सण आनंदाचा पाडवा - अंतरी देवप्रेमाचा गोडवा - आज गुढीपाडवा - आनंदाची गुढी उभारायची. पण या गुढीचे गूढ अंतरात उद्भवणार्या देवप्रेमात आहे जे सदा सर्वदा शुभ करून ठेवणारे आहे. गुढी पाडवा हा साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. संपूर्ण दिवस शुभकारक आहे असे सारीच पंचांगे सांगतात. ढवळे पंचांग, दाते, कालनिर्णय, निर्णयसागर सारेच शुभ म्हणतात. पण मला जाणवते, आपला देह देखील पंचांगच आहे. पृथ्वी, आप ,तेज ,वायु, अवकाश या पाच तत्वांचाच देह आहे ना? तेच काय , शरीर मन बुद्धीच्या सार्याच संवेदना या देखील पाच आहेत. रूप , रस, गंध, स्पर्श ,नाद. सवेदना स्वीकारणारी ज्ञानेंद्रियेही पाच आहेतच ना. कान नाक,जिव्हा, त्वचा अन डोळे. तसे कर्मेन्द्रियेही पाच आहेतच. तेव्हा समग्र देह हे पंचांगच आहे ना ? हे पंचांग काय सांगते ? " लाभलेला हा मनुष्य देह शुभकारक आहेच. किंबहुना देहाद्वारे आकाराला येणारे समग्र जीवनच शुभ मुहूर्त आहे। नाही का ? मुहूर्ताचे क्षण, दिवस येतील जातील पण उभे आयुष्य मुहूर्त करून ठेवते ते हे देवप्रेम अन देव भक्ति. या भक्तीने या पंचाक्षरी परमेश्वराची , प्रत्यक्ष परमानंदाची अनुभूति याच हृदयात होते ना ? या अनुभूतीची गुढी उभारण्याचा संकल्प होणे म्हणजे गुढी उभारणे. पारंपारीकतेतून अपरंपार ईश्वरी प्रेमाची अनुभूति देणारा हा गुढीपाडवा. माझ्यातला हा संकल्प अन आपणा सर्वांसाठी उद्भवलेल्या प्रेमपूर्ण शुभेच्छा या एपिसोडद्वारे प्रकट होत आहेत. " सण आनंदाचा पाडवा ---"