचाराचा, त्या वृत्तीचा , स्वभावाचा, मताचा मी होत रहातो आणि हाच मी हा "अहम" साकारत असतो. तोच अहंकाराचा "अ" जिकडे तिकडे मिरवत रहातो. खर्या आनंदाचा " अ " कधी गिरवला जातच नाही. लहानपणी शिकलो "अ" अननसाचा . पण घडले काय तर नसानासातून नुसता अहंकार भरत गेला , हे कळलेच नाही. आता जेव्हा माय माऊली संत सोयराबाई आनंदानुभवातून गातात " अवघा रंग एकचि झाला , रंगी रंगला श्रीरंग - " तेव्हा मी खडबडून जागा होतो. भक्तीपोटी वेडा होतो तेव्हा या मूळ रंगाची , निजरंगाची काहीशी चाहूल लागते, अन या जागेपणातून मीही गाऊ लागतो " अवघा रंग एकचि झाला --- रंगी रंगला श्रीरंग ..