काही दिवसापूर्वी एक गझल लिहिली गेली. गझल चे शीर्षक आहे "कापूर". आरतीच्या तबकातील कापूर. आरती म्हणजे आर्तता, भाव भक्तीचे एक मधूर वास्तव भक्ताच्या हृदयाचे. हेच प्रकट झाले या काव्यातून.
तुजलागी सख्या रे , मी असा आतूर का ?
तुजवीण सख्या रे , मीच मज नामंजूर का ?
नित्य सन्मुख तुला मी, असता सखया
अंतर आपुल्यामधले, एवढे मगरूर का ?
तू जिंकता हरघडीचा, जल्लोष तुझा मी
हारणे हरएक माझे, एवढे मधूर का ?
लाविली पैज अमृताने, तुझ्या वचनांशी
जगणे अमृताचे तुजपुढे, क्षणभंगुर का ?
शब्दात भाव तेव्हा भावास, आज शब्द कोता
स्पंदनास माझ्या, तव बासुरीचा सुर का?
प्रेमप्रवाही तुझ्या मी, पाहतो जेव्हा मला
सागराच्या या नदीला, एवढा पूर का?
सद्भावे अविरत गातो, परमानंद आरती
तबकातील आरतीच्या, मी सुगंधी कापुर का ?