प्रत्येक चरित्रात त्यांनी एकेक महत्त्वाचा विचार मांडला आहे. उदा.,महात्मा जोतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात,"प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला,आपल्याला लिहिती बोलती क करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही." ताराबाई मोडक या शिक्षणव्रती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात," माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे." ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरीजाबाई लिहितात,"ज्या भागात काम करायचं, त्या भागातील मुलं शिकली आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं,त्यात प्रेम आओतणं या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरूण मुलं पुढे येवोत!हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल!"