भक्ताचा भाव जेव्हा अनावर होतो तेव्हा देवाचे वर्णन घडते. याची देही याची डोळा भक्त देवाला अनुभवताना कधी देवाच्या प्रसन्न मुखावरील स्मित हास्य तर कधी गंभीरता पहात असतो. कधी देवाच्या अमोघ वाणीचा ओघ तर कधी देवाचे गूढ गहन मौनही अनुभवत असतो. कधी देवाचे भक्ताला प्रेम देणे तर कधी भक्ताकडून प्रेमाची मागणी करणे हे देवाकडून घडत असते. कधी देव ज्ञानाची महती सांगत भक्त प्रेमाला जागे करतो. कधी भक्तीचे ऋण घेतो तर कधी भक्ताला ऋणात ठेवतो. अशा विविध अंगाने देव भक्ताचा होत असतो अन् भक्तही देवाचा होत असतो. देव भक्ताच्या बाबतीत हे सर्व प्रेत्यक्षाचे सोहळे असतात. या अनुभवातूनच जेव्हा भक्त बोलायला उभा रहातो, तेव्हा त्याच्याकडून केवळ अन् केवळ भक्तिभावच प्रकट होतो. बोलणारा भक्त हा केवळ भक्तच असतो. तो ना स्मृतिचा ना संस्काराचा, ना समजुतीचा, ना कोणत्या जातीचा, धर्माचा, ना पंथाचा ना कोणत्या वयाचा, ना कोणत्या शिक्षणाचा असतो. ही बाहेरची कोणतीच आवरणे नसतात तिथे. केवळ भक्तीचे आनंददायी वास्तव खेळत असते त्या हृदयात.