
Sign up to save your podcasts
Or


उद्योजक म्हणजे समाजाला पुढे घेऊन जाणारा धाडसी घटक. अशा उद्योजकांच्या वेगळेपणाला अधोरेखित करीत त्यातून प्रेरणादायी असं काही समाजापुढे आणत राहणं, ही नक्कीच आगळी बाब ठरते. छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार, लेखक, उद्योजक दत्ता जोशी यांनी आजवर तब्बल हजारोंहून अधिक उद्योजकांशी संवाद साधून त्यांची वाटचाल आपल्या पोलादी माणसं, मुव्हींग एस्पिरेशन्स अशा पुस्तकमालिकांमधून समाजापुढे उलगडून दाखवली आहे. या उद्योजकांच्या यशाचं रहस्य काय, त्यांच्यातील वेगळेपण काय याचा थोडक्यात आढावा घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला आहे, संतोष देशपांडे यांनी. प्रत्येकाने जरुर ऐकावा, इतरांनाही ऐकवावा असा दत्ता जोशी यांनी या संवादातून उलगडून दाखवलेला उद्योजकांचा सक्सेस कोड, खास स्टोरीटेल कट्ट्याच्या श्रोत्यांसाठी!
मराठी पॉडकास्टिंगमध्ये स्टोरीटेल कट्टा अव्वल क्रमांकावर पोहोचला आहे. यानिमित्ताने, एकूणच पॉडकास्टिंगमध्ये सध्या काय सुरु आहे, जगातील चांगले पॉडकास्ट कोणते, मराठीत पॉडकास्टर बनण्यासाठी काय करावं लागतं, या विषयावर गप्पा मारल्या आहेत, स्टोरीटेलचे इंडिया हेड योगेश दशरथ आणि संतोष देशपांडे यांनी. जरुर ऐकावा असा हा पॉडकास्टिंगवरला पॉ़डकास्ट!
आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात एआय तंत्रज्ञान आता सर्वत्र झपाट्याने वापरले जाऊ लागले आहे. मात्र, लेखन, कला, अभिनय अशा सर्जनशील क्षेत्रांत `एआय`च्या आगमनाने अनेक प्रश्नही पुढे आणले आहेत. यातून बेरोजगारीपासून स्वामीत्व हक्कांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होतो. सध्या अमेरिकेत, तेथील चित्रपटसृष्टी म्हणजेच, हॉलिवुडमध्ये लेखक, तंत्रज्ञान वगैरे यांच्या संघटनांनी याच मुद्द्यांवरुन संप पुकारलेला आहे. हा प्रश्न कसा सुटेल, त्याचा जगभरात काय परिणाम होईल, `एआय`वर नेमका आक्षेप काय आहे, ऑडिओ इंडस्ट्रीतही याचा प्रभाव पडणार का व अशा अनेक प्रश्नांची इंटरेस्टिंग उलगड स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी केली आहे, संतोष देशपांडे यांसोबतच्या या गप्पांमधून. जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा.
प्रा. हरी नरके.... पुरोगामी चळवळीतील एक महत्त्वाचे विचारवंत, लेखक, वक्ते. हरीभाऊंच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला. या पार्श्वभूमीवर, त्यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे प्रसिद्ध लेखक, संशोधक संजय सोनवणी यांनी हरीभाऊंच्या आठवणी जागवल्या. हरीभाऊंचे अनेक अज्ञात पैलू या संवादातून पुढे आले. एक विचारवंत जेव्हा कार्यरत असतो, तेव्हा त्याच्या जगण्यात किती संघर्ष, उद्विग्नता ठासून भरलेली असते आणि ही कोंडी फोटताना त्याला काय काय सहन करावे लागते आणि हे सर्व त्याचा निकटवर्तीय कसे अनुभवतो, हे जाणून घेण्यासाठी ऐकायलाच हवा असा हा संजय सोनवणी आणि संतोष देशपांडे यांच्यात संवाद, हरीभाऊंच्या स्मृतींना उजाळा देऊन जातो.
शाश्वत शिक्षण या संकल्पनेच्या आधारावर नाशिकमध्ये मिलिंद कुलकर्णी यांनी रेषा शिक्षण संस्था सुरु केली. शाश्वत शिक्षण म्हणजे नेमके काय, मुलांना शिक्षणातून नेमकं काय मिळणं अपेक्षित आहे, का अपेक्षित आहे आणि त्यासाठी कोणत्या वेगळ्या संकल्पना पुढे आल्या आहेत, याचा उहापोह केला आहे खुद्द मिलिंद कुलकर्णी यांनी. त्यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या संवादातून नव्या शिक्षणपद्धतीची थोडक्यात ओळखही होऊन जाते. प्रत्येक सजग पालकाने ऐकायलाच हवा असा हा पॉडकास्ट.
श्री. संदीप काळे म्हणजे एक सक्रीय लेखक. आपल्या लेखणीतून विविध व्यक्ती, अनुभवांशी भिडत असतानाच `व्हॉइस ऑफ मीडिया` च्या माध्यमातून ते पत्रकारांचं संघटनही करतात. आजवरच्या वाटचालीत त्यांचा लेखक, संपादक व संघटक अशा तिन्ही आघाड्यांवर झालेला प्रवास, त्यातील अनुभव, निरीक्षणे यांविषयी त्यांच्याशी संवाद साधला आहे संतोष देशपांडे यांनी. जरुर ऐकायला हवा, असा पॉडकास्ट.
आपल्या एकाहून एक सुरेल गीतांनी आणि कवितांनी मनामनांत निसर्ग जिवंत ठेवणारे रानकवी ना.धों. महानोर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांवर दैनिक लोकमत मध्ये ४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेला अग्रलेख म्हणजे त्यांचं आगळंपण आणि आपलंपण साठवणारी एक सुरेल शब्दमैफलच. ती फुलवली आहे संपादक संजय आवटे यांनी. महानोरांचे काव्य, त्यांची प्रतिभा, त्यांचं कार्य आणि त्यांची मातीशी आणि माणसांशी असणारी बांधिलकी अशा अनेक पैलूंची गुंफण आवटे यांनी अत्यंत उत्कट शब्दांत केलेली आहे. असा हा लेख, त्यांच्या सौजन्याने, श्राव्य माध्यमातून आपणापर्यंत पोहोचविला आहे संतोष देशपांडे यांनी.
भारत आता जगातील एक महत्त्वाची आर्थिक महासत्ता बनते आहे, असे आपण ऐकतो, वाचतो. खरेच भारत आर्थिक महासत्ता बनते आहे का, असेल तर त्यामागची कारणे काय आहेत, सर्वसामान्यांना यातून काय मिळणार आहे या व अशा अनेक बाबींवर अगदी सोप्या शब्दांत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, लेखक डॉ. विनायक गोविलकर यांनी प्रकाश टाकला आहे. आर्थिक महासत्ता या संकल्पनेची अतिशय सुलभ भाषेतील ही उलगड झाली आहे, संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या गप्पांमधून. जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा.
काही लोकं खरोखर `अवलिया` प्रकारात मोडतात. मुंबईत माझगावातील डोंगरी भागात गेली १५० वर्षे एक मराठी शाळा ज्यू समाज चालवितो. त्याची धुरा सांभाळणारे विजू पेणकर हे खरोखर अवलिया. अत्यंत संघर्षातून ज्यांनी आपलं आयुष्य फुलवलं, आयुष्यातील नानाविध प्रांतांत मुशाफिरी केली, बॉडीबिल्डिंगपासून कब्बडीपर्यंत सारं क्रीडाक्षेत्र ताब्यात घेत अभिनय क्षेत्रातही ज्यांची कारकीर्द फुलली, असे विजू पेणकर प्रसंग येताच आपल्या मराठी शाळेसाठी सर्वस्व झोकून देतात आणि या शाळेला ऊर्जितावस्था मिळवून देतात... हे सारं विलक्षण आहे. खास स्टोरीटेल कट्ट्यासाठी त्यांनी संतोष देशपांडे यांसोबत साधलेला हा संवाद आपल्या सर्वांना नवी ऊर्जा देऊन जाईल, नवी दृष्टी देऊन जाईल हे नक्की.
पुस्तक वाचून श्रीमंत होता येतं का, हा एक प्रश्न सर्वांनाच पडतो. त्याचं नेमकं उत्तर या पॉडकास्टमधून मिळतं. स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख व वाचन विश्लेषक योगेश दशरथ यांसमवेत संतोष देशपांडे यांनी साधलेल्या संवादात श्रीमंतीचे मार्ग दाखवणाऱ्या जगाती अनेक उत्तमोत्तम पुस्तकांचा, त्यातील आशयाचा वेध घेतला गेला आहे. आपली आर्थिक स्थिती सुधारण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांच्या विचारांना दिशा देणारा हा संवाद जरुर ऐका.
From the publisher's feed