महात्मा गांधींच्या शिष्या मीराबेन यांच मराठीत अनुवादित आत्मचरित्र. फ्रेंच तत्त्वज्ञ रोमा रोलॉ यांनी गांधीजींवर लिहिलेले पुस्तक वाचून आपल्याला आयुष्याचं ध्येय सापडल्याचे वाटल्याने त्या स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात आल्या. रॉयल नेव्हीच्या ॲडमिरलची सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली ही मुलगी. मीराबाईंचे जीवन , तिचा गांधीजींशी जोडलेला स्नेह आणि तिची सर्वस्वाने कामात झोकून देण्याची वृत्ती केवळ अतुलनीय आहे. आज हे सारे वाचताना ही कहाणी खरी की कपोकल्पित असे आजच्या वाचकांना वाटले तर नवल नाही. विचारांवरची निष्ठा, एका परक्या देशात येऊन पूर्णतः भिन्न संस्कृतीत लोकांसाठी काम करणं सोपी बाब नव्हती. ब्रिटिश नेव्हीत असलेले वडील, उच्चभ्रू वर्तुळातील उठबस, विशाल प्रासादातील वास्तव्य, शब्द झेलायला हजर असणारे नोकर चाकर, संगीत, नृत्य आणि साहित्य यासह अभिजनातील वावर असं तिचं जीवन होतं.
मीराबेन या झंझावाती काळाच्या साक्षीदारच नव्हे तर भागीदारही होत्या. त्यांचे आयुष्य एका जादूमयी वातावरणाच्या प्रभावात जात होते. विदेशात गांधी नावाच्या महापुरुषाच्या विचाराचे सच्चेपण लोकांना पटवून देण्याचे काम मीराबेन यांनी केले. गांधीजींचे दौरे, गांधीजींची दैनंदिनी ह्या सगळ्यांमध्ये त्यांनी गांधीजींच्या सहाय्यकाची भूमिका चोख निभावली. गोलमेज परिषदेत त्यांनी गांधीजींची सचिव, व्यवस्थापक , पी आर ओ ची देखील भूमिका पार पाडली. ब्रिटिश कामगारवर्ग गांधीजींच्या साधेपणाने, अहिंसेच्या तत्त्वज्ञानाने भारावला होता. त्यांच्याशी संवाद साधून स्वातंत्र्य लढ्याला समर्थन मिळवले.वेळप्रसंगी गांधीजींचे निरोप गव्हर्नर, व्हाईसरॉय,सैनिकी अधिकारी, काँग्रेस कार्यकारिणी सदस्य यांच्यापर्यंत पोहोचवणे, गांधी विचारांचा प्रसार करणारे लेख लिहिणे, विदेशी वृत्तपत्रांमध्ये राजकारण्यांमध्ये गांधीजींबद्दल मत तयार करणे अशी विविध कामे त्यांनी न डगमगता या कालखंडात केली.गांधीजी देखील त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर विसंबून होते.