श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकालाच्या निमिताने भगवंताचे, या परमानंदाचे भावपूर्णतेने गायन घडावे या आर्ततेपोटी हा एपिसोड प्रकट होत आहे. " ऐसा परमानद श्रीहरी मम हृदयी वसावा "
या स्वरचित श्रीकृष्णाष्टकाचे काहीसे गायन व त्यानिजबत कीहीसे कथन घडले आहे. श्रीकृष्णाष्टक हे असे आहे.
कदाचित कालिंदीतटी सुरस वेणुगायन करी जो
स्वानंदे सहज गोपीमुखकमलांसी फुलवी जो
ब्रह्मा, महेशा, गणेशा पदारविंदी विसावा
ऐसा परमानंद श्रीहरी, मम हृदयी वसावा || १||
करीं वेणू, सवे धेनु, पितांबर कटी भरजरी
सुवर्णमुकुट मस्तकी, शोभे मयुरपंख त्यावरी
राधिका रमण, मदन मोहन, घुमवि पावा
ऐसा परमानंद श्रीहरी, मम हृदयी वसावा || २||
पूजाग्रणी बैसवी पितामह, परमपुरुषोत्तमा
प्रेमे पूजिता पावला परम प्रेम धामा
शरपंजरी जरी तो, वरीतो स्वरुपसुंदर माधवा
ऐसा परमानंद श्रीहरी, मम हृदयी वसावा ||३||
लपविता वस्त्र प्रार्थिती व्याकुळ गोपललना
लावण्यस्वरूप देखिता लोटला प्रेमपूर नयना
हृदयांतरी श्रीहरी तव शुभपदकमल ठेवा
ऐसा परमानंद श्रीहरी, मम हृदयी वसावा ||४||
पुरवुनि वस्त्र त्वां, रक्षिले द्रुपद दुहीता
त्यजू्नी राजमंदीरा पावसी विदुराघरी अच्युता
भेटता सुदामा रंगला मंगल मिलनोत्सवा
ऐसा परमानंद श्रीहरी, मम हृदयी वसावा ||५||
अर्पिता तुलसीदला भक्त भार्या रुक्मिणी
हृदयांकित झणि जाहला यदुपति चक्रपाणि
आणिला प्राजक्त अंगणि नमवुनि इंद्रादीदेवा
ऐसा परमानंद श्रीहरी, मम हृदयी वसावा ||६||
“मामेकं शरण व्रज” म्हणोनि बोधिले पार्था
सारथ्य करित रक्षितों पांडवा समरांगणी सर्वथा
प्रेमे रमवि जो स्वरूपी, प्राण प्रिय उद्धवा
ऐसा परमानंद श्रीहरी मम हृदयी वसावा ||७||
ॐ कारा प्रभुवरा प्रणवनाद सुंदरा
पदांबुजी रंगुनी सेवितो प्रेमामृत धारा
जवळुनि हृदयी, कवळी जो प्रेमे सदभावा
ऐसा परमानंद श्रीहरी, मम हृदयी वसावा ||८||